Total Pageviews

Friday, 24 January 2020

पश्चिम आशियातील जीवश्च-कंठश्च संबंध! -VASANT KANE-:तरुण भारत22 Jan 2020क्षेत्रफळाने भारताच्या जवळजवळ दुप्पट असलेला पश्चिम आशिया हा जगातला एक फार मोठा मुस्लिमबहुल भूभाग आहे. पण, मुस्लिमांमधील शिया व सुन्नी यातून विस्तव जात नाही. इथे अल्पसंख्येत का होईना पण ख्रिश्चन, टोळीवाले व यहुदी हेही आहेतच. या सर्वांचे एकमेकांशी जीवश्च-कंठश्च संबंध आहेत! ते या अर्थी की, एक जीव घेणार, तर दुसरा कंठ चिरणार!!
या भागात जगातले तीन मोठे धर्म उदयाला आले आहेत. ख्रिश्चन (बायबलला मानणारे), इस्लाम (कुराणालाच अनुसरून आचारविचार करणारे), ज्यूडाइझम (समान वंशाचे असलेले, तसेच धर्म, संस्कृती व कायदा यांची एकच परंपराही असलेले आणि परमेश्वर आणि इस्रायलची लेकरे यातील करारालाच शाश्वत मानणारे) असे हे धर्म आहेत. या सर्वांसाठीच (ज्यू, मुस्लिम तसेच ख्रिश्चन) पवित्र शहर म्हणजे जेरुसलेम. जगातील अतिशय जुने शहर असलेल्या या शहरावर अधिकार कुणाचा, याबाबत वाद व संघर्ष या तीन धर्मीयांत सुरू असून तो नजीकच्या भविष्यकाळात तरी शमण्याची चिन्हे नाहीत, सगळेच मुस्लिम देश तरीही.
मुस्लिमांमधील आपापसातील व इतरांशीही असलेल्या वैराला तोड सापडणार नाही. काही बोलकी उदाहरणे हा मुद्दा अधिक स्पष्ट करतील.
इराण
१९७९ मध्ये इराणमध्ये क्रांती झाली आणि पर्शियन राजवट जाऊन इस्लामिक रिपब्लिकचा जन्म झाला. ८ कोटी लोकसंख्येत ९९.४ टक्के मुस्लिम असून मुस्लिमांमध्ये ९० टक्के शिया आणि केवळ १० टक्के सुन्नी आहेत. क्रांती झाल्याझाल्याच तेहरानमधील अमेरिकन दूतावास इराणने ताब्यात घेतला. नंतर प्रकरण निवळले, तरी तेव्हापासूनच (मधला लहानसा कालखंड सोडला तर) अमेरिका व इराणमधून विस्तव जात नाही. अमेरिकेने केलेली जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या व इराणचे अमेरिकी तळांवरचे जबाबी रॉकेटहल्ले पाहता, इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कोणते टोक गाठणार, ही चिंता सर्व जगाला भेडसावत होती. मात्र, हे प्रकरण सध्यातरी काहीसे निवळले आहे.
इराक
इराकमध्ये ४ कोटी लोकसंख्येपैकी ९५ टक्के मुस्लिम, ख्रिश्चन एक टक्का आणि अन्य ४ टक्के आहेत. यात शिया अरब, सुन्नी अरब, कुर्द मुस्लिम, असायरियन, यझदी आणि तुर्कमन अशी खिचडी आहे. तीही सर्वत्र सारखी विभागलेली नाही. आपापल्या कप्प्यात ते ते घटक बहुसंख्येत आहेत. पण, पूर्वी शिया ५१ टक्के व सुन्नी ४२ टक्के, अशी मुस्लिमांची ठोकळमानाने विभागणी सांगता यायची. पण, आतातर हेही नक्की नाही. कारण डिसेंबर २००६ च्या आसपास, शियाबहुल इराकमधील सुन्नी शासक सद्दाम हुसेनच्या पतनानंतर इराकमधून सुन्नींचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले असून, एका अंदाजानुसार आता शिया ६०, सुन्नी ३०, ख्रिश्चन ५, यझदी २ व अन्य ३ अशी लोकसंख्येची टक्केवारी आहे. हे आकडे कितपत विश्वसनीय मानायचे? पण, इराकमध्ये किती मोठ्या प्रमाणात लोकसंख्याविषयक उलथापालथ झाली असावी, याची कल्पना येण्यास ते पुरेसे वाटावेत/ठरावेत, असे आहेत. एक नक्की आहे की, आजच्या इराकमध्ये शियांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत जास्त झाले आहे.
