Total Pageviews

Wednesday 4 June 2014

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान-ब्रिगेडिअर हेमंत महाजन,

नवीन सरकार आणि भारत व्हिएतनाम संबध्द श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन. आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत हे दाखवणारे व भारताच्या विदेश नीतीबाबत सूतोवाच करणारे पाऊल ऊचलेले आहे. यापूर्वी भाजप पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानशी चांगल्या संबंधांसाठी पुढाकार घेऊन उभय राष्ट्रांत संबंधांचे एक चांगले उदाहरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधी परराष्ट्रमंत्री असताना चीनमध्ये जाण्याचा निर्णय वाजपेयींनी घेतला होता. वाजपेयींप्रमाणे मोदी हेही विदेश नीतीबाबत एक पाऊल पुढे टाकून ऐतिहासिक ठसा उमटवणारी कामगिरी करू पाहत असल्याचे दिसते आहे. पण यामुळे लगेच शांतता प्रस्थापित होइल का?भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काय दर्शवतो? चीन/पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांबाबत प्रामाणिक आहे का?. एकाबाजूने चर्चा आणि दुसर्या बाजूने घुसखोरी व दहशतवादास खतपाणी चालु राहिल्यास खर्‍या अर्थाने संबंध प्रस्थापित होऊ शकतील का? जर तुम्हाला युध्द नको असेल तर युध्दाची तयारी करा. येत्या काळात भारत-चीन स्पर्धा अधिक तीव्र होणार. कारण चीनच्या महत्त्वाकांक्षांच्या आड येणारा आशियाई खंडात भारत हा एकमेव देश आहे. म्हणून चीन भारतविरोधी धोरण अवलंबणारच.देशात नवीन सरकार राज्य कारभार सांभाळणार आहे.आपले परराष्ट धोरण आता जास्त आक्रमक करण्याची जरुरी आहे. चीनने व्हिएतनामवर दबाव टाकला होता, परिणाम झाला की, व्हिएतनामने आपला शत्रू असलेल्या अमेरिकेशी मैत्री प्रस्थापित केली. आता व्हिएतनामने दक्षिण चीन सागरात अमेरिकन आरमार ठेवण्यास अनुकूलता दर्शविण्यास सुरुवात केली आहे. चीनने पीत सागर, पूर्व व दक्षिण चीन सागर हे आपले क्षेत्र असल्याचे घोषित केले आहे. चीनच्या या घोषणेला भीक घालण्यास त्या भागातील छोटी राष्ट्रे तयार नाहीत. या सागरातील स्पार्टले व अन्य बेटांवर तसेच तेल क्षेत्रांवरही चीन एकतर्फ़ी अधिकार सांगत आहे, पण त्याला फिलिपीन्स, व्हिएतनाम व अन्य आशिआन राष्ट्रांनी हरकत घेतली आहे. व्हिएतनाम चीनमधे प्रचंड तणाव दक्षिण चीन समुद्राचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. चीनच्या साम्राज्यवादी आक्रमक भूमिकेमुळे व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या वादावर भारताने सावध भूमिका घेतली होती. चीन किंवा व्हिएतनामचा उल्लेख टाळताना भारताने दक्षिण चीनच्या समुद्रात जहाजांना मुक्त संचार करता यावा, असे मत व्यक्त केले होते. ‘हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय नियमानुसार ठराव पारित करून शांततेत सोडविला जावा,’अशी गुळमुळीत प्रतिक्रिया भारताने दिली होती.आपण आपल्या राष्ट्रहितांचे रक्षण केले पाहीजे. या समुद्रातील पार्सल बेटाजवळ चीनने युद्धनौकेवरून व्हिएतनामच्या नौकेवर पाण्याच्या तोफांनी मारा केला. मागच्या आठवड्यात चीनच्या तटरक्षक दलानेही असाच प्रकार केला होता. व्हिएतनाम आणि चीनमधील या सततच्या घटनांमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या युद्धनौकांनी व्हिएतनामच्या नौकांवर केलेल्या पाण्याच्या तोफ्यांच्या मार्‍याचे व्हिडिओ व्हिएतनामने समोर आणले आहेत. चीनच्या मार्‍यात सहा खलाशी जखमी झाले. चीनकडून सतत असे हल्ले होत राहिल्यास स्वसंरक्षणासाठी आम्हालाही प्रत्युत्तर देणे भाग पडेल, असा इशारा व्हिएतनामने दिला आहे. व्हिएतनामने ३ मे आणि ७ मे रोजी ३५ जहाजे पाठविली. या जहाजांनी चीनच्या जहाजांवर १७१ वेळा पाण्याचा मारा केला आहे. व्हिएतनामने चिनी प्रवाशांना स्टेपल व्हिसा दिला जम्मू आणि काश्‍मीरमधील नागरिकांना चीनने स्टेपल व्हिसा दिल्याने मागच्या सरकारने पोकळ निषेधा शिवाय काहीच केले नाही.मात्र जेंव्हा चीनने पासपोर्टवर दक्षिण चीन समुद्रातील काही बेटे स्वतःच्या हद्दीत असल्याचे दाखविली, तेंव्हा व्हिएतनामने चीनच्या प्रवाशांच्या वादग्रस्त पासपोर्टवर शिक्का मारण्यास नकार दिला . यावर मात करण्यासाठी व्हिएतनामने चिनी प्रवाशांना नव्याने स्टेपल व्हिसा दिला आहे, दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर चीनने केलेल्या दाव्यामुळे शेजारी राष्ट्रे अशाप्रकारे चीनला शह देण्याचे प्रयत्न करीत आहेत. चीनने काढलेल्या वादग्रस्त पासपोर्टवर शिक्का मारणे म्हणजे चीनचा दावा मान्य करण्यासारखे आहे. याआधी चीनने भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्‍साई चीन हे स्वतःचे भाग असल्याचे नकाशात दाखविले होते.