Total Pageviews

Wednesday 23 July 2014

ISRAEL GAZA ATTACK

गाझा पट्टीतील समस्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी इस्त्रायलला जन्मापासून जाणिव आहे की शेजारची मुस्लिम राष्ट्रे त्याला शांतपणे जगू देणार नाही. परिणामी इस्त्रायल सदैव सज्ज असतो. इस्त्रायलला स्वातंत्र्याची ही किंमत द्यावी लागते. आजच्या समस्येची ऐतिहासिक पाळमुळं समजून घेतल्याशिवाय योग्य मत बनवता येणार नाही. अपेक्षेप्रमाणे इस्त्रायलने गाझा पट्टीत पायदळ उतरवले आणि आजपर्यंत या पायदळामुळे जवळजवळ 40 जण ठार तर सुमारे 400 जखमी झालेले आहेत. इस्त्रायलने अलिकडेच इशारा दिला होता की ते या युद्धात लवकरच पायदळाला उतरवतील. इस्त्रायलच्या या निर्णयामुळे गाझा पट्टीतील हिंसाचार वाढेल यात शंका नाही. एका बाजूने इस्त्रायल व `हमास’ या अतिरेकी संघटनेत समझोता करण्याचे आंतरराष्ट्रीय समुदाय प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे इस्त्रायलने या भागात आता पायदळाचा वापर सुरू केला. असा शस्त्रसंधी व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचीव श्री. बान की मून व कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी पुढाकार घेतला आहे. हे दोघे पॅलेस्टाईन प्राधीकरणाचे अध्यक्ष श्री. महमूद अब्बास व `हमास’चे नेते श्री. खलीद मेशाल यांच्याशी सतत चर्चा करत आहे. या चर्चा कतारच्या दोहा शहरात सुरू आहेत. अद्याप तरी या चर्चांना यश मिळालेले नाही. `हमास’ने या आधी इजिप्तने सुचवलेला तोडगा नाकारला होता. सध्या गाझा पट्टीत सुरू असलेली धुमश्चक्री 12 जूनपासून सुरू आहे. इस्त्रायलने सीमेपलिकडून येणारा दहशतवाद संपवण्यासाठी ही कारवाई सुरू केलेली आहे. या दिवशी गाझा पट्टीत स्थायिक झालेले तीन इस्त्रायली लोक नाहीसे झाले. त्याचा सूड घेण्याच्या हेतूने इस्त्रायलने ही कारवाई केली. तसे पाहिले तर दररोज अनेक पॅलेस्टाईन लोक गायब होतात, जे कधीही सापडत नाही. पण ते गरीब असतात व त्यांच्यामागे, त्यांच्या संरक्षणार्थ इस्त्रायलसारखा शक्तीशाली देश नसतो. परिणामी त्यांच्या नाहीसे होण्याची कोणी दखलही घेत नाही. इस्त्रायल सरकारने मात्र केवळ तीन इस्त्रायली नागरिक गायब झाल्याचा वचपा काढण्यासाठी गाझा पट्टीत राहत असलेल्या पॅलेस्टाईन समाजावर अमानुष हल्ले सुरू केले आहेत. तसे पाहिले तर त्या गायब झालेल्या तीन इस्त्राएली व्यक्तींच्या नाहिसे होण्याची जबाबदारी पॅलेस्टाईन समाजाच्या एकाही गटाने घेतलेली नाही. असे असले तरी इस्त्रायली सरकारने `हे कृत्य हमासचे आहे’ असे म्हणत कारवाई सुरू केली. हे कृत्य `हमास’चे आहे असा आरोप करणार्या इस्त्रायलकडे संयुक्त राष्ट्रसंघाने काही पुराव्यांची मागणी केली. पण इस्त्रायलने ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही. या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीतील निरपराध लोक मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत आहे. जर वेळीच हे प्रकार थांबले नाहीत तर यांची प्रतिक्रिया इतरत्र उमटेल यात शंका नाही. आज पॅलेस्टाईन समाजाच्या हक्कांसाठी झगडणार्या विविध