Total Pageviews

Wednesday 25 January 2017

WATCH ME LIVE IN TV CHANNEL IBN LOKMAT COVERING REPUBLIC DAY PARADE FROM 0820 AM TO 1100 AM 26 JAN 2017


संयुक्त अरब अमिरातीचे युवराज यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकीय, ऊर्जा, संरक्षण व आर्थिक क्षेत्रांतील सहकार्यामुळे व ताज्या भेटीतील करारामुळे उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महत्त्वाच्या परदेशी व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. सरकार या पाहुण्याची निवड करताना व्यापक परराष्ट्रसंबंध समोर ठेवते. त्यामुळेच प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावले जाते, याविषयी उत्सुकता असते. यंदा संयुक्त अरब अमिराती या आखातातील देशाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद हे प्रमुख पाहुणे आहेत. भारताला संयुक्त अरब अमिरातीबरोबर संबंध सुधारण्यात रस आहे हा स्पष्ट संदेश यातून दिलेला आहे. पश्चिपम आशियातील देशांशी भारताचे पूर्वापार संबंध असले आणि तेलाची भरपूर आयात तेथून होत असली, तरीसुद्धा गेल्या ६८ वर्षांत दोनदाच पश्चि म आशियाई राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताकदिनी पाहुणे म्हणून आले आहेत. २००३ मध्ये इराणचे तेव्हाचे अध्यक्ष खतामी, तर २००६ मध्ये सौदी अरेबियाचे तेव्हाचे राजे अब्दुल्ला हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर २०१३ मध्ये ओमानच्या राजांना आमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी नकार दिल्याने ऐनवेळी भूतानच्या राजांना बोलावण्याची नामुष्की आली. पश्चिजम आशियातील एकूण अस्वस्थता आणि तेथील राजकीय अपरिहार्यता लक्षात घेता गेल्या पाच वर्षांत या प्रदेशाला हाताळताना परराष्ट्र खात्याकडून विशेष काळजी घेतली गेली आहे. त्यामुळेच आता संयुक्त अरब अमिरातीला आमंत्रण दिले जाणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. संयुक्त अरब अमिरातीची ओळख म्हणजे दुबई आणि अबुधाबी ही शहरे या देशात आहेत. तसेच क्रिकेटसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले शारजासुद्धा अमिरातीचा भाग आहे. ऊर्जेबाबत श्रीमंत असलेला हा देश सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामधोमध असून इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. पाकिस्तानशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या अमिरातीचे भारताच्या दृष्टीनेसुद्धा अनेकार्थांनी महत्त्व आहे. तेथे २५ लाखांहून अधिक भारतीय कामगार काम करतात. तेथील परदेशी कामगारांमध्ये सर्वाधिक वाटा भारताचा आहे. या भारतीयांकडून दीड हजार कोटी डॉलरहून अधिक रक्कम भारतात पाठवली जाते. अमिराती हा देश भारताच्या ऊर्जासुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशाच्या सातत्यपूर्ण आर्थिक विकासासाठी तेलाचा सुरक्षित आणि कमी किंमतीत पुरवठा होणे आवश्याक आहे. भारताच्या एकूण तेल आयातीत अमिराती सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात जे ऐनवेळी वापरता येतील, असे देशांतर्गत राखीव तेलसाठे तयार केले जात आहेत, त्यात अमिरातीने सहभाग घ्यावा, अशी भारताची इच्छा आहे. तेलाशिवाय आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेला हा देश भारताची आर्थिक वाढ आणि गुंतवणूक यासाठीही महत्त्वाचा आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आवश्ययक असलेली हजारो कोटींची गुंतवणूक करण्याची क्षमता अमिरातीमध्ये आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान अमिरातीला गेले होते, तेव्हा आर्थिक सहकार्य वाढावे यादृष्टीने करार करण्यात आले. भारतात औद्योगिक वसाहती, रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली. अमिराती हा भारताचा चीन आणि अमेरिकेपाठोपाठ तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे यावरून या देशाचे महत्त्व लक्षात येते. तसेच २०१३ मध्ये भारत हा अमिरातीचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांतील व्यापार आज सहा हजार कोटींच्या घरात आहे. यापुढे तो वाढत जाणार असल्याची चिन्हे आहेत. पंतप्रधानांच्या २०१५ मधील भेटीपासून भारत आणि अमिराती यांचे सहकार्य संरक्षणाच्या क्षेत्रातही वाढत आहे. विशेषतः दहशतवादविरोधी सहकार्य करण्यात दोन्ही देशांना रस आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी अमिरातीचा उपयोग होऊ शकतो, अशी भारताची धारणा आहे. याशिवाय अफूचा व्यापार व पैशांच्या अफरातफरीला आळा, इराणचे आखात आणि हिंदी महासागरातील नाविक सहकार्य, सुरक्षा दलांचे प्रशिक्षण, लष्करी साहित्याची निर्मिती, तसेच सायबर गुन्हेगारीविषयक सहकार्य वाढत राहावे, असे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिषम आशियातील अस्वस्थता, दहशतवादी कारवाया आणि भारताच्या अंतर्गत परिस्थितीशी असलेले त्याचे संबंध पाहता या प्रदेशात काय घडत आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी भारताला अमिरातीसारखे देश उपयोगी पडू शकतात. तसेच अमिरातीचा उपयोग करून पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या तर तेदेखील हवेच आहे. गेल्या वर्षी भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी अमिरातीला भेट दिली होती. तसेच परराष्ट्र, संरक्षण, ऊर्जा, व्यापार इत्यादी क्षेत्रांतील सहकार्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संवाद चालू राहावा, यादृष्टीने करार केले आहेत. एकुणात दहशतवादविरोधी लढा, ऊर्जासुरक्षा, परदेशी गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्य हे भारताचे चारही प्राधान्यक्रम पुढे नेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती हा देश उपयुक्त आहे. अमिरातीबरोबर संबंध दृढ करण्यामुळे पश्चिीम आशियातील इतर सुन्नी देशांशीही संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच अमिरातीच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांचा उपयोग करून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला रोखता आले, तसेच अरब देशांची काश्मीयरविषयक भूमिका सौम्य करता आली, तर ते भारतासाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे राजकीय, ऊर्जा, संरक्षण आणि आर्थिक अशा क्षेत्रांत अमिराती हा महत्त्वाचा भागीदार ठरू शकतो. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने हे संबंध कसे अधिक सुधारतील हे पाहणे उद्‌बोधक ठरेल.

No comments:

Post a Comment