Total Pageviews

Tuesday 11 February 2014

TARGET INTELLIGENCE BUREAU ISHRAT JAHAN EMCOUNTER-SAAMANA ARTICLE

मुंब्रा येथे राहणारी व माटुंग्याच्या खालसा कॉलेजात १४वीला शिकत असलेली इसरत जहॉं शेख ही तरुणी व तिचे साथीदार जावेद शेख ऊर्फ प्रनेश पिल्लई, अमजाद अली राणा व जिशान जोहर असे चारजण १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांकडून चकमकीत मारले गेले. त्यात दोन पाकिस्तानी अतिरेकी होते. पुण्यातून हे चारही संशयित अहमदाबादच्या दिशेने निघाले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या कशी करायची, याचा प्लान या चारहीजणांनी रचला होता. याची खबर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. सोबत महिला असली की शक्यतो कुणीही पोलीस रस्त्यात हटकत नाही, विचारपूस करीत नाही. त्यामुळे दाऊद टोळीचे गुंड नेहमी कारमधून फिरताना सोबत महिलांनाच घेऊन फिरायचे. तीच कार्यपद्धती पाकिस्तानच्या ‘लष्कर-ए-तोयबा’ या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांनी वापरली होती. इसरतलाही ‘रेकी’ करण्यासाठी सोबत घेतले होते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी याची खबर गुजरातच्या स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांना दिली. त्यांनी गुजरात पोलिसांना कळविले. त्यानंतरच चकमकीचा बेत रचला गेला आणि अतिरेक्यांसोबत फिरणारी इसरत शेख ही खालसा कॉलेजची विद्यार्थिनी चकमकीत मारली गेली. आपल्या मुलीला खोट्या चकमकीत मारले आहे, आपण न्यायालयात जावे, तक्रार करावी यासाठी इसरतच्या आईवर अपप्रवृत्तींनी दबाव आणला. अर्थसहाय्य केले. त्याप्रमाणे इसरतची आई शमीमा कौसरने न्यायालयात धाव घेतली. तपास एसआयटीकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला. चकमक खोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर सीबीआय मुळापर्यंत गेली. त्यांनी ‘आयबी’च्या अधिकार्‍यांनाही आरेापीच्या पिंजर्‍यात उभे केले. आयबीचे स्पेशल डायरेक्टर राजेंद्रकुमार, कनिष्ठ अधिकारी एम. के. सिन्हा, टी. मित्तल व राजीव वानखेडे अशी या आयबीच्या अधिकार्‍यांची नावे असून गुजरात पोलिसांना चकमकीत वापरण्यासाठी शस्त्र पुरविणे, अपहरण करणे आदी आरोप असलेली चार्जशिट या अधिकार्‍यांविरुद्ध न्यायालयात नुकतीच सीबीआयने दाखल केली आहे. त्यातील राजेंद्रकुमार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. देशाच्या हितासाठी काम करणार्‍या, देशविरोधी प्रवृत्तींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना माहिती पुरविणार्‍या, मदत करणार्‍या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्‍यांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची देशातील आतापर्यंतची ही पहिलीच घटना असून सीबीआयच्या या मुळापर्यंत जाण्याच्या तपासाबद्दल सार्‍या देशात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी सीबीआयने गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा, आयपीएस अधिकारी पी. पी. पाण्डेय यांच्यासह आठ पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध इसरत शेख चकमकीप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून वंजारा हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून जेलमध्ये आहेत. सीबीआयचे व आयबीचे सध्याचे डायरेक्टर यांच्यातील आपसातील हेव्यादाव्यामुळेच हा तपास मुळापर्यंत गेला आणि आयबीच्या अधिकार्‍यांना लटकावण्यात आले असे सांगण्यात येते. परंतु आता आयबीचा कुणीही अधिकारी आपला जीव व नोकरी धोक्यात घालून येथून पुढे देशासाठी काम करणार नाही असे सांगण्यात येते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणार्‍या, ‘रेकी’ करणार्‍या, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये निळ्या रंगाच्या इंडिगो कारमधून संशयास्पदरीत्या फिरणार्‍या इसरत शेख व तिच्या साथीदारांचा हेतू चांगला नव्हता. ते पाकिस्तानसाठी काम करीत होते. अशांना पकडून वर्षानुवर्षे जेलमध्ये ठेवून का पोसायचे? त्यांच्यासाठी सुरक्षा का पुरवायची? असा विचार करून गुजरात पोलिसांनी त्यांना कायमचे संपविले. हे सारे त्यांनी देशासाठी केले. त्यासाठी ते आता जेलची हवा खात आहेत. तेव्हा आयबीच्या अधिकार्‍यांना सुळावर चढवून सीबीआयने काय साधले? अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचेच बळ व आत्मविश्‍वास वाढविला आहे. मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडवून हाहाकार माजविणारा इंडियन मुजाहिदीनचा हिंदुस्थानातील म्होरक्या यासीन भटकळ हा सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात असून त्याने दिलेली माहिती धक्कादायक आहे. तो म्हणतो, ‘आम्ही दादर येथे पोलिसांनी खच्चून भरलेली व्हॅनच बॉम्बस्फोटाने उडविणार होतो. परंतु टायमिंग चुकले आणि पोलीस बचावले!’ यासीन भटकळची ही खळबळजनक कबुली म्हणजे पाकिस्तानने पुकारलेले हे छुपे युद्धच आहे. मग अशा शत्रूराष्ट्रासाठी काम करणार्‍या इंडियन मुजाहिदीन असो अथवा लष्कर-ए-तोयबाचे सदस्य असो, अशांना गुजरात पोलिसांनी जर चकमकीत ठार मारले असेेल तर त्यांचे काय चुकले, असा प्रश्‍न पोलिसांकडून केला जात आहे. यासीन भटकळ काय किंवा आणखी कुणीही असो, पाकिस्तानसाठी काम करणारे सारे विषारी साप आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे. परंतु आपल्या देशात धर्म व मतांसाठी राजकारण केले जात आहे. त्यामुळेच आयबीच्या अधिकार्‍यांनाही कधी नव्हे ते आरोपी करण्यात आले आहे. तेव्हा हा देश आता मूळ हिंदुस्थानी नागरिकांचा राहिला नाही. तो पाकिस्तानचा झाला आहे असेच म्हणावे लागेल. इसरत शेखबरोबर मारले गेलेले अमजाद अली राणा व जिशान जोहर हे पाकिस्तानी असल्याचे उघड होऊनही इसरत अतिरेकी नसल्याचा हवाला सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला असून या त्या दोन पाकिस्तान्यांबद्दल आपल्या आरोपपत्रात अवाक्षरही लिहिलेले नाही. याचा अर्थ निवडणुका जवळ आल्याने इसरतला इनोसण्ट ठरवून कॉंग्रेसने आयबीच्या अधिकार्‍यांचा बळी घेतला आहे. म्हणजे आपल्याच घराला आग लावली आहे. आयबीच्या अधिकार्‍यांचे खच्चीकरण केले आहे. सीबीआय हा कॉंग्रेसचा बोलका पोपट असून या एजन्सीची विश्‍वासार्हता आता संपली आहे. नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे सहकारी व गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात इसरत शेखप्रकरणी सबळ पुरावे नसल्याने सीबीआयने आरोपपत्रात त्यांचे नाव टाकले नाही. परंतु टाकले असते तर नक्कीच यूपीए सरकार खूश झाले असते असे धक्कादायक विधान सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांनी करून सीबीआयमध्ये कसा मनमानी कारभार सुरू आहे याचीही झलक दाखवून दिली आहे. इसरत शेखसारख्या तरुण मुलींना सोबत घेऊन, पुढे करून अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणायचे, निरपराध्यांच्या चिंधड्या चिंधड्या करायच्या, त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत करायची, हे आपल्या देशात चालू द्यायचे; अतिरेक्यांना चकमकीत ठार मारायचे नाही. मग हा देश कुणाचा आहे? प्रथम गँगवॉर मोडून काढणार्‍या पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले. आता गुप्त माहिती देणार्‍या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेलाच लक्ष्य करण्यात आले आहे. उद्या सीबीआयवरही तीच वेळ येणार आहे. परंतु आज ना उद्या त्यांनाही ‘पक्षपाती’ तपास केल्यास जेलमध्ये जावे लागणार आहे हे लक्षात ठेवा. ‘बुमरँग’ कधी कुणावर उलटेल हे सांगता येणार नाही

No comments:

Post a Comment