आपण मात्र शांत होतो. चीनने आता पासपोर्टवर प्रसिद्ध केलेल्या नकाशाला व्हिएतनामसोबत फिलिपाइन्सनेही आक्षेप घेतला आहे. व्हिएतनाममध्ये चीनी कंपन्यांच्या विरोधात १३ मे पासून दंगली सुरू आहेत, त्यात चिनी लोकांचे खूप नुकसान झाले असल्याने द्विपक्षीय संबंधात अडथळे येत आहेत. व्हिएतनाम दंगली भडकवित आहे, असा चीनचा आरोप आहे. अनधिकृत वृत्तानुसार दंगलीत २१ चिनी लोक मारले गेले असून चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात कुमक वाढवल्याने व्हिएतनाममध्ये त्याचे पडसाद उमटले. दोन नागरिकांचा मृत्यू आणि १०० जण जखमी झाल्याचे व्हिएतनामने मान्य केले आहे. तेल उत्खनन होत असलेल्या परिसरात चीनने १६ किमीपर्यंतच्या परिसर आपल्या ताब्यात घेतला असून सुरक्षेसाठी लढाऊ विमाने तैनात केले. चीनने वादग्रस्त प्रदेशातील तेल उत्खनन त्वरित थांबवावे, अशी मागणी व्हिएतनामने केली आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वादामुळे व्हिएतनाममध्ये उसळलेल्या चीनविरोधी दंगलीचा चीनला संताप आला असून, चीनने आज व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांच्या आरमारी नौकांनी ५०० वेळा परस्परांच्या जलक्षेत्रात प्रवेश केला आहे; पण गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत. व्हिएतनाममध्ये चीनविरोधी आंदोलनाने जोर धरला आहे. यामुळे चीनने व्हिएतनाम बरोबरचे द्विपक्षीय कायऱ्क्रम रद्द केले आहेत. चीनच्या तीन हजार कामगारांना व्हिएतनाममधून माघारी आणण्यात आले. चीनच्या नागरिकांविरोधात व्हिएतनाममध्ये हिंसाचार करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले, असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते यांनी सांगितले. चीनला रोखण्याचा एक मार्ग : व्हिएतनाम चीनने फेब्रुवारी १९७९ मध्ये व्हिएतनामवर हल्ला केला. परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी चीनच्या दौर्यावर होते. झालेल्या हल्ल्यामुळे वाजपेयी चीन दौरा अर्ध्यावर टाकून भारतात परतले होते. या युद्धात चीनचे ४० हजार सैनिक, तर व्हिएतनामचे १ लाख सैनिक धारातीर्थी पडले. व्हिएतनामच्या सागरी किनार्यावरही तेल आणि वायूचा शोध घेण्याच्या निमित्ताने कब्जा करण्याचे प्रयत्न चीनने करून पाहिले. संपूर्ण दक्षिण चिनी सागरच नव्हे तर परसेल्स आणि स्प्रेतली द्वीपसमूह घशात घालण्यासाठी चीन व्हिएतनामशी संघर्ष करीत आहे. कारण या दोन्ही द्वीपांमध्ये मुबलक प्रमाणात तेल आणि वायूचा साठा सापडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीन समुद्रातल्या छोटया बेटांच्या स्वामित्वावरून चीन, जपान, फिलिपाइन्स व व्हिएतनाम यांच्यात मतभेद आहेत. या बेटांच्या आसपासच्या समुद्रात तेलाचे साठे असण्याच्या शक्यतेमुळे या बेटांना आर्थिक महत्त्व आहे. परिणामस्वरूप दुसऱ्या महायुध्द काळापासून सशस्त्रीकरणापासून दूर राहिलेला जपान आज आपले लष्करी सामर्थ्य वाढवू लागला आहे. भारतासाठी आता अमेरिका किंवा युरोपपेक्षाही, पूर्व आशिया, जपान, कोरियाचे लष्करी आणि आर्थिकसामर्थ्य महत्त्वाचे ठरणार आहेत.चीनला उत्तर देण्यासाठी भारताला स्वत:च्या ‘खर्या’ मित्रांची फळी उभी करावी लागेल.व्हिएतनाम हे प्रखर राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असलेले राष्ट्र आहे.व्हिएतनामी जनतेत भारताबद्दल एक सहजभाव आणि आत्मीय प्रेमाची भावना दिसून येते. गेल्या शतकात त्याने चीन, फ़्रांन्स आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना पराभूत करून जगाला आश्चर्यचकित करून टाकले होते. भारत व्हिएतनामच्या वायुसेनेच्या पायलटांना प्रशिक्षित करीत आहे. या देशाला गैरपरमाणू क्षेपणास्त्रे देण्याचाही भारताचा विचार आहे. पूर्व आणि दक्षिण-पूर्व क्षेत्रात चीनचे वाढत जाणारे युद्धखोर धोरण आणि आर्थिक प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी व्हिएतनाम हा देश आपला विश्वसनीय मित्र आहे. चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान-ब्रिगेडिअर हेमंत महाजन,ब्रिगेडिअर हेमंत महाजन, NACHIKET PRAKASHAN ,24 YOGSHEM,LAY OUT,SNEH NAGAR WARDHA ROAD NAGPUR -PIN 440015,TELE-0712-2285473,9225210130 , email-nachiketprakashan @gmail.com, www.nachiketprakashan.wordpress.com

No comments:

Post a Comment