Total Pageviews

Friday 26 September 2014

जय हो! भारताच्या मुत्सद्देगिरीची...

जय हो! भारताच्या मुत्सद्देगिरीची...TARUN BHARAT सुषमा स्वराज... भारताच्या परराष्ट्र मंत्री... उंची कमी, गोरा रंग, कपाळावर गोल आणि ठसठशीत कुंकू लावणार्‍या, उत्कृष्ट संसदपटू, परखड वक्त्या, जबरदस्त संवादक, माहीर संघटक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांची पक्की पकड आणि मुत्सद्देगिरीतही वाकबगार. भारतीय जनता पक्षात असताना अनेक जबाबदार्‍या त्यांनी निष्ठेने पार पाडलेल्या आहेत आणि आता सरकारच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांच्या मुत्सद्देगिरीचे दर्शन त्यांनी जगाला दाखवून दिले आहे. विस्तारवादासाठी संपूर्ण जगात कुप्रसिद्ध असलेल्या चीनला त्यांनी चर्चेच्या माध्यमातून झुकविल्याने, पुन्हा एकदा त्यांच्या आणि मोदी सरकारच्या नावाचे नगारे वाजू लागले आहेत. सुषमा स्वराज सध्या न्यूयॉर्क दौर्‍यावर आहेत. विभिन्न राष्ट्रप्रमुखांच्या, परराष्ट्र सचिवांच्या आणि निरनिराळ्या देशातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या त्यांच्या भेटी सुरू आहेत. याच भेटीत त्यांनी सीमा प्रश्‍नाबाबत चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याशी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करून चीनला झुकविले आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीनंतरच लद्दाख सीमेवरील चुमार भागातून चीनने आपल्या सैनिकांना माघारी घेण्याची प्रक्रिया आरंभ केली. बलाढ्य चीनला माघार घ्यायला लावणे हे तितकेसे सोपे काम नव्हते, मात्र सुषमांनी ते लीलया पार पाडले, याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या अभिनंदनासाठी ‘ब्रेव्हो सुषमाजी!’ एवढेच दोन शब्द पुरेसे आहेत. आशिया खंडातील वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांमध्ये चीनचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. चीनमध्ये अंतर्गत परिस्थिती पूरक असली, की चिनी ड्रॅगन विस्तारवादी फूत्कार सोडायला मोकळा असतो. याप्रसंगी मग तो शेजारी देशांनाही घाबरवून सोडायला तयार असतो. चीनच्या याच विस्तारवादाची धास्ती घेऊन जपान, व्हिएतनाम, भारत, सिंगापूर आदी देश आता आपसी सौहार्द वाढवून चीनचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत. कम्युनिस्ट क्रांतीनंतर चीनमध्ये उदयास आलेली व्यवस्था कशी असेल, याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले आहे. चीनचा एकूण जगाशी असलेला व्यापार १९९८ ते २०१२ या काळात तब्बल अकरा पटींनी वाढला आहे. चीनची निर्यात १९९८ मध्ये १८४ अब्ज डॉलर्स होती, ती २०१२ मध्ये २.०५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे; तर या देशाची १९९८ मधील आयात १४० अब्ज डॉलर्सवरून १.८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत तर चीनने जपानच्याही अर्थव्यवस्थेला मागे टाकले असून, जगातील दुसरी आर्थिक महासत्ता म्हणून स्थान पटकावले आहे. येणार्‍या काळात हा देश अमेरिकेच्या अर्थकारणालाही धक्के देणार हे नक्की! विस्तारवादी चीनने जपानलाही त्रस्त करून सोडले आहे. सेनकाकू बेटांच्या मालकीवरून चीन-जपान संबंध ताणले गेले आहेत. त्यांच्या याच धोरणापायी भारतही त्रस्त आहे. लद्दाख क्षेत्रातील चिनी सैन्याची घुसखोरी काही नवी नाही. त्यांच्या कुरापती मधूनमधून सुरूच असतात. कधी अरुणाचलवर दावा कर, तर कधी भारतीय हद्दीत रस्ते बांधकामाच्या निमित्ताने तंबू ठोक. ही त्यांची मुजोरी केवळ अर्थसत्तेच्या बळावरच होत आहे, याकडे जगाचेही लक्ष आहे. गेल्या चार वर्षांमध्ये चीनने पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगितला असून, त्यासाठी चिनी नौदल आक्रमकपणे येथे गस्त घालत आहे. व्हिएतनामच्या दिशेने गेलेल्या काही भारतीय नौकांना चिनी नौदलाने मध्यंतरी अडविले होते. या ना त्या कारणाने चीनची ही दादागिरी चालूच असते. म्हणूनच मोदी सरकारने सत्तेवर येताच, चीनमुळे त्रस्त असलेल्या देशांना आधी भेटी दिल्या. भूतान आणि नेपाळ या लहानशा देशांना भेट देऊन त्यांनी आपली पुढची धोरणे कशी राहतील, हेच चीनला ठणकावून सांगितले. यानंतर त्यांनी जपानचा दौरा केला आणि तेथे मिलियन डॉलर्सचे करार करून, जपानलाही आश्‍वस्त केले. यापुढेही भारताचे धोरण चीनविरोधकांना एकत्र ठेवण्याचेच राहणार आहे. हे करीत असताना भारताने चीनचे महत्त्व कमी होईल अशी कृती केलेली नाही. उलट, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत