Total Pageviews

Wednesday 10 July 2019

सफाई पाकिस्तानची, सफाया ख्रिश्चनांचा!-महा एमटीबी 10-Jul-2019- संतोष कुमार वर्मा (अनुवाद : महेश पुराणिक) ख्रिश्चनांविषयीच्या अपमान आणि घृणेचे भाव पाकिस्तानात फार खोलवर रुजलेले आहेत.


 आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही घृणा थांबविण्यासाठी इथे कोणताही कायदा नाही. उलट तेथील सरकारच स्वच्छता कर्मचारी वा झाडू मारण्याचे काम करणार्‍यांमध्ये ख्रिश्चनांचीच भरती करू इच्छिते.

जूनअखेरीस ब्रुसेल्स दौर्‍यावर असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी देशातील ख्रिश्चनांच्या उत्पीडनाचे सर्व आरोप फेटाळून लावले. कुरेशी यांनी असाही दावा केला की, संबंधित घटना वैयक्तिक स्वरूपाच्या असून त्यांची तुलना ब्रिटनमधील चाकूबाजीसारख्या घटनांशी केली जाऊ शकते. सोबतच पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा प्रघात नाही आणि ख्रिश्चनांवरील अत्याचाराचे दावे पाश्चात्यांच्या हितसंबंधांचे उदाहरण आहे. तसेच पाकिस्तानची ओळख विशिष्ट पद्धतीने चित्रित करण्याची मनिषा बाळगणार्‍यांचे हे काम असल्याचेही ते म्हणाले.

तथापि, पाकिस्तानी माध्यमांनी मात्र कुरेशींचे म्हणणे खोटे ठरेल अशी बातमी नंतर दिली. लष्कराच्या एका जाहिरातीत केवळ ख्रिश्चनांची स्वच्छता कर्मचारी पदावर भरती करण्यात येईल,’ असे लिहिले होते व त्यासाठी अर्जही मागवण्यात आले. ही जाहिरात पाकिस्तानी लष्कराच्या मुजाहिद फोर्स युनिटने जारी केली होती. समाया वृत्तवाहिनीनुसार मुजाहिद फोर्सने वाहनचालक, शिपाई आणि ट्रेडमॅन पदांसाठीही जाहिरात दिली होती. मात्र, त्या पदांसाठीच्या जाहिरातीमध्ये धर्माचा कोणताही निकष नव्हता, जो स्वच्छता कर्मचार्‍यांशी संबंधित जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आला होता आणि नेमकी हीच गोष्ट तेथील माध्यमांनी समोर आणली.

दरम्यान, धार्मिक अल्पसंख्याकांच्या आयुष्यातील समस्या पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच सुरू झाल्या. ब्रिटिशांनी भारतातून पाय काढल्यानंतर फाळणीपश्चात पाकिस्तान नवीन देश म्हणून अस्तित्वात आला. पाकिस्तानने स्थापनेपासून एका इस्लामिक राज्याचे रूप धारण केले आणि त्याचे परिणाम बिगरमुस्लिमांना भोगावे लागले. ‘अहमदियासमुदायाला देशात संवैधानिक सुधारणेद्वारे बिगरमुस्लीमठरवले गेले. सोबतच इस्लामला मानणारे शिया,’ ‘हजाराआणि जिकरीसारखे समुदायदेखील आपल्या मौलिक अधिकारांपासून वंचितच राहिले. अशा परिस्थितीत हिंदू आणि ख्रिश्चनांसमोर अडीअडचणी-संकटांची मालिका किती मोठी असेल, याची कल्पना करता येईल.

पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांना वसाहतवादी भूतकाळातले अवशेष मानले जाते. तथापि, इथल्या ख्रिश्चनांमध्ये तत्कालीन ब्रिटिश सत्तेचा वारसा वगैरे तर दिसत नाही, उलट ते हलाखीचे जीवन जगण्यासाठी लाचार असल्याचेच समजते. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येपैकी ख्रिश्चनांची टक्केवारी केवळ दोन टक्के इतकी आहे, तर आकडेवारीच्या भाषेत ती संख्या ३० ते ५० लाखांवर असल्याचे दिसते. तसेच यात प्रोटेस्टंट आणि कॅथलिकांची संख्या जवळपास समसमान असल्याचेही समजते. परंतु, ख्रिश्चनांच्या लोकसंख्येचे सर्वाधिक केंद्रिकरण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असून तिथे एकूण ख्रिश्चन लोकसंख्येपैकी ८० टक्के लोक राहतात. सिंधमध्ये १४ टक्के, उत्तर-पश्चिम सीमेवर चार टक्के, तर बलुचिस्तानात दोन टक्के ख्रिश्चनांचे वास्तव्य आहे.

पाकिस्तानी ख्रिश्चनांमधील एक भाग उत्तम शिक्षणामुळे आपल्या सामाजिक आणि आर्थिक दुर्दशेवर मात करण्यात यशस्वी झाला असला,तरी दुसरा मोठा भाग आजही वंचित आयुष्य जगण्यासाठी हतबल आहे. ही लोकसंख्या पाकिस्तानच्या आर्थिकच नव्हे, तर सामाजिक उतरंडीतही सर्वात खालच्या पायरीवर आहे. यापैकी मोठ्या प्रमाणावरील लोक स्वच्छता कर्मचारी आणि कचरा गोळा करणे वा अन्य रोजंदारीवरील कामे करतात. २०१३ सालच्या वर्ल्ड वॉच मॉनिटरच्या सर्वेक्षणातून काही गोष्टी समोर आल्या होता. या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील प्रमुख शहरांतील सफाई कामगार आणि साफसफाईशी संबंधित नोकर्‍यांत ख्रिश्चनांची संख्या आपल्या लोकसंख्या टक्केवारीच्या तुलनेत अधिक होती.