गटांमध्ये बरीच एकी झालेली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनीसुद्धा पॅलेस्टाईनमधील गटांचे झालेले ऐक्य मान्य केले. याचा अर्थ असा की जर त्या तीन इस्त्रायली व्यक्तींचे अपहरण पॅलेस्टाईन समाजाच्या अनेक संघटनांपैकी कोणी केले असते तर ही बाब लपून राहिली नसती. पण अद्याप तरी तसे झालेले नाही. याचा अर्थ, या प्रकारात सर्व दोष इस्त्रायलचा आहे व पॅलेस्टाईनमध्ये सर्व संत महंत राहतात, असे समजण्याचे कारण नाही. इस्त्रायलचे हल्ले सुरू आहेत हे जरी खरे असले, तरी दुसरीकडे `हमास’द्वारे इस्त्रायलवर रॉकेटचे हल्ले होत असतात. या रॉकेट हल्ल्यात निरपराध इस्त्रायलीसुद्धा मृत्युमुखी पडत आहेत. अर्थात इस्त्रायल जास्त शक्तीशाली असल्यामुळे त्यांचे हल्ले जास्त तिखट असतात व त्यांच्या हल्ल्यात जास्त हानी होते. इस्त्रायलच्या हल्ल्याचे पडसाद इस्त्रायलच्या संसदेत उमटत आहेत. 9 जुलै रोजी तेथील संसदेचे उपसभापती श्री. मोशे फेग्लीन यांनी पॅलेस्टाईन समाजाच्या तीन सदस्यांना सभागृहातून बडतर्फ केले. या तीन सदस्यांनी इस्त्रायल सरकारच्या गाझा पट्टीतील धेरणांचा निषेध केला होता. इस्त्रायलचा हल्ला 8 जुलै रोजी सुरू झालेला आहे. इस्त्रायलचा हल्ला `हमास’च्या विरोधात सुरू आहे. गाझा पट्टीत अनेक साधेसरळ पॅलेस्टाईन लोक राहत आहे. या समाजाची लोकसंख्या सुमारे 18 लाख आहे. त्यापैकी सर्वच `हमास’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य किंवा समर्थक आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पण इस्त्रायलने सर्व पॅलेस्टाईन समाजाला लक्ष्य केलेले आहे. याला आंतरराष्ट्रीय राजकारणात `सामूहिक जबाबदारीचे तत्व’ असे म्हणतात. मात्र हे तत्व गाझा पट्टीत करत असलेल्या हल्ल्यांच्या समर्थनार्थ वापरता येणार नाही, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यांचा अनेक देश निषेध करत आहेत. असे असले तरी इस्त्रायल स्वतःच्या सुरक्षेबद्दल एवढा संवेदनशील आहे की या हल्ल्यांबाबत कोणता देश आपला निषेध करत आहे व कोणता नाही याची इस्त्रायलला काहीही पर्वा नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव अधिकार विभागाच्या प्रमुख श्रीमती नवी पिल्ले यांनी सांगितले की इस्त्रायलने या संदर्भात जरा विचार करून विधाने केली पाहिजेत. अन्यथा ही विधाने म्हणजे `माणुसकीच्या विरोधातील गुन्हा’ समजला जाईल. याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेत `क्राईम अगेंस्ट हय़ुमॅनिटी’ असे म्हणतात. हा गुन्हा जगाच्या इतिहासात दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जे नाझी अधिकारी पकडले गेले होते त्यांच्या विरोधात प्रथमच लावला होता. आता पुन्हा या गुन्हय़ाची चर्चा सुरू झाली आहे. आज जरी हा संघर्ष फक्त इस्त्रायल व गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन यांच्यात असला तरी जॉर्डनचे राजेसाहेब यांनी भीती व्यक्त केली आहे की जर या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही, तर हा संघर्ष इतर देशांत पसरायला वेळ लागणार नाही. अजून तरी स्थिती फारशी हाताबाहेर