Total Pageviews

Sunday 20 November 2016

-भारतीय ‘इसिस’ला दणका By pudhari डॉ. झाकीर नाईक संघटनेवर बंदी घालण्याची केलेली मागणी तेव्हाच्या यूपीए सरकारने मनावर घेतली नाही, म्हणून नाईक यांचे उद्योग उजळमाथ्याने चालू राहिले


| Publish Date: Nov 20 2016 7:53PM | Updated Date: Nov 20 2016 7:54PM आखाती देशातून पैसा आणून इथे धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली जिहादी प्रेरणा जोपासणार्‍या संस्थेवर बडगा उगारला गेला ही चांगली बाब झाली. डॉ. झाकीर नाईक नावाचे एक गृहस्थ गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इस्लामिक रिसर्च फौंडेशन नावाची संस्था चालवित होते. त्यांच्या विविध हालचालींवर मुंबई पोलिसांनी दीर्घकाळ बारीक लक्ष ठेवलेले होते. चार वर्षांपूर्वी मुंबईत रझा अकादमीच्या एका मेळाव्यानंतर मुंबईत जो हिंसक धुमाकूळ घातला गेला त्यानंतर अशा संस्था संघटनांचा थोडा काळजीपूर्वक अभ्यास सुरू झाला होता, तत्कालीन पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी नाईक यांच्या संस्थेवर नजर ठेवून एक अहवाल तयार केला होता. अशा संस्था कधीही उघडपणे हिंसा वा सामाजिक तेढ निर्माण करण्याची थेट कारवाई करीत नसतात; पण त्यासाठी पूरक ठरेल अशा गोष्टी मात्र करत असतात, डॉ. नाईक यांची संस्था इस्लामिक रिसर्च म्हणजे धार्मिक संशोधन व तत्सम अभ्यासाचे काम करीत असल्याचे भासवले जात होते आणि त्यात खुद्द नाईक आपल्या आकर्षक भाषाप्रभूत्वाचा उपयोग करून अनेक मुस्लिम तरुणांना हिंसेला प्रवृत्त करीत होते. वरकरणी त्यांनी कोणाला ‘जिहाद’ला थेट प्रवृत्त केले नाही की चिथावणी दिलेली नाही. तसे शब्दात तुम्ही त्यांना पकडू शकत नाही; पण शब्दांची कसरत करून दहशतवाद म्हणजे धार्मिक कार्य असल्याचे तरुणांच्या निरागस मनात भरवून देण्याचे काम मात्र त्यांनी मोठ्या चतुराईने चालविले होते. उदाहरणार्थ ते सांगायचे की, इस्लाम धर्माला हिंसा मान्य नाही. म्हणूनच दहशतवाद चुकीचा आहे; पण कोणी दहशतवादाला मोडून काढण्यासाठी हत्यार हाती घेत असेल, तर त्याला दहशतवाद म्हणता येणार नाही. अमेरिका हा देश जगातील सर्वात मोठा दहशतवादी आहे आणि म्हणूनच त्याला धडा शिकवण्याचे काम ओसामा बिन लादेन करीत असेल, तर तो दहशतवाद नाही. थोडक्यात, अमेरिकेच्या विरोधात वा अन्य कुठल्या दहशतवादाच्या विरोधात हिंसा करण्याला दहशत मानायचे कारण नाही. म्हणूनच ओसामाचे कार्य योग्य आहे. यातली चलाखी लक्षात घेतली पाहिजे. इथे अमेरिका म्हणजे अमेरिकन सरकार आहे आणि कुठल्याही निवडून आलेल्या कायदेशीर सरकारला जे अधिकार असतात, त्यांनी त्यानुसार केलेल्या कारवाईला दहशतवाद ठरवणेच खोटेपणा आहे. एकदा तुम्ही कायदेशीर सरकारला दहशतवादी संबोधले, मग त्याचा कायदा व कृती आपोआप दहशतवाद ठरतो. त्याला आळा घालण्याचेही न्यायालयीन मार्ग आहेत, त्याऐवजी कोणीही हाती हत्यार घेऊन न्यायाच्या गोष्टी करणे म्हणजे कायद्याला झुगारण्याचीच चिथावणी असते. अशाच भाषेत डॉ. नाईक बोलत असल्याने भारावून जाणार्‍या