सीरिया
सीरियाची आजची लोकसंख्या एक कोटी ७५ लाख असून त्यात ८७ टक्के मुस्लिम व मुस्लिमांत सुन्नी ७४ टक्के, तर शिया १३ टक्के अशी विभागणी आहे. २०१२ मध्ये सीरियाची लोकसंख्या दोन कोटी २५ लाख होती. हे आकडे प्रमाण मानले, तर कमी झालेल्या ५० लाख लोकांपैकी अनेक एकतर मृत्युमुखी पावले असले पाहिजेत िंकवा त्यांनी युरोपात स्थलांतर केले असले पाहिजे. शासक, बशर हफीज अल्‌-असद (िंसह) हे अलावाईट पंथी असून ते स्वत:ला शिया मानीत असले, तरी ते काही ख्रिश्चन व काही झोरास्ट्रियन सण पाळणारे आहेत. इसिसचा धुमाकूळ मुख्यत: सीरियातही सुरू होता. स्थलांतर करणार्‍यांत सुन्नींचे प्रमाण खूपच जास्त आहे. ही प्रचंड संख्या पाहता, हा इसिसने युरोपावर टाकलेला पॉप्युलेशन बॅाम्ब मानला जातो. शिवाय, यात जसे शरणार्थी आहेत तसे छुपे दहशतवादीही आहेत. संपूर्ण युरोप या पॅाप्युलेशन बॅाम्बमुळे दोन प्रकारे बेजार झाला आहे. यातील दहशतवाद्यांनी जसा युरोपभर उच्छाद मांडला आहे तसेच जे खरे निर्वासित आहेत, त्यांच्या पालनपोषणाच्या खर्चामुळे अनेक देशांची अंदाजपत्रके पार कोलमडली आहेत. आणखी नोंद घेण्याचा मुद्दा हा आहे की, ५० पेक्षा जास्त मुस्लिम देश असूनही ते या निर्वासितांना आसरा देण्यास उत्सुक नाहीत व हे निर्वासितसुद्धा तिथे आश्रय घेऊ इच्छित नाहीत. यावर टिप्पणी करण्याची आवश्यकता आहे काय?
कुवेत
कुवेतमध्ये ४५ लाख लोकसंख्येपैकी मुस्लिम ७४, ख्रिश्चन १८, हिंदू ८ अशी टक्केवारी आहे. मुस्लिमांत सुन्नी ६१ तर शिया ३९, अशी ठोकळमानाने टक्केवारी आहे. त्यांच्यात हाणामार्‍या होत असतात.
लेबॅनॉन
लेबॅनॉनमध्ये ६१ लाख लोकसंख्येपैकी मुस्लिम ५४ व ख्रिश्चन ४१ (हो ख्रिश्चन बरं!) अशी टक्केवारी आहे. शिया व सुन्नी यांच्या टक्केवारीबाबत वेगवेगळे आकडे सांगितले जातात. त्यानुसार शियांची संख्या ३० ते ४० टक्के व उरलेले सुन्नी आहेत. इथे त्रिकोणी संघर्ष होत असतो.
