Total Pageviews

Monday 17 June 2019

बिश्केक जाहीरनामा... महा एमटीबी 17-Jun-2019



दहशतवाद हा आता काही देशांपुरता मर्यादित नसून
, त्याची पाळेमुळे अधिक विस्तीर्ण आणि खोलवर रुजण्याची चिन्हे पाहता, आता जगभरातच त्याबाबत चिंता उत्पन्न होत आहे. चांगला व वाईट दहशतवाद असा भेद करून, ज्यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते, त्यांनाच दहशतवादाचे चटके बसू लागल्यानंतर त्यांनाही आता या प्रश्नाची दाहकता कळून आली, हे एक शुभचिन्ह मानावे लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाने याची दखल आधीच घेतली आहे. अमेरिकेवर 9/11 चा हल्ला झाल्यानंतरच हा देश झोपेतून खाडकन जागा झाला आणि त्यालाही दहशतवाद काय चीज असते, हे कळून आले. यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि व्यासपीठावरून दहशतवाद हा विषय कार्यक्रमपत्रिकेवर राहिला आहे. अलीकडच्या काळात भारताने दहशतवाद हा विषय असा काही लावून धरला की, अन्य देशांनाही त्याची तीव्रता कळून आली. अन्यथा आपल्या स्वार्थासाठी सत्ता उलथवणे, त्यासाठी बंडखोरांना शस्त्रास्त्रांपासून तर आर्थिक रसद पोचविण्याचा उपद्व्याप अनेक देशांनी केला आहे. नुकतीच किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे सात देशांची शांघाय को-ऑपरेशनची (एससीओ) परिषद झाली. या परिषदेतही दहशतवादावर एक विस्तृत जाहीरनामा तयार करण्यात आला. दहशतवाद हा मानवतेला कलंक असून, त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक स्तरावर अत्याधुनिक संसाधनांच्या माध्यमातून माहितीची जलद देवाणघेवाण करण्याचा निर्णय या परिषदेत झाला.

भारत, रशिया व चीन हे मोठे देश; तर किर्गिजस्तान, कझाकिस्तान, ताजिकीस्तान व उझबेकीस्तान हे अन्य सदस्य देश, या सार्यांनी आपापले विचार मांडले. दोन दिवसांनंतर हा जाहीरनामा घोषित करण्यात आला. दहशतवादाला चोहोबाजूंनी लढा देण्यासाठी सर्व सदस्य देशांनी निर्धार केला. दहशतवादाचा प्रसार-प्रचार, हिंसेला प्रवृत्त करणारी विचारधारा, यासह कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला चिरडण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने घालून दिलेल्या निर्देशांचे जगातील सर्वच देशांनी पालन करावे, असे आवाहन या जाहीरनाम्यातून करण्यात आले आहे; तसेच आपल्या स्वार्थासाठी स्थानिक दहशतवादी, अतिवादी गटांना हाताशी धरून जनतेवर अन्याय करण्याची बाब मुळीच समर्थनीय नाही, असेही या दस्तावेजात म्हटले आहे. दहशतवाद्यांना कोणत्याही देशाने शस्त्रपुरवठा करता कामा नये, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत देता कामा नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. आज अनेक देश दहशतवादाने ग्रस्त आहेत. त्याचे कारण म्हणजे काही देशच त्यांना शस्त्रे पुरवीत असतात. त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. यात काही देश असे आहेत, जे धर्माच्या नावावर असहिष्णुता पसरविण्याचा प्रयत्न करतात, समाजासमाजात वैरत्वाची भावना पसरवितात आणि आपले ईप्सित साध्य करतात. यावरही आळा घालण्याची नितान्त गरज या परिषदेत व्यक्त करण्यात आली. अलीकडे दहशतवाद्यांकडे रासायनिक आणि जैविक संहारक शस्त्रे आली आहेत. ही अशी मानवतेला धोका पोचविणारी अस्त्रे नष्ट करण्यासाठी सर्वांनी मिळून संघटितपणे प्रयत्न करण्याची आणि दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्याची गरज आहे. एससीओ परिषदेने यासाठी एकात्मिक दहशतवादविरोधी यंत्रणा कायम करण्याच्या गरजेवरही जोर दिला आहे.

