Total Pageviews

Monday 13 October 2014

लाईन ऑफ कन्ट्रोलवर सैनिकाचे जिवन-राहुल कलाल

अपना गाव, घरबार, बीबी बच्चे सबकुछ छोड के एक जवान एलओसी (लाईन ऑफ कन्ट्रोल) पर सर्व्हिस क्यों करता है? पैसों के लिये?..कभी नही.. सिर्फ अपनी मातृभूमी.. देश के लिए.. उसके लिए वो अपने प्राणोंकी भी पर्वा नाही करता।’’ हे शब्द कानी पडताच अंगावर शहारा आला.. आपण घरी निवांत झोपतो.. कोणी आपल्यावर हल्ला करेल, याची भीती नसते.. ते केवळ आपल्या जीवाची चिंता न करता सीमेवर बसलेल्या जवानांमुळे.. आपला देश, पर्यायाने सुरक्षित असतो ते या जवानांमुळे. आतापर्यंत फक्त ऐकतच असलेल्या या शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती येते भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवर.. लाईन ऑफ कन्ट्रोलवर. आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित नसल्याने नैसर्गिक ओढय़ांच्या आधारे तयार केलेली ही एलओसी.. त्यातील इंचन्इंच जमीन देशाकडेच ठेवण्यासाठी आपले जवान ऊन, थंडी, पाऊस, वारा या नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत दिवसरात्र डोळ्यांत तेल टाकून बसलेले असतात. हातघाईचे प्रसंग तर अगदी पाचवीलाच पुजलेले. कधी कुठून गोळी येईल सांगता येत नाही. चित्रपटांमध्ये आणि कोणाकडून उडत-उडत आलेली जवानांची स्थिती ऐकून कधीच काही वाटत नव्हते. पण प्रत्यक्षात त्यांचे जीवन जवळून पाहून.. काही अंशी अनुभवून ते किती खडतर स्थितीत देशाच्या सीमेचे रक्षण करतात, तेसुद्धा कसलीही तक्रार न करता हे दिसून आले. तनामनातील देशभक्तीच त्यांना ही प्रेरणा देते. जम्मूमधील नौशेरा, कलाल, अखनूर आदी सीमावर्ती भाग. गावासारखेच गाव असे वरवर दिसते खरे, मात्र समोर पाकिस्तानचे शस्त्रसज्ज सैनिक असतात व त्यांना हवा तेव्हा गोळीबार करतात हे समजले, की त्यातील थरार लक्षात येतो. नौशेरा येथील झांगर पोस्टमध्ये एलओसी म्हणजे नेमके काय हे समजले. भारतीय सेनेचे एक महत्त्वाचे ठाणे असलेल्या या पोस्टपासून ७ ते ८ कि.मी. अंतरावर एलओसी आहे. रस्ता व वाहन जाण्याची सोय या पोस्टपर्यंतच. तेथून पुढे बंकरपर्यंत जाण्यासाठी चालत जाणे हाच एकमेव पर्याय. पोस्टपासून बंकरपर्यंत जंगलातून जावे लागणार होते. कोणत्याही क्षणी पाकचे सैनिक गोळीबार करू शकतील असे बरोबरच्या जवानांनी सांगितले. त्यांच्याच सूचनेवरून आमच्यातील प्रत्येकाने अंगावर ३-४ किलो वजनाचे बुलेटफ्रूफ जॅकेट, टोप्या चढविल्या होत्या. काटेकुटे, चिखल, दगड, माती तुडवत सलग दोन-अडीच तास जंगलातून सगळे चालत जात होतो. कोणताही रस्ता नाही. आमच्याबरोबर काही जवानही होते. जंगलात सगळीकडे सुरूंग पेरलेले. आंधळेपणाने कोठेही पाऊल ठेवणे धोकादायक. थेट जीवावरच बेतणार. पायाखालची वाट म्हणून कसेही न चालता बरोबरचे जवानही सावधपणेच मार्ग काढत होते. पाकिस्तानी सैनिकांना दिसू नये याचीही काळजी घ्यावी लागत होती. बर्याच वेळाने आम्ही खंबा फोर्ट या बंकरवजा चौकीवर पोहोचलो. तेथून अवघ्या ५00 मीटरवर प्रत्यक्ष