Total Pageviews

Thursday 2 October 2014

Swachh-Bharat Abhiyan-स्वच्छ भारतासाठी

स्वच्छ भारतासाठी October 2, 2014 in अग्रलेख Share ! inShare.0आजच्या गांधीजयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची सुरूवात झाली आहे. ही मोहीम अर्थातच प्रतिकात्मक आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या जाणिवेचे बीजारोपण करणे हा या सार्‍या उपक्रमामागील हेतू आहे. गांधीजी हे स्वच्छतेचे भोक्ते होते हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या अंगावर एकच आखूड पंचा असे, पण तो मळका, फाटका नसे, तर स्वच्छ आणि नेटका असे, अशी आठवण त्यांच्या निकटवर्तीयांनी लिहून ठेवली आहे. गांधीजींनी स्वच्छतेचा आग्रह आपल्या लेखनातून आणि प्रार्थनेच्या वेळी दिलेल्या भाषणांतून सातत्याने मांडलेला दिसतो. जे लोक स्वच्छतेचे नियम मोडतात ते आपल्या समाजालाही बदनाम करीत असतात असे स्पष्ट आणि परखड मत गांधीजींनी नोंदवले आहे. ‘रस्त्यावर थुंकू अथवा नाक शिंकरू नये. त्यातून रोगराईचा संसर्ग होऊ शकतो. पान – तंबाखू खाऊन जे रस्त्यावर थुंकतात, ते दुसर्‍याचा विचार करीत नाहीत. एखाद्याने तसे केलेच तर त्यावर निदान माती टाकावी’ असे गांधीजींनी २ नोव्हेंबर १९१९ च्या ‘नवजीवन’ मध्ये लिहिले. आपल्या घरातील स्वच्छतागृह हे दिवाणखान्याएवढेच स्वच्छ असायला हवे असे गांधीजींनी २४ मे १९२५ च्या अंकात लिहिले. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे हा गुन्हा मानला जावा असे १३ सप्टेंबर १९२५ च्या अंकात ते लिहितात. म्हणजेच सातत्याने गांधीजी सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह धरीत आले आणि समाजाला तो आदर्श देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी प्रसंगी झाडू हाती घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. जो मळक्या पायांनी येईल, तो माझ्या मनात प्रवेश करू शकणार नाही, असे गांधीजी उद्गारले होते. एकदा बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटनासाठी ते गेले, तेव्हा तेथील काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरातील गलीच्छता पाहून व्यथित झाले आणि त्याबाबतची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ज्या आदर्श ग्रामजीवनाचे स्वप्न गांधीजींनी पाहिले, त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतेलाही त्यांनी महत्त्व दिलेले आहे. असे गाव जेथे कोणी निरक्षर नसेल, कोणी बेरोजगार नसेल, सर्वांना पुरेसे काम असेल, प्रत्येकाला हवेशीर घर असेल, शरीर झाकणारी खादी असेल, सर्व गावाला आरोग्याच्या व सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे ज्ञान असेल, असा आदर्श गाव गांधीजींना अभिप्रेत होता. दुर्दैवाने स्वातंत्र्याचा अर्थ आपण स्वैराचार असाच घेतला आणि जे जे सार्वजनिक त्याचा वाली कोणी नाही असा समज करून घेतला. परिणामी सार्वजनिक ठिकाणे ही अतिक्रमणे, गलीच्छता यांची आगरे ठरली. गांधीजींनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मशुद्धीचा आग्रह धरला होता. आपले विचार शुद्ध ठेवा, शारीरिक व मानसिक श्रमांमध्ये संतुलन राखा आणि प्रत्येक कामामध्ये स्वच्छता पाळा असा त्यांचा संदेश होता. पाणी, अन्न आणि हवा या तिन्ही गोष्टींची स्वच्छता राखली, तर अनारोग्याची समस्या उद्भवणार नाही आणि केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेपुरतेच पाहू नका तर चोहीकडे तशा प्रकारची स्वच्छता राहावी याची काळजी घ्या असे गांधीजी सांगायचे. आज देशभरात गांधीजयंती साजरी करीत असताना गांधीजींचा सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भातील हा किमान विचार जरी प्रत्येकाने लक्षात ठेवला, तरी ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आपल्यामागे आपले पुतळे उभारू नका असे गांधीजींनी बजावले होते. गांधीवाद नावाची काही चीजच नाही असे तेच म्हणाले होते. त्यामुळे आपल्यामागे आपले देव्हारे माजवले जाऊ नयेत यासाठी दक्ष असलेल्या गांधीजींचा वारसा हा केवळ त्यांच्या विचारांचा वारसा आहे. तो अभिमानाने मिरवण्याऐवजी आपली सुटी वाया गेली असा विचार करणे करंटेपणाचे नाही काय? शेवटी असे उपक्रम हे प्रतिकात्मक असतात. ते सक्तीमुळे नव्हे, तर स्वेच्छेने राबवण्याची प्रेरणा मिळाली, तरच सार्थकी लागतात. गतवर्षी स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीच्या