या परिषदेत सर्वात अधिक भाषण गाजले ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे! त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर जोरदार प्रहार केला. जे देश दहशतवादाचे प्रायोजक आहेत, त्यांना मदत, प्रशिक्षण आणि पैसा पुरविणारे आहेत, त्यांना खड्यासारखे बाजूला करून त्यांना जबाबदार धरण्याची गरज आहे. सर्व सदस्य देशांनी आपले क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून अशा तत्त्वांना ठेचून काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. एससीओने दहशतवादावर एक जागतिक परिषदच भरवावी, अशी सूचना करून, त्यांनी अशी परिषद भारतात होणार असल्याचेही सूतोवाच केले. शेजारी अफगाणिस्तानमधील स्थितीकडे लक्ष वेधताना, या देशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. याचे प्रतिबिंब जाहीरनाम्यातही उमटले. यापूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे नाव घेऊन, हा देश दहशतवादाची फॅक्टरी असल्याचा थेट आरोप केला होता. पाकिस्तानवर चोहोबाजूने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठी भारताने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. या परिषदेत इम्रान खानसोबत चर्चा करण्याचा विषयच नव्हता. पण, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने मात्र या परिषदेत मोदींपुढे पाकिस्तानशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर मोदींनी तडक उत्तर दिले की, दहशतवादी कारवाया आणि चर्चा या कदापि एकत्र होऊ शकत नाहीत.

पठाणकोट हवाई तळावर 2016 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यापासून भारताने पाकिस्तानसोबत कोणतीही बोलणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पाकिस्तान पैशापैशाला मोताद आहे. तो भिकेचे कटोरे घेऊन जगभरात फिरत आहे. त्याचा फायदा चीनने उठवून पाकला काही मदत केली आहे. चीनचा यात स्वार्थ आहे. कारण, त्याला पाकमध्ये कॉरिडोर बांधायचा आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चीनचे स्वप्न आहे. पण, कर्ज घ्यायचे किती? त्याची परतफेड तर करावीच लागणार आहे. पाक पंतप्रधान नुकतेच म्हणाले, पाकिस्तानजवळ करातून जेवढा पैसा येतो, त्यापैकी अर्धी रक्कम ही व्याजात जाते. आज पाकिस्तानात जनतेला खायला अन्न नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. महागाई तेथे पराकोटीला पोहोचली आहे. पेट्रोल 115 रुपये लिटर झाले आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारही तोडला आहे. तरीही इम्रानने परिषदेत भाष्य करताना, आपला देश युवा असून या बिकट परिस्थितीतून सावरण्यास सक्षम असल्याचे सांगून वेळ मारून नेली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेचा शिष्टाचार काय असतो, हेही इम्रान खानला माहीत नव्हते. कारण, सर्व सभागृह उभे असताना, इम्रान खान आले आणि एकटेच खुर्चीवर बसले. पुन्हा उठले. पुन्हा बसले. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन आले असता, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. पण, इम्रान काही जागेवरून हलले नाहीत. पुतिन जेव्हा इम्रानच्या जवळ आले, तेव्हा त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला असता, पुतिन यांनी त्यांना खालीच बसून राहा, असे सांगितले. सार्या सभागृहात इम्रान खानची नाचक्की झाली.


बिश्केकमध्ये परिषदेच्या आधी, अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केल्यामुळे आमचे पाच जवान शहीद झाले. मोदी बिश्केकमधून परतीच्या वाटेवर असताना, झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर गोळीबार केला. त्यातही पाच जवान शहीद झाले. घटनास्थळी जी शस्त्रे सापडली, ती सर्व पाकिस्तानी आयुध निर्माणीत तयार झालेली असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ पाकिस्तान आता नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवीत असल्याचे दिसत आहे. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तान आता नक्षलवाद्यांकडे वळणे, हा एक नवीन धोका आहे. मागे दहशतवाद्यांकडूनही जप्त करण्यात आलेली शस्त्रे व हातबॉम्ब हे चिनी बनावटीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणजे, बिश्केकमधील जाहीरनामा काहीही म्हणत असला, तरी चीन आणि पाकिस्तान यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे! भारताने झारखंडमधील नव्या घटनेची तातडीने दखल घेण्याची गरज आहे...


No comments:

Post a Comment