Total Pageviews

Sunday 24 December 2017

शनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानची बाजू सावरून धरली आहे, पाकिस्तान असे करूच शकत नाही, असा दावा त्यांनी ज्या ठाम विश्वासाने केला आहे

नुकत्याच पार पडलेल्या गुजरातच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेजारच्या पाकिस्तानशी संगनमत करून षडयंत्र रचल्याच्या त्या आरोपात तथ्य होते की राजकारण, हा प्रश्न चर्चेचा अन् वादाचाही असू शकेल. त्यावरून संसदेत रणकंदन माजविण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीचेही एकवेळ समर्थन करता येईल. परंतु, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानची बाजू सावरून धरली आहे, पाकिस्तान असे करूच शकत नाही, असा दावा त्यांनी ज्या ठाम विश्वासाने केला आहे, ते बघता अब्दुल्ला भारताचे कमी अन् पाकिस्तानचेच नागरिक अधिक वाटतात. या मुद्यावर विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देण्याचे निमित्त साधून, ज्या निर्लज्जपणे त्यांनी पाकड्यांची तळी उचलून धरली आहे, त्याला तर तोडच नाही!


भारतात राहायचं, इथलंच खायचं, इथल्या लोकांनी विश्वासानं हाती सोपवलेल्या सत्तेच्या जोरावर सारी पदं आणि सुविधा शानशौकतीनं उपभोगायच्या आणि वेळ आली की, गरळ ओकायची तीही इथल्याच लोकांविरुद्ध. बोटं मोडायची ती याच देशाच्या नावानं. गुजरातच्या निवडणुकीचे ‘निकाल’ लागले तरी त्याचे कवित्व काही अद्याप संपलेले नाही. वेगवेगळ्या स्तरावरून त्याचे विश्लेषण चालले आहे सध्या सर्वदूर. भाजपाला शंभरचा आकडा गाठता आला नाही इथपासून तर काँग्रेसला मिळालेल्या कथित ‘घवघवीत’ यशापर्यंत... सार्‍याच बाबींचे चर्वितचर्वण सध्या सुरू आहे. त्यातल्या त्यात भाजपाने काँग्रेसवर केलेल्या ‘त्या’ गंभीर आरोपाचीही चर्चा चाललीय् जिकडे तिकडे. निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून जे जे डाव खेळावे लागतात, ज्या ज्या राजकीय चाली चालाव्या लागतात, त्यातील झाडून सार्‍या तिरकस चालींना यंदाच्या गुजरात निवडणुकीच्या मुहूर्तावर कसे उधाण आले होते. प्रयत्नपूर्वक जुळवल्या गेलेल्या जातीच्या समीकरणापासून तर पाटीदारांच्या ‘हार्दिक’ शुभेच्छा मिळविण्यासाठी ‘युवराजांनी’ केलेल्या धडपडीपर्यंत, सार्‍याच गोष्टी जगजाहीर झाल्या असताना त्यात भर म्हणून की काय पण, काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या घेतलेल्या भेटीचा वृत्तांत उजेडात आला अन् काँग्रेसच्या राजकीय षडयंत्राच्या घसरलेल्या स्तराचीही कल्पना जगाला आली. यातील सत्यापसत्याची वस्तुस्थिती येईल लवकरच समोर. तेव्हा कळेलच जगाला तिथे नेमके काय घडले होते. तोवर या आरोपाचा इन्कार करण्याचा पूर्ण अधिकार काँग्रेस नेत्यांना आहे. तो कुणी अमान्य करण्याचे कारण नाही. या मुद्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे तक्रार करून आपली तीव्र नाराजी व्यक्त करण्याची बाबदेखील त्यांचा अधिकार आणि पद्धत मान्य करून स्वीकारली पाहिजे. अगदी या मुद्यावरून संसदेत सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची कल्पनाही संसदीय अधिकारांचा भाग म्हणून उदार मनाने स्वीकारली पाहिजे.


पण फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानची बाजू घेणे, याचे समर्थन कसे करायचे? पाकिस्तान असे कुठलेच कट रचत नाही, अशी ग्वाही अब्दुल्लांनी काश्मिरात बसून देण्याचे प्रयोजनच काय होते? कुठल्या आधारावर दिली त्यांनी ही हमखास ग्वाही? भारतीय भूमीत राहून पाकिस्तानची जी-हुजुरी करण्यात धन्यता मानण्यात ज्यांचे आयुष्य चालले आहे आणि तरीही राजकीय लाभांचा उपभोग घेण्यासाठी मात्र ज्यांना भारतात राहण्याचा मार्ग नाइलाजाने पसंत करावा लागतो, त्या अब्दुल्लांचा इतिहास तमाम भारतीयांना ठावूक आहे. त्यांच्या मनात रुजलेले, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कायम प्रदर्शित होत राहिलेले पाकिस्तानविषयीचे प्रेमही कधीच लपून राहिलेले नाही आणि तरीही त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचे अन् काश्मीरची सत्ता त्यांच्या हातात सोपवून काश्मीरचा झालेला तमाशा दुरून बघत राहण्याचे तेथील जनतेनेही कधी सोडले नाही. त्याचाच परिणाम हा आहे की, आज पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेले एखादे विधानही अब्दुल्लांना जरासेही सहन होत नाही. तसे घडलेच कधी तर त्यांचे पित्त खवळून उठते. पाकविरुद्ध जरासे कुणी काही बोलले की लागलीच हे इकडे पेटून उठतात. गुजरात निवडणुकीतील पाकिस्तानच्या सहभागाबाबतच्या, त्यांनी रचलेल्या कटासंदर्भातील भाजपाच्या आरोपाबाबतही नेमके हेच घडले.



