Total Pageviews

Friday 7 February 2020

कॉंग्रेसवर अराजकतेचा आरोप...


    दिनांक :08-Feb-2020 
गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे समारोपाचे भाषण केले ते अतिशय समर्पक, समयोचित, मुद्देसूद, अत्यंत अभ्यासपूर्ण होते. महत्त्वाचे म्हणजे विरोधकांना त्यांच्याच आखाड्यात जाऊन लोळविणारे होते. गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांनी देशात ज्या प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण केले आहे, त्याचा फोलपणा जनतेसमोर आणणे आवश्यक होते. काही निवडणूक प्रचारसभांमधून पंतप्रधानांनी हे काम केले असले, तरी लोकसभेच्या सभागृहात या गढूळ वातावरणाचा समाचार घेणे आवश्यक होते आणि त्यात पंतप्रधान शंभर टक्के यशस्वी ठरले, असे म्हणता येईल. देशभरात नागरिकता दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) जो गदारोळ माजवला जात आहे, त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या मनात जे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे, ते पंतप्रधानांच्या या भाषणामुळे दूर होईल, याची आशा आहे.

विरोधकांनी आरोप करणे, सरकारच्या निर्णयांना धारेवर धरणे हे प्रकार लोकशाहीत मान्य असले, तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेस पक्षाने सरकारचा विरोध करता करता, देशाचाही विरोध करणे सुरू केले आहे, हे फार चिंताजनक आहे. हे आत्यंतिक व्यक्तिद्वेषातूनच घडू शकते. एखाद्या व्यक्तीचा द्वेष किती पोसायचा, यालाही काही मर्यादा असते. परंतु, कॉंग्रेस याबाबतीत बेफाम आणि बेभान झाली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची एवढ्यातली वक्तव्ये पाहिलीत की असे वाटते की, हा माणूस अंमली पदार्थांच्या अंमलात तर बोलत नाही ना! जे स्वत:च मर्यादा पाळत नाहीत, त्यांना प्रत्युत्तर देताना मर्यादा पाळलीच पाहिजे असे नाही, याचा वस्तुपाठ भगवान श्रीकृष्णाने जरासंध किंवा दुर्योधनासारख्या दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करताना आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे. असे असतानाही, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींसारख्या मर्यादाहीन, अभिरुचिहीन आरोपांना ज्या शालीनतेने उत्तर दिले, त्याला तोड नाही. शालीतले जोडेदेखील शालीनतेने मारले.
कलम 37035ए रद्द करणे, तीन तलाकविरोधी कडक कायदा करणे आणि रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे हिंदूंच्या बाजूने येणे, या तीनही प्रसंगांत विरोधकांना घरात घुसमटत बसण्यावाचून काहीही करता आले नाही. ज्यांच्यामुळे आपली रोजी-रोटीचालते ती व्होटबँक विस्कळीत होत होती. त्यांना भडकावून भीतीच्या धाकाने आपल्या मागे उभे करणे जमत नव्हते. अशातच या विरोधकांच्या हातात सीएएचे निमित्त सापडले. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केल्याच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून खरेतर हा कायदा यापूर्वीच करायला हवा होता. परंतु, रंग पाहून कळवळा किंवा करुणा येणार्‍या या सरड्यासारख्या राजकीय पक्षांनी तिकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपाच्या सरकारने हे प्रायश्चित्त घेतले नसते तरच नवल होते. धर्माचा त्याग करायचा नाही म्हणून अनन्वित छळ सहन करणार्‍या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील हिंदू आदी अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्याचे अतिशय पवित्र कार्य मोदी सरकारने केले आहे. हे निमित्त करून कॉंग्रेसादी विरोधी पक्षांनी मुसलमानांना समोर करून देशात जो हिंसाचार, जाळपोळ आणि आंदोलन केले आहे, ते देशाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल. कम्युनिस्टांचे सोडून द्या. त्यांना तसे पाहिले तर या देशाशी कसलेच देणेघेणे नाही. परंतु, स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्याचे श्रेय घेण्यात अग्रस्थानी असलेल्या कॉंग्रेसने हे करावे, हे धक्कादायक आहे. तशीही कॉंग्रेसची वैचारिक पातळी खाली घसरली आहे. पण ती इतकी रसातळाला गेली असेल, असे कुणालाच वाटले नाही.
पंतप्रधान आपल्या भाषणात कॉंग्रेसच्या या धक्कादायक व शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या कृत्याचा व्यवस्थित समाचार घेतील, हे अपेक्षितच होते. परंतु, त्यांनी ज्या निर्दयतेने कॉंग्रेसला लोळविले ते मात्र अनपेक्षित आनंद देऊन गेले. स्वत:ला इस्लामी देश घोषित करणार्‍या या तीनही देशांतील धार्मिक अल्पसंख्यकांना भारतात सन्मानाने आश्रय देऊन त्यांना नागरिकत्व दिले पाहिजे, अशी मागणी व विचार पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांनी मांडला होता, त्याचीही आठवण मोदींनी कॉंग्रेसला करून दिली. तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू व पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्यात, परस्पर देशांमधील धार्मिक अल्पसंख्यकांना पूर्णपणे संरक्षण देण्याबाबत जो करार झाला, त्यात नेहरूंनी अल्पसंख्यक हाच शब्द वापरला होता. त्यातही मुसलमानांचा अंतर्भाव नव्हता, हे मोदींनी कॉंग्रेस सदस्यांच्या लक्षात आणून देताच त्यांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते.