तरुणांनी शस्त्र हाती घेतले तर गुन्हेगार कोण? मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेऊन अशा कारवाया व तशा संघटनेवर बंदी घालण्याची केलेली मागणी तेव्हाच्या यूपीए सरकारने मनावर घेतली नाही, म्हणून नाईक यांचे उद्योग उजळमाथ्याने चालू राहिले आणि मोठमोठ्या मेळावे, समारंभातून ते जनमानसाला प्रभावित करीत राहिले. नुसत्या मुंबईत नाही तर देशाच्या अन्य भागांत आणि जगात इतरत्रही नाईक यांचा खुलेआम वावर राहिला. त्यातून बंगाल, बांगलादेश व केरळ तेलंगणापर्यंत त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण ‘जिहाद’कडे आकर्षित होत गेले. तरीही भारत सरकारला थांगपत्ता लागलेला नव्हता; पण काही महिन्यांपूर्वी बांगला देशची राजधानी ढाका येथे एक मोठी घातपाती घटना घडली आणि त्यात सहभागी असलेल्या सुशिक्षित तरुणांना पकडले गेल्यावर डॉ. नाईक यांच्या प्रवचनाचे भीषण परिणाम सामोरे आले. त्या तरुणांनी आपल्याला नाईक यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे म्हटल्यावर भारतात धावपळ सुरू झाली आणि दक्षिण मुंबईचे लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांनी तो मुद्दा संसदेत उचलून धरला. साहजिकच भारत सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि नाईक यांना पळताभूई थोडी झाली. हे प्रकरण चव्हाट्यावर आले तेव्हा नाईक परदेशी गेलेले होते आणि मायदेशी काय होणार याची कल्पना आल्यानेच त्यांनी परत येण्याची टाळाटाळ केलेली आहे. कित्येक महिने उलटून गेले आणि त्यांनीच सौदी अरेबियामध्ये दडी मारलेली आहे आणि तिथूनच त्यांना मोठ्या प्रमाणात आजवर निधी मिळालेला आहे. अलीकडेच नाईक यांच्या पित्याचे वृद्धापकाळाने निधन झाले; पण त्यांच्या अंत्यसंस्कार किंवा अंत्यदर्शनालाही हे गृहस्थ मायदेशी येण्याचे धाडस करू शकलेले नाहीत; पण दरम्यान गेल्या काही महिन्यांत त्यांच्या संस्था व कार्याची तपशीलवार माहिती सरकारने गोळा केली आणि मुंबई पोलिसांची दीर्घकाळ धूळखात पडलेली मागणी मान्य झाली आहे. गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात नाईक यांच्या संस्थेवर केंद्र सरकारने बंदी जारी केली आणि देशभरातील त्यांची कार्यालये आणि मालमत्ता यांच्यावर जप्ती आणली गेली. राष्ट्रीय तपासयंत्रणेने त्यावर गुन्हे दाखल केले आणि आता पद्धतशीर त्यांची कार्यालये व कागदपत्रांची चौकशी सुरू झाली आहे. थोडक्यात, डॉ. नाईक यांचा माघारीचा रस्ता आता बंद झाला आहे. त्यांना पकडण्यापेक्षा व त्यांच्यावर खटला भरण्यापेक्षा त्यांच्या नादाला लागणार्‍या भावी पिढीतील मुस्लिम तरुणांना रोखले जाण्याचे स्वागत करायला हवे आहे. कारण असल्या प्रवचनांनी व भाषणांनी शेकड्यांनी तरुण ‘इसिस’ वा ‘जिहादी’ उद्योगाकडे ओढले गेलेले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न चालू असताना नव्यांना पायबंद घातला जाणे ही चांगली सुरुवात आहे. इथे भारतात रुजणार्‍या ‘इसिस’चा पायाच त्यामुळे उखडला गेला असे मानायला हरकत नाही

No comments:

Post a Comment