गेलेली नाही. जेव्हापासून आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी यात मध्यस्थी करायला सुरूवात केली तेव्हापासून दोन्ही बाजूंनी हिंसाचार व हिंसक हल्ल्यांचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. हे सुचिन्ह समजले जाते. थोडक्यात म्हणजे या समस्येवर लवकरात लवकर उपाय काढला पाहिजे. या सर्व विवेचनामुळे असे वाटण्याची शक्यता आहे की या प्रकारात इस्त्रायल अमानुष देश आहे. फक्त सध्याच्या घटना समोर ठेवल्या तर असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. पण जर इतिहासाची साक्ष काढली तर वेगळय़ा प्रकारे विचार करावा लागेल. मे 1948 मध्ये इस्त्रायल स्थापन झाल्यापासून शेजारची मुस्लिम राष्ट्रे इस्त्रायलचा पाडाव करण्यासाठी टपलेली आहेत. आजपर्यंत या अरब राष्ट्रांनी एकत्रपणे आणि स्वतंत्ररित्या इस्त्रायल नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात चटकन आठवणारी घटना म्हणजे 1967 साली झालेले युद्ध. हे युद्ध इजिप्तच्या नेतृत्वाखाली लढले गेले. यात इस्त्रायलच्या सर्व मुस्लिम शेजारी देशांनी इस्त्रायलवर अचानक पण योजनापूर्वक हल्ला केला होता. याद्वारे इस्त्रायलला बेसावध पकडून नष्ट करण्याचा हा कट होता. पण इस्त्रायलच्या शूर सैन्याने हा हल्ला परतवून तर लावलाच, शिवाय अनेक मुस्लिम देशांच्या सैन्याचे पेकाट मोडले. तेव्हापासून इस्त्रायलची `शूरांचे राष्ट्र’ अशी प्रतिमा जगात पक्की झाली. 1967 च्या युद्धात जरी इस्त्रायलने शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांना सडकून मार दिला, तरी इस्त्रायलला संपवण्याचे त्यांचे प्रयत्न संपले नाही. पॅलेस्टाईन समाजाची संघटना म्हणजे `पॅलेस्टाईन मुक्ती संघटना’. या संघटनेने इस्त्रायलच्या विरोधात जगभर दहशतवादी कृत्ये करण्याचा सपाटा लावला होता. यातील अतिशय घृणास्पद व माणूसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे 1972 साली जर्मनीतील म्युनिक शहरात भरलेल्या ऑलम्पिक सामन्यांच्या दरम्यान पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेने इस्त्रायलच्या खेळाडूंचे केलेले हत्याकांड. एवढेच नव्हे तर पुन्हा एकदा अरब राष्ट्रांनी 1973 इस्त्रायल संपवण्यासाठी इस्त्रायलवर अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा हल्ला इस्त्रायलच्या अतिशय पवित्र सणाच्या दिवशी केला गेला. या दिवशी सर्व ज्यू समाज देवाचे स्मरण करण्यात गढलेला असतो. यामुळे हा हल्ला झाला तेव्हा सुरूवातीला इस्त्रायलची पिछेहाट झाली खरी, पण लवकरच त्यांनी स्वतःला सावरले आणि आक्रमण करणार्या अरब राष्ट्रांना तिखट प्रत्त्युत्तर दिले. तेव्हापासून इस्त्रायल व शेजारची मुस्लिम राष्ट्रे यांचे विळय़ाभोपळय़ाचे सख्य आहे. इस्त्रायलला जन्मापासून जाणिव आहे की शेजारची मुस्लिम राष्ट्रे त्याला शांतपणे जगू देणार नाही. परिणामी इस्त्रायल सदैव सज्ज असतो. इस्त्रायलला स्वातंत्र्याची ही किंमत द्यावी लागते. आजच्या समस्येची ही ऐतिहासिक पाळमुळं समजून घेतल्याशिवाय योग्य मत बनवता येणार नाही. - प्रा. अविनाश कोल्हे….

No comments:

Post a Comment