दौर्‍यावर बोलावून त्यांनी आशिया खंडातील चीनशी मैत्री आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, हेच जगाला दाखवून दिले. पण, चिनी ड्रॅगन काही लेचापेचा नाही. या देशाचे अध्यक्ष भारत दौर्‍यावर असतानाच त्यांच्या सैन्याने चुमार क्षेत्रात घुसखोरी करून, आपण भारताला मुळीच भीक घालत नाही, हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानेही, ‘आम्ही कच्च्या गुरूचे चेले नाही,’ हे चीनला दाखवून दिले आहे. सुषमांच्या यशस्वी चर्चेनंतर चीनचे सैन्य माघारी जाण्यास निघाले असून, येत्या चार-पाच दिवसांत ते चंबुगबाळ्यासह चीनच्या हद्दीत गेलेले दिसेल. ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी’ असे आपण गमतीने म्हणतो, त्याच धर्तीवर आता ‘मुत्सद्देगिरी हो तो सुषमाजी जैसी’ असे गांभीर्याने म्हणता येईल. अशाच प्रकारची मुत्सद्देगिरी भारताने पाकिस्तानच्या बाबतीतही दाखवून, काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशवासीयांना सुखद धक्का दिला होता. भारत-पाकिस्तान यांच्यात सचिव स्तरावरील बातचीत ठरली असताना पाकिस्तानने आडमार्गाने जाऊन, हुर्रियत या भारतातील विघटनवादी पक्षाशी चर्चा केल्याने, भारताने पाकिस्तानशी सुरू असलेली चर्चा खंडित केली होती. त्या कठोर पावलानंतर भारताने आता चीनलाही परखड शब्दांत सुनावून, भारतीय हद्दीतून त्यांचे सैन्य माघारी घेण्यास बाध्य केले आहे. विदेश धोरणातील भारतीय मुत्सद्देगिरीची ही दुंदुभी सर्वत्र पसरून त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून आल्याशिवाय राहायचे नाहीत. भारताच्या या निर्णयामुळे चीनविरोधकांमध्ये भारताची प्रतिमा नक्कीच उंचावणार आहे. घुसखोरीचा तणाव केवळ सीमेवरच नसतो, तो राज्यकर्त्यांवरही असतो, लष्करावरही असतो, प्रशासनावर असतो आणि प्रत्यक्षपणे परराष्ट्र मंत्रालय, गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयावरही असतो. अशा वेळी देशातील जनताही सरकारविरोधात जाते, सरकारला कुचकामी, अकार्यक्षम ठरविते. अशात अंतर्गत संघर्षालादेखील सरकारला सामोरे जावे लागते. पण, सुषमा स्वराज यांनी जमिनीवरील युद्ध, चर्चाचातुर्याने जिंकले आहे. पण, एवढ्याने चीनची आगळीक कमी होईल, असे समजून भारताला गाफील राहता येणार नाही. कारण चीनची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे. त्याला वेसण घालणे अमेरिकेलासुद्धा अजून साध्य झालेले नाही. मजबूत अर्थव्यवस्थेच्या जोरावर ड्रॅगन जगभरातील देशांना भयभीत करीत आहे. चिनी उत्पादनांनी दशोदेशी इतका धुडगूस घातला आहे की, अखेर अनेक देशांना स्वदेशीची आठवण येऊ लागली आहे. फटाके, मिठाया, खेळणी, विजेच्या माळा, आकाशदिवे, विजेची उपकरणे, पादत्राणे, शालेय वस्तू, रंग... आदी अनेक क्षेत्रात चिनी उत्पादनांनी पाश्‍चिमात्य आणि पौर्वात्य बाजारपेठा काबीज करून घेतल्या आहेत. त्या त्या क्षेत्रातील लघुउद्योजकांवर यामुळे रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. चीनमध्ये अत्यल्प खर्चात उपलब्ध असलेला कामगारवर्ग आणि मुबलक कच्चा माल त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी ठेवण्यासाठी साह्यभूत ठरतो. यातूनच चीनने अनेक देशांतील उत्पादन यंत्रणा ठप्प करून टाकल्या आहेत. मुत्सद्देगिरीत दोन पावले मागे जावे लागले म्हणून चीन काही शांत बसणार्‍यांपैकी नाही. भारताने काल जगभरातील उद्योजकांना आमंत्रित करणार्‍या ‘मेक इन इंडिया’ कॅम्पेनचे उद्घाटन करायचीच देरी, चीननेही शांघायमध्ये ‘मेक इन चायना’ कॅम्पेनला शुभारंभ करून दिला. आपण याकडे, चीन घाबरला, या दृष्टीने पाहू. पण, भारताला टक्कर देण्याची तयारी त्याने आरंभिली आहे, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जायला हवे. इकडे मोदी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करीत होते आणि तिकडे ग्वांगझी, शांघाय आणि हॉंगकॉंगमध्ये भारतीय राजदूत तेच कॅम्पेन चिनी जनतेच्या आणि उद्योगपतींच्या गळी उतरवत होते. पण, चीनने भारताच्याच कॅम्पेन कॉपीचा टोपो मारायला कमी केले नाही. कसेही करून चिनी उद्योजक भारतात जायला नको, म्हणून त्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या सवलतींमध्ये वाढ करून देण्याची घोषणाही चीन सरकारने केली आहे. विस्तारवादात चीनला पराभूत करणे तितकेसे सोपे नाही, मात्र चीनविरोधकांनी एकीची मूठ बांधल्यास चीनला वेसण घालणे सहजसाध्य होऊ शकेल

No comments:

Post a Comment