या संपूर्ण भाषणात पंतप्रधानांनी आपल्या सरकारची कामे सांगितली, तसेच विरोधकांच्या आरोपांना समर्पक उत्तरेही दिलीत. परंतु, या सर्व वक्तव्यांत त्यांनी कॉंग्रेस पक्षावर केलेला अराजकता निर्माण करण्याचा आरोप फार गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उथळ किंवा निराधार व्यक्तव्यांसाठी प्रसिद्ध नाहीत. अतिशय तोलूनमापून बोलतात. त्यामुळे तर या आरोपाला अधिकच गांभीर्य प्राप्त होते. स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ सत्तेवर राहिलेला कॉंग्रेस पक्ष केवळ आणि केवळ स्वत:ला सत्तेत आणण्यासाठी देशाला अराजकतेच्या मार्गावर ढकलत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले ते निखळ सत्य असले, तरी प्रत्येकाने चिंता करावी असेच आहे. हा आरोप प्रचारसभेतील नाही, हे लक्षात घ्यावे. लोकसभेच्या सभागृहात त्यांनी तो केला आहे. भारतीय लष्कर, निवडणूक आयोग, न्यायपालिका इत्यादी जितके म्हणून लोकशाहीच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे आधार असतील, त्या प्रत्येकांवर कॉंग्रेस पक्षाने आतापर्यंत बेछूट आरोप केले आहेत. जनमानसातील या आधारस्तंभांची विश्वासार्हता कमी होईल, त्यांची प्रतिमा डागाळली जाईल, अशाच हरकती केल्या आहेत. आता ते त्याच्याही पुढे गेले आहेत. देशातील कुठल्याच नागरिकाचा, अगदी मुसलमानाचाही ज्याच्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा सीएएवरून देशातील मुसलमानांना भडकविणे, बाया-मुलांना रस्त्यावर समोर करणे, िंहसाचार, जाळपोळ करणे ही जी कामे कॉंग्रेस करत आहे, ते देशात अराजकता माजविण्यासाठीच आहे, हे कुणालाही लक्षात येईल. पंतप्रधानांनी असा आरोप थेट करून, कॉंग्रेस पक्षाचे अक्षरश: वस्त्रहरण केले आहे. आपण आज जे करत आहोत ते किती देशविघातक आहे, याची ट्युबलाईटपेटायला कॉंग्रेस पक्षाला जितका वेळ लागेल, तितके ते देशासाठी नुकसानदायक ठरणार आहे. कॉंग्रेस पक्षात जे काही थोडेफार जुने-जाणते, परिपक्व नेते आहेत, त्यांनी वेळीच पक्षात सध्या ज्यांची चलती आहे अशा नेत्यांना आवरायला हवे. मग राहुल गांधींना वेगळे आवरण्याची गरज राहणार नाही. आत्मघाताकडे कॉंग्रेसची जी घोडदौड सुरू आहे तिला त्वरित खीळ घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे. देशासाठी आणि स्वत: कॉंग्रेस पक्षासाठीही. कुठल्याही सत्तारूढ पक्षाला असला बावळट विरोधी हवाच असतो. परंतु, कॉंग्रेसमधील ढुढ्‌ढाचार्यांनी तरी आता मौन बसता कामा नये. कुठेतरी विरोधालाही मर्यादा हवी. त्यात व्यक्तिद्वेष नको. सरकारचा विरोध करता करता देशाचा विरोध करण्यापर्यंत मजल नको. याची जाणीव पक्षातील उथळ नेत्यांना करून द्यायला हवी. पंतप्रधानांच्या भाषणातील कोपरखळ्या, टोमणे, घणाघाती वार, शालजोडीतले, इतिहासाचे दाखले वगैरे समजून घेण्याची कुवत आजच्या कॉंग्रेसमध्ये आहे का? ही हिंमत या वयोवृद्धांमध्ये आहे का? हाच खरा प्रश्न आहे आणि देशाची हीच चिंता आहे.

No comments:

Post a Comment