सोबत लाहोरमधील सुमारे ७० टक्के स्वच्छता कर्मचारी ख्रिश्चन होते, तर कराचीतील त्यांची संख्या ८० टक्के होती. ‘वॉटर अ‍ॅण्ड सॅनिटेशन एजन्सीजमध्येही अशीच स्थिती आहे. सांडपाणी व्यवस्थेमध्येही जवळपास ९० टक्के लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे. शिवाय ही सगळीच माणसे आपल्या कामाच्या ठिकाणी धोकादायक परिस्थितीचाही सामना करतात. सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा बंद पडल्यास या श्रमिकांना कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय घाण आणि विषारी पाण्याने भरलेल्या मॅनहोलमध्ये जमिनीपासून ३० ते ५० फुटांखाली उतरावे लागते.हेच या लोकांच्या आयुष्यातील भयंकर संकट असून अनेक स्वच्छता कर्मचार्‍यांनी यात आपला जीवही गमावला आहे.

जानेवारी महिन्यातच खैबर पख्तुनख्वा प्रांतात स्वाबी जिल्हा परिषदेने दिलेल्या एका जाहिरातीनेही मोठ्या प्रमाणावर या विषयाकडे लक्ष वेधले होते. या जाहिरातीतही अशीच लाजिरवाणी अट ठेवण्यात आली होती की, जिल्हा रुग्णालयातील सर्व सफाई कामगार ख्रिश्चनच असावेत. सोबतच जिल्हा परिषदेने असेही म्हटले की, झाडूवाल्यांच्या पदावर काम करणार्‍या मुस्लीम कर्मचार्‍यांना तेथून हटवून शिपाई वा सुरक्षारक्षकाच्या ठिकाणी नियुक्त केले जावे. या व्यवहारातून हे स्पष्ट होते की, या पेशाकडे आणि त्याद्वारे जीवन जगणार्‍या लोकांना किती वाईट व खालच्या नजरेने पाकिस्तानमध्ये पाहिले जाते.

ख्रिश्चनांविषयीच्या अपमान आणि घृणेचे भाव पाकिस्तानात फार खोलवर रुजलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही घृणा थांबविण्यासाठी इथे कोणताही कायदा नाही. उलट तेथील सरकारच स्वच्छता कर्मचारी वा झाडू मारण्याचे काम करणार्‍यांमध्ये ख्रिश्चनांचीच भरती करू इच्छिते. पाकिस्तान सरकारने महानगर प्रदेशातील स्वच्छता राखण्यासाठी कोणत्याही आधुनिक प्रणालीचा विकास केलेला नाही. परिणामी,ख्रिस्तानुयायी सफाई कामगार नोकरदारांना अतिशय अनारोग्यकारक परिस्थितीत कचरा गोळा करणे आणि तो वाहून नेण्याच्या कामासाठी परावृत्त केले जाते.

हा कचरा अनेक संक्रामक रोगांचाही स्रोत आहे आणि बहुसंख्य सफाई कामगारांना श्वसन आणि त्वचाविषयक समस्या उद्भवतात. सोबतच यातील कित्येक लोक ट्युबरक्युलोसिसहेपेटायटिस बीने पीडित आहेत अन् या त्रासाचा कोणताही अंत नाही. यातल्या बहुतेक कर्मचार्‍यांना पूर्ण कर्मचार्‍यांचा दर्जादेखील मिळालेला नाही. अस्थायी कर्मचार्‍यांच्या रूपात काम करत असल्याने कोणत्याही सामाजिक सुरक्षेचेही त्यांना अधिकार नाहीत. इतकेच काय तर त्यांना सरकारी कर्मचारीही समजले जात नाही आणि त्यामुळे त्यांना सरकारी कर्मचार्‍यांसाठी उभारलेल्या रुग्णालयात उपचारही घेता येत नाहीत.

इस्लाममध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असले, तरी पाकिस्तानमध्ये त्या कामाला उपेक्षेच्या दृष्टीनेच पाहिले जाते. तसेच एका अर्थाने पाकिस्तानच्या स्वच्छतेची जबाबदारी इथल्या ख्रिश्चन समुदायाला देण्यात आल्याचे दिसते. आज पाकिस्तानातील या भेदभावाचे सर्वात मोठे कारण पुरातन हिंदू जातीव्यवस्थेला मानले जाते. परंतु, पाकिस्तानने सुरुवातीपासून इस्लामी राज्यपद्धतीचा स्वीकार केला.सोबतच इस्लामी न्यायशास्त्रात औपचारिक अस्वच्छतेच्या धारणेला अस्थायी मानले जाते. त्यामुळे ते कसे एखाद्या धर्माच्या आधारे जन्मजात आणि स्थायी मानले गेले, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.



No comments:

Post a Comment