निमित्ताने सार्वजनिक सूर्यनमस्काराचे उपक्रम राबवले गेले. सार्धशती संपली आणि लोक सूर्यनमस्कारही विसरले. गांधीजींच्या ‘स्वच्छ भारता’च्या संकल्पनेचाही असा तोंडदेखला ‘इव्हेंट’ होऊ नये, तर तो आपल्या सार्वजनिक जीवनाचा भाग बनावा, आपल्या सवयीचा भाग व्हावा. तसे घडले तरच गांधीजींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत प्रत्यक्षात उतरू शकेल. अन्यथा केवळ झाडू घेतलेली छायाचित्रेच मागे उरतील महात्मा गांधी यांच्या जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन सफाई मोहिमेची प्रतीकात्मक सुरूवात केली. गांधीजींच्या इ. स. २०१९मध्ये येणाऱ्या दीडशेव्या जयंतीपर्यंत सारा देश स्वच्छ व्हावा, अशी या मोहिमेमागची कल्पना आहे. भारत हा ग​लिच्छ आणि घाण देश आहे, तो केवळ रस्त्यावर थुंकणाऱ्या किंवा गॅलरीतून कचऱ्याचा डबा खाली रिकामा करणाऱ्यांमुळे नाही. भारतीय अस्वच्छतेची ही शिसारी आणणारी पण वरवरची लक्षणे आहेत. अस्सल अस्वच्छ भारत हजारो प्रदूषित नद्या, लाखो खराब पाणवठे, मानवी विष्ठेने भरून जाणारे रेल्वेमार्ग, शौचालये नसल्याने रोज सकाळी उघड्यावर बसणारा निम्मा भारत, अतिसार किंवा हिवतापाने मरून जाणारी लाखो मुले, प्लास्टिकचा रोज टनावारी कचरा तयार करणारी शहरे, प्रदूषके हवेत सोडून निष्पाप प्राण कंठाला आणणारे कारखाने या आणि अशा असंख्य लक्षणांमध्ये सामावला आहे. पंतप्रधानांची मोहीम या लक्षणांवर कितपत आणि किती वेगाने घाव घालते, यावर तिचे यश अवलंबून आहे. महात्मा गांधी होते, तेव्हाही भारतात अस्वच्छता होतीच. पण त्या अस्वच्छतेला आजच्यासारखी आधुनिकतेचा बुरखा पांघरलेली परिमाणे नव्हती. उदाहरणच द्यायचे तर देशात कमावलेल्या चामड्याचे उत्पादन दोन दशके सतत वाढते आहे. ते परकीय चलन देते. चामड्याच्या वस्तूंचा देशांतर्गत वापरही वेगाने वाढतो आहे. त्याला प्रतिष्ठा आहे. मात्र, मुंबईतील धारावी किंवा कानपुरात गेल्यावर या उद्योगाचे प्रश्न व त्यांचे स्वच्छतेशी असणारे नाते कळते. असे देशभरात असंख्य प्रकारचे उद्योग आहेत. गांधीजयंतीला राजधानीत आरंभ चांगला झाला असला तरी ही मोहीम किती खोलवर आणि किती दूरवर जाणार आहे, हे पाहावे लागेल. १२५ कोटी भारतीयांची इच्छाशक्ती जागी झाली तर भारत स्वच्छ होईल, असे पंतप्रधान म्हणाले. ते खरेही आहे. मात्र, स्वच्छतेच्या प्रश्नाशी थेट जोडलेल्या सरकारी यंत्रणा, असंख्य एनजीओ, उद्योग व सेवाक्षेत्र हे 'स्वच्छ' होणार आहेत का, हा कळीचा प्रश्न आहे. या मोहिमेत सरकार देशभर लक्षावधी शौचालये बांधणार आहे. हे पाऊल स्वागतार्ह आहे. हा सगळा कार्यक्रम ६२ हजार कोटींचा आहे. त्यात, विविध कंपन्याही सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी येणार आहेत. मात्र, हे काम पारदर्शक कसे करायचे, याचीही रीत सरकारला शोधून काढावी लागेल. भारताचे ढोबळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) एक कोटी कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यातील, जवळपास साडेसहा टक्के म्हणजे साडेसहा लाख कोटी रुपयांचे उत्पादन अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे वाया जात असावे. ही रक्कम प्रचंड आहे. मात्र, या रकमेपेक्षाही भारतीयांचे प्राण, पर्यावरण आणि जलस्रोत यांची किंमत मोठी आहे. अर्थात, आजच्या अर्थ-युगात ती किंमत रुपये किंवा डॉलरमध्ये काढून दाखविल्याशिवाय तिचे गांभीर्य कळणार नाही. गांधींची स्वच्छतेची कल्पना जमीन सारवणे आणि मैलासफाईपासून सुरू होऊन समग्र पर्यावरणाला वळसा घालून आत्मशुद्धीला जाऊन भिडणारी होती. गांधींच्या मनात या संकल्पनेचे एवढे व्यापकत्व असल्यानेच ती त्यांना कधी कधी देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही महत्त्वाची वाटली. म्हणूनच, गांधींच्या स्वच्छतेच्या संकल्पनेशी नाते सांगणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. पंतप्रधान मोदी यांनी ते उचलले, ही समाधानाची बाब आहे. आता परीक्षा केवळ सरकारची नाही. ती साऱ्या समाजाची आहे. पानाची पिंक टाकण्यापासून केवळ बाटलीबंद पाणीच पिण्यापर्यंत आणि वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकण्यापासून आकाशावर कार्बनची असह्य काजळी धरण्यापर्यंत कशाकशाचा समाज विचार करतो, याची आता परीक्षा आहे. समग्र स्वच्छतेचा रस्ता दिसतो तितका सोपा नाही.

No comments:

Post a Comment