Total Pageviews

Friday 12 June 2015

ऑपरेशन म्यानमारचे पडसाद

ऑपरेशन म्यानमारचे पडसाद भारतीय सैन्यदलावर हल्ला करून १८ शूर जवानांना भ्याडपणे दगाफटका करून ठार करणार्‍या दहशतवाद्यांना म्यानमारमध्ये घुसून भारतीय सेनेने कंठस्नान घातले. भारतातील मोदी सरकारने सैन्यदलास अशा प्रकारे कारवाई करण्याचे आदेश दिले आणि भारतीय लष्कराने आपल्या चातुर्याची, आपल्या तडफेची, त्वरेने हालचाली करण्याची, क्षमतेची चुणूक जगाला दाखवत अवघ्या ४५ मिनिटांत म्यानमारमधील अतिरेक्यांचे दोन अड्डे उद्ध्वस्त करत दहशतवादी प्रवृत्तींना एक सज्जड इशारा दिला. सगळ्या देशभर सामान्य माणसापासून ते संरक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनी या लष्करी कारवाईचे मुक्तकंठाने स्वागत केले. सर्वसामान्यांची छाती अभिमानाने फुलून आली. विशेषज्ञ आणि लष्करातील निवृत्त अधिकारी सर्व माध्यमावर येऊन भारत सरकारच्या या कारवाईची स्तुती करू लागले. भारतात सतत दहशतवादी काळी कृत्ये करणारे अतिरेकी आणि त्यांना पाठबळ देणारे सीमेपलीकडील दुष्ट शत्रू यांना या कारवाईने सज्जड इशारा मिळाल्याचे मत सर्व संरक्षण तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील तज्ज्ञ यांनी व्यक्त केलं. मात्र, भारतीय सैनिक आणि भारत सरकारच्या या पराक्रमामुळे केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात असलेल्या शक्तींची पोटदुखी भलतीच वाढलेली दिसते आहे. जसे भारतातील लोक भारताबाहेर नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनिवासी भारतीय असे म्हणतात. मात्र, या देशात काही निवासी अभारतीय आहेत. ते भारतात निवास करतात. मात्र, भारताच्या दृष्टीने आनंदाची चांगली गोष्ट झाली की यांच्या पोटात दुखू लागते. त्यामुळे आता म्यानमारमधील दहशतवादी ऑपरेशन यशस्वी होताच सगळा देश आनंदात असताना हे निवासी अभारतीय मात्र यातही छिद्रे शोधण्याच्या मागे आहेत. देशाला स्वराज्य मिळाल्यानंतर आतापर्यंत शेजारी देशांनी आमच्या सीमेत घुसून आमचा प्रदेश अपमानास्पदरीत्या बळकावला, दहशतवादी घुसवून देशात अनेक प्रकारचे हल्ले केले, अगदी अलीकडे मुंबईवर हल्ला करून शेकडो निरपराध नागरिकांचे जीव घेतले, काश्मीर, पंजाब, पूर्वांचलात सीमापार पोसलेल्या दहशतवाद्यांनी मृत्यूचे तांडव घातले. मात्र, तत्कालीन कॉंग्रेस सरकारांनी त्याविरोधात धाडसी कारवाई करण्यासाठी लष्कराला किंवा सुरक्षा दलांना मुभा दिली नाही. उलट नागालँडमधील बंडखोरांबरोबर राजकीय सौदेबाजी करून त्यांना सत्तेच्या खुर्च्या देण्यात धन्यता मानली गेली. त्यामुळे दहशतवादी कारवाया करणारे देशद्रोही आणि त्यांना फूस लावणार्‍या परकीय शक्ती हे सोकावतच गेले. पहिल्यांदाच भारत सरकारने अशी लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लष्कराने अत्यंत चातुर्याने नियोजन करून कमीत कमी वेळेत ही कारवाई केली. दुसर्‍या देशाच्या सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. ठरलेल्या वेळेत सगळे कमांडोज कसलीही इजा न होता हे ऑपरेशन यशस्वी करून आपल्या सीमेत परतले सुद्धा. हे प्रचंड मोठे यश आहे. देशातील तमाम संरक्षण तज्ज्ञ, लष्कराचे निवृत्त अधिकारी या सर्वांनी या कारवाईचे प्रचंड स्वागत केले. या सर्वांच्या प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट हमखास होती ती केंद्र सरकारने जी राजकीय इच्छाशक्ती दाखवून लष्कराला ही मोहीम करण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरकारची प्रसंशा! नेमके यामुळेच अनेकांचा पोटशूळ उठला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मूळ घटना सोडून देत राजवर्धन राठोड यांच्या विधानावरच टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी देशरक्षणार्थ ५६ इंचाची छाती पाहिजे, असा उल्लेख केला होता. कॉंग्रेस सरकारांच्या काळात अनेकदा काश्मीरमध्ये हल्ले झाले, मुंबईवर हल्ले झाले, नक्षलवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर मोठ्या प्रमाणावर जीवघेणे हल्ले केले. मात्र, सरकारने केवळ निषेध, सतर्कतेचे इशारे याशिवाय काहीच केले नाही. या पार्श्‍वभूमीवर म्यानमारमधील कारवाई भारतातल्या नव्या मोदी सरकारच्या बदलत्या कणखर धोरणाचे निदर्शक आहेच. म्यानमारमधील घटनेनंतर त्याचे विश्‍लेषण करणारे सर्वच तज्ज्ञ आणि विश्‍लेषक या मोहिमेबद्दल