तुर्कस्तान
तुर्कस्तानमध्ये ८ कोटी लोकसंख्येपैकी ९८.३ टक्के मुस्लिम, ०.२ टक्के ख्रिश्चन आहेत. मुस्लिमांत ८०.५ टक्के सुन्नी व शिया १६.५ टक्के आहेत. येमेनमध्ये ३ कोटी लोकसंख्येपैकी ५३ टक्के सुन्नी व ४५ टक्के शिया व अन्य २ टक्के आहेत. सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातमध्येही अनुक्रमे ३.५ कोटी व ९.७ कोटी मुस्लिम असून व नागरिकत्व फक्त मुस्लिमांनाच दिले जात असूनसुद्धा धुसफूस व धुमसणे सुरूच आहे.
कट्‌टर कुर्द
सुन्नी व शिया यांत परंपरागत हाडवैर असून, एकमेकांना नष्ट करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. याशिवाय कुर्द जमात सुन्नीबहुल आहे. जोडीला अन्य टोळ्या आहेतच. त्यापैकी कुर्दांचा प्रश्न अगदी वेगळा आहे. इराक, लेबॅनॉन, सीरिया, ट्युनिशिया, तुर्कस्तान इत्यादी देशांत कुर्द जमात आपली वेगळी ओळख राखून आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, प्राचीन काळच्या आसिरियन शहराचे म्हणजेच निनेव नावाच्या शहराचे ते मूळ निवासी आहेत. ही जमात आटोमन साम्राज्याचे तुकडे झाल्यावर वेगवेगळ्या राज्यांत विभागली गेली आहे. आटोमन साम्राज्यातील कुर्दबहुल भागाला वर्तुळाची उपमा दिली, तर या वर्तुळाचे चतकोर किंवा नितकोर आकाराचे तुकडे वेगवेगळ्या राष्ट्राचे भाग बनले आहेत. या सर्व भागात भौगोलिक सलगता जशी आहे तशीच कुर्द जमात या नात्याने भावनिक निकटताही आहे. सर्व कुर्द जमातीचे एक राष्ट्र असावे, अशी आकांक्षा बाळगून या जमाती त्या त्या राष्ट्रांत उठाव करीत असतात. कुर्द लोकांचा इसिसलाही विरोध आहे. त्यामुळे आपापले देश व इसिस या दोघांशीही ते लढत असतात आणि दोघांकडूनही मार खात असतात. ही जमात अतिशय कडवी असून आज ना उद्या आपले स्वतंत्र राष्ट्र होईलच, या विश्वासाच्या भरवशावर हे पठ्ठे दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत. यांची पश्चिम आशियातील एकूण संख्या ३ कोटी इतकी आहे. यांच्यामुळे निर्माण झालेली खदखद, हेही एक कायमचे दुखणे होऊन बसले आहे.
प्रचंड व सुलभ तेलसाठे- तसे पाहिले तर या भूभागाला निसर्गाने भरभरून दिले आहे. वैराण वाळवंटावरचा उतारा म्हणून इथला खनिज तेलासारखा, हेवा वाटावा असा, शक्तिस्रोताचा सागर भूतलावरील सागराला मागे टाकतो आहे. पण, हे वरदानही शापच ठरले आहे. बुभुक्षितांच्या नजरा यामुळेच या भागाकडे वळल्या आहेत. यात मुख्यत: पाश्चात्त्य देश आहेत.
हुकुमशाही राजवटी पश्चिम आशियातील बहुतेक देशांत हुकुमशाही असल्याचे दिसून येते. जिथे लोकशाही आहे, ती नावापुरतीच असल्याचे दिसते. जुलुम, जबरदस्ती, मुस्कटदाबी, शोषण, स्त्रीकडे पाहण्याचा अनुदार दृष्टिकोन, अमानवीय शिक्षा, वैराची सांगता कुणातरी एकाच्या संपण्याने व्हायची, अशी रीत/परिपाठी, यामुळे पश्चिम आशिया हा एक शापित भूभाग तर नाही ना, अशी शंका भल्याभल्यांना म्हणूनच सतावत असते.


No comments:

Post a Comment