खरं तर काँग्रेसचे काही नेते आणि पाकिस्तानातील काही उच्चाधिकारी यांची छुपी भेट झाल्याची बाब कुणीच नाकारत नाहीय्. अगदी काँग्रेसही नाही. फक्त या भेटीत गुजरात निवडणुकीसंदर्भातील कट रचला गेला की नाही, याबाबतची शंका उपस्थित केली जात आहे. पण, या कटाचा पाकिस्तानच्या उच्चाधिकार्‍यांनी त्वेषाने इन्कार करावा अशा थाटात, तेवढ्याच तीव्रतेने अब्दुल्लांनी तिकडच्या बाजूने किल्ला लढवला. काल भारतीय जनतेसमोर. म्हणाले, ‘‘पाकिस्तान कभी ऐसी साजीश नही करता’’. तोंड बघा यांचं. म्हणे पाकिस्तान कधी असले षडयंत्र रचत नाही अन् ग्वाही कोण देतंय् तर फारुख अब्दुल्ला? खलिस्तानच्या मागणीवरून पंजाबात उठलेले वादळ असो की काश्मिरातली फुटीरतावाद्यांची वळवळ, यात पाकिस्तानची भूमिका नसल्याची खात्री कोण देईल? काश्मिरातील तरुणांना फूस लावून दहशतवाद्यांच्या खेम्यात जमा करण्याच्या योजनेला अर्थसाहाय्य कुठून प्राप्त होते? मुंबईतला २६/११ चा हल्ला दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला होता. त्यात पकडल्या गेलेल्या अजमल कसाबने चौकशीच्या काळात दिलेल्या माहितीच्या गांभीर्याची कल्पना नसलेले लोकच पाकधर्जिणी भाषा वापरत, असली निलाजरी ग्वाही देऊ शकतात. योगायोगाने काल ही ग्वाही फारुख अब्दुल्लांनी दिली एवढेच! फार खोलवर विश्वास आहे अब्दुल्लांना पाकिस्तानबाबत. उगाच का मोठ्या रुबाबात म्हणाले ते की, पाकिस्तान कधीच असे षडयंत्र रचत नाही म्हणून. इथून पुढे कुठल्याही प्रकरणात पाकिस्तानची भूमिका जाणून घ्यायला तिकडे सीमेपलीकडे कुणाला पाठवायची गरजच नाही. अब्दुल्लांना विचारून घेत चला म्हणावं आपल्या अधिकार्‍यांना. हो ना! पाकिस्तानची बाजू यांच्या एवढी चांगली अजून कोण मांडू शकणार आहे? तसेही शेजारच्यांची भाटगिरी करण्यात अन् भारताविरुद्ध विखारी बोल बोलण्यातच आयुष्य चालले आहे त्यांचे. आता त्यांनी पाकिस्तानचा किल्ला लढवला, यात नवल कुठे आहे? असले बेईमान नेते भारतीय राजकारणात प्रमुख भूमिका बजावतात. वर पुन्हा मुजोरी करतात. भारतीयत्वाच्या मुद्यावर एखादा खोचक प्रश्न विचारला की चवताळून उठतात आणि तरीही पाकधर्जिणी भूमिका मात्र बिनधास्त होत निर्लज्जपणे पार पाडत राहतात. तसे करताना त्यांना थोडीशीही खंत वाटत नाही. उलट आपल्या स्पष्टवक्तेपणाबाबतचा दुराभिमान त्यांच्या मनात असतो.


दुसरीकडे भारतीय जनताही हा सारा तमाशा मुकाट्यानं सहन करते, यासारखे दुर्दैव दुसरे नाही. मनात भारताबद्दल कवडीची आस्था नसतानाही केवळ घराणेशाहीच्या परंपरेने चालून आलेल्या सत्तेच्या जोरावर चाललेले राजकारण आणि त्याच्या बळावर चाललेली मुजोरी, यातूनच हा निलाजरा प्रकार घडतो आहे. आपल्या देशातल्या एका राजकीय पक्षाचा आरोप फेटाळून लावण्यासाठी शेजारी राष्ट्राची ही ‘तरफदारी’ त्यातूनच घडून आली आहे. प्रकार अतिशय संतापजनक असला तरी त्याच्यावर कुणीही एका शब्दानं नाराजी व्यक्त करत नाही, ही तरी कुठे अभिमानाची बाब आहे? पण करता काय, बोलणारे ‘अब्दुल्ला’ आहेत, बाजू पाकिस्तानची घेण्यात आली आहे 

No comments:

Post a Comment