सीमारेषा होती आणि त्यापलीकडे पाकिस्तान.. जम्मू-काश्मिरचा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा खंबा फोर्ट म्हणजे तिथल्या गुलाबसिंग महाराजांनी डोंगरावर उभारलेला किल्ला. आत देवीच्या मंदिराशिवाय काहीच नाही. किल्ल्याच्या चारही दिशांना बंकर.. आणि त्यात शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवत बसलेले जवान.. प्रत्येकाची नजर एकदम तेजतर्रार. त्यांच्या साध्या बसण्यातूनही लष्करी बाणा जाणवतो. कर्तव्य बजावताना गप्पा मारणे वगैरे काही नाही. एकटक नजरेने समोर बघत बसावे लागते. समोर काही हालचाल जाणवली, की मनाची खात्री पटेपर्यंत त्याचा शोध घ्यावा लागतो. आम्ही पोहचताच तेथील जवानांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. इतक्या कठीण परिस्थतीत राहूनही एकजात सगळ्या जवानांच्या चेहर्यावर हास्य दिसते. एरवी रस्त्यावर साधे वाहनांच्या गर्दीत सापडलो तरी वैतागणारे आपण, त्या जवानांचे हे हास्य पाहून एकदम हुरूप चढला. एलओसी म्हणजे काय, तिथे बंदोबस्त ठेवायचा म्हणजे काय करायचे हे त्यांच्याकडून समजून घेताना त्यातला थरार जाणवत होता. प्रत्येक जवानाला किमान ३ वर्षांसाठी सीमेवर ‘सर्व्हिस’ करावीच लागते. या तीन वर्षांतील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा केवळ सीमारक्षणासाठीच असतो. २४ तासांतील केवळ ५ ते ६ तासांची झोप त्यांच्याकडे असते. सीमारेषा हा देशाच्या अस्मितेचा भाग असतो. त्यामुळे त्यावर आक्रमण म्हणजे देशावर आक्रमण समजले जाते. त्याच कारणासाठी शत्रूवर फार बारकाईने लक्ष ठेवावे लागते. एलओसीवर प्रत्येक पोस्टपासून पुढे अनेक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या ठाण्यांमध्ये, बंकरमध्ये दररोज जवान जात-येत असतात. तिथेच ते जेवण तयार करतात, राहतात. यासाठी जेवणाचे तांदूळ, डाळ, पीठ, तेल, सिलिंडर डोक्या-खांद्यावर वाहून आणतात. बंकरमध्ये अवघ्या ३ बाय ३ च्या मातकट खोल्यांमध्ये राहणे, अंघोळ नाही.. घरच्यांशी दररोज बोलणे नाही.. त्यामुळेच की काय पण सगळे एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहतात.. या बंकर-चौक्यांवर नवे जीवन उभे करतात. त्यांच्यात परस्परांमध्ये एक प्रकारचा अकृत्रिम असा जिव्हाळा, प्रेम असते. एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती असते. कामात मात्र कसूर नाही. वरिष्ठांच्या आज्ञा काटेकोरपणे पाळणे त्यांच्या अंगवळणी पडलेले दिसते. साधी वाटणारी चूकसुद्धा जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येक जण अत्यंत सावधपणे दिलेले काम करत असतो. डोळ्यांत तेल घालून पहारा करणे म्हणजे काय, याचा अनुभव एलओसीवर आला. यानंतर आम्ही कलाल गावातील डोगरा हिल्स या एलओसीवरील पोस्टला भेट दिली. पूर्णपणे डोंगराळ भागात असलेल्या या पोस्टपर्यंत जाण्यासाठी डोंगर फोडत, चिरत आपल्या सेनेने रस्ते केले आहेत. जिथे पायी चालणेही अवघड तिथे केलेले हे वळणावळणाचे रस्ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. अवघा १0-१५ मीटरचा रस्ता पण प्रत्येक दोन मिनिटांवर वळण.. एकीकडे गर्द झाडी तर दुसरीकडे खोल दरी.. अशा या नागमोडी रस्त्यांवर लष्कराचे मोठे ट्रक आपले जवान अगदी अलगदपणे नेतात. या गाड्यांमध्ये नव्याने बसणार्याला धडकीच भरावी असे हे रस्ते आहेत. या गाड्यांमधून जवानांची, त्यांना लागणार्या साहित्याची ने आण चाललेली असते. जसे जवान तशाच या गाड्याही. दणकट, मजबूत. कठीण खडकालाही खाली बघायला लावणार्या. कसल्याही खड्डय़ातून आरामात वर येणार्या. एलओसी जरी एक असली तरी प्रत्येक ठिकाणी भौगोलिक स्थिती वेगळी. पण या भौगोलिक स्थितीशी कधी झुंज देत तर कधी हातमिळवणी करून जवान सीमारक्षणाचे काम करत असतात. असंख्य अडचणी त्यांना येत असतात. नैसर्गिक आपत्ती तर असतातच, पण इतरही अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागतो. शत्रूबरोबरच्या चकमकी तर सुरू असतातच, पण आजारपण, गावाकडच्या घरांची अडलेली कामे, मुलांचे शिक्षण, सणवार साजरे करता न येणे अशा अनेक मानसिक गोष्टींनाही ते तोंड देत असतात. हा डोगरा हिल्सचा भाग म्हणजे तिन्ही बाजूंनी पाकिस्तान आणि एका बाजूने भारत भूमी.. अशी भौगोलिक स्थिती असलेला भाग. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शत्रुसैन्याला कधीही आपल्यावर हावी न होऊ देता.. कायम त्यांच्या उरात धडकी भरविणारे हे जवान तिथे कसे राहतात.. त्यांची रोजची दिनचर्या काय, हे जवळून पाहायला मिळाले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने लगेचच आक्रमण करीत भारताची ही भूमी काबीज करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे तैनात असलेल्या मूठभर डोगरा जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाक सैन्याशी मुकाबला केला आणि धारातीर्थी पडून आपली भूमी पुन्हा मिळविली. पाकिस्तानपासून हा भाग खूपच जवळ आहे. तिन्ही बाजूंनी पाकिस्तानची भूमी असल्याने इथूनच दहशतवादी घुसविण्याचे प्रकार होत असतात. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस पाक सैन्य आपल्या भागात घुसून जमिनींमध्ये सुरूंग पेरून ठेवू शकतात. त्यामुळे या भागात काम करणार्या जवानांची सुरुवात दररोज आपल्या भागांची विविध उपकरणांद्वारे तपासणी करून कुठे भूसुरूंग पेरून ठेवले आहेत का, याचा तपास करण्याच्या कामानेच होते. गर्द अंधारातील जंगलतपासणी ‘अँम्ब्युश पार्टी’ ही आपल्या एलओसीवर नियुक्त सैन्याची एक खास थरारक अँक्टिव्हिटी आहे. रात्रीच्या अंधारात शत्रुसैन्य आपल्या भागात घुसू नये म्हणून जंगलात तपासणी करणारे पथक म्हणजे ‘अँम्ब्युश पार्टी!’ काळ्या गर्द अंधारात, समोर कोणीही दिसत नसताना, हे काम करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. टीमवर्क म्हणजे काय ते यात कळाले. न बोलताही एकमेकांशी उत्तम प्रकारे कसा संपर्क करता येतो याचे प्रात्यक्षिकच पाहायला मिळाले. सीमारक्षण म्हणजे तोंडचे काम नाही हे त्यातून प्रत्यक्ष गेल्यानंतर लक्षात आले.

No comments:

Post a Comment