मोदी सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीची प्रसंशाच करत आहेत. जिथे तिथे वैचारिक आणि राजकीय धोबीघाट सुरू करत आपापली धुणी धुवायची वाईट सवय या देशातील मल्टिकम्युनल हिंदुत्वविरोधकांना लागली आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये लष्करी मोहिमेबद्दल बोलणे गैरसोईचे असल्याने त्याबद्दल न बोलता त्यावर राजवर्धन राठोड जे बोलले त्यावर टीका करून आसुरी आनंद मिळविण्याचा नतद्रष्टपणा कॉंग्रेसपासून ते काही पत्रकारांपर्यंत मंडळी करत आहेत. मोदी सरकारला या यशाचे श्रेेय मिळते आहे, ही यांची मूळ पोटदुखी आहे. म्यानमारमधील लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानातही पडसाद उमटले आहेत. विनाकारण भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये अशा आशयाची आक्रमक विधाने पाकिस्तानातील हाफीज सईदपासून ते त्यांच्या मंत्र्यांपर्यंत सगळे करू लागले आहेत. ज्या पाकिस्तानात अमेरिकेचे लष्कर सरळ सरळ घुसले आणि ओसामा बिन लादेनचा खात्मा करून परत गेले. पाकिस्तान साधा निषेधाचा एक स्वर काढू शकले नाही, त्या पाकिस्तानातील मंडळींनी आता भारताच्या म्यानमारमधील मोहिमेनंतर विनाकारण छाती पिटणे हे जेवढे हास्यास्पद आहे, त्यापेक्षाही जास्त ते केविलवाणे आहे. भारतीय लष्करी सामर्थ्य आणि चपळाईबरोबरच या लष्कराला कारवाई करण्याचे आदेश देऊ शकणारे सरकार ही आता त्यांना धडकी भरविणारी गोष्ट झाली आहे, असा या पाकिस्तानातील नापाक प्रतिक्रियांचा अर्थ आहे. भारतात मोदी सरकारला या प्रकरणात विरोधासाठी विरोध करणार्‍यांना पाकिस्तानातील या प्रतिक्रियांनी या विषयातील वास्तवाची जाणीव व्हायला हरकत नाही. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माईंड असलेला आणि निरपराध लोकांना मारण्याची कारस्थाने रचणारा हा राक्षस पाकिस्तान पोसणार आणि इतरांना शांततेची प्रवचने देणार हा विरोधाभास आहे. भारताच्या दहशतवादविरोधी धडक कारवाईने या सगळ्यांना धडकी भरली आहे हे मात्र यांच्या या तडफडीवरून आणि नापाक प्रतिक्रियांवरून उघड झाले आहे. पूर्वांचलात अतिरेक्यांनी भारतीय सुरक्षा दलातील जवानांवर हल्ला केल्यानंतर चीनने या दहशतवाद्यांना चीनची मदत आहे याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. नरेन्द्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्रधोरण या विषयात जे अभूतपूर्व यश या सरकारने मिळविले आहे त्याचाच हा परिणाम म्हटला पाहिजे. म्यानमारमधील धडक मोहिमेनंतर एमएससीएन या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी बदला घेण्यासाठी चवताळून पूर्वांचलात घुसल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, भारतीय गुप्तचर संघटना आणि सुरक्षा दले या विषयात सतर्क आहेत. भारतात दुष्ट हेतूने दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या भारतातील आणि सीमेपलीकडील दहशतवाद्यांना या म्यानमार मोहिमेमुळे चांगलीच धडकी भरली आहे. भारतीय सर्वसामान्य माणूस खूपच सुज्ञ आहे. अशा प्रकारच्या राजकीय स्वार्थाच्या आणि वैचारिक धुणी धुणार्‍या लोकांच्या बुद्धिभेदाला येथील जनता फसणारी नाही. सत्ताधार्‍यांच्या निर्णयप्रक्रियेतील आणि निर्णयक्षमतेमधील फरक सामान्य जनतेला चांगलाच कळतो. पोखरणची अणुचाचणी झाली तेव्हा या देशातील सामान्य माणूस आनंदी होता. मात्र, हे तमाम निवासी अभारतीय सरकारवर टीका करत होते. अगदी डाव्या कम्युनिस्ट विद्यार्थी संघटना तर तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यक्रमात निदर्शने करण्यापर्यंत पुढे गेल्या होत्या. मात्र, देशातील सामान्य जनतेने अणुचाचणी घेणार्‍या भारतीय जनता पक्षाला आता स्वबळावर बहुमत दिले आहे आणि विरोध करणार्‍या कम्युनिस्टांची अवस्था प्रादेशिक पक्षांपेक्षा वाईट आहे. आताही देशहित, देशाचा स्वाभिमान, देशाची सुरक्षा या विषयात या देशातील सामान्य माणूस कोणतीही तडजोड करायला तयार होणार नाही. म्यानमारमधील लष्करी कारवाईचे येथील सामान्य माणसाने छाती फुगवून अभिमानाने स्वागत केले आहे. आपापल्या संकुचित स्वार्थासाठी जर कोणी याला विरोध करतील किंवा या कारवाईच्या नावाने बोटे मोडतील, त्यांना या देशातील सामान्य जनता माफ करणार नाही, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे

No comments:

Post a Comment