Total Pageviews

Tuesday 11 February 2014

BRAVE MOSQUITO WHO STOPPED INDIAN MUJAHIDEEN TERRORIST YASEEN BHATKAL

आतंकवाद्यांचा कर्दनकाळ!मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवणार्यां 'इंडियन मुजाहिद्दीन' या संघटनेचा नेता यासिन भटकळ हा सध्या मुंबई एटीएसच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी चालू असताना एका विलक्षण योगायोगाची घटना समोर आली. आपण ज्याला एक क्षुल्लक मच्छर समजतो अशा मुंबईतील पराक्रमी डासाच्या चाव्यामुळे आतंकवाद्याला मलेरिया झाला अन् त्याच्या टोळीचा पुढील घातपात करायचे नियोजन फसले. एका मोठय़ा मानवी संहारातून मुंबईकर वाचल्याची घटना या चौकशीतून बाहेर आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर म्हणजे जवळ जवळ ६0 ते ७0 टक्के नागरिक गलिच्छ अशा झोपडपट्टय़ांमध्ये राहत असतात. त्यांच्या आजूबाजूला सांडपाणी, कचरा, डबकी, गटारे यामधून प्रचंड प्रमाणात डासांची पैदास होते. दरवर्षी शासकीय योजनेप्रमाणे महानगरपालिका डासांच्या निर्मूलनासाठी धुराची फवारणी, औषधे यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असते. त्याखेरीज घराघरातून कासवछाप कॉइल तसेच ऑलआऊट अशा कंपन्यांनी बनवलेली डासांना पळवून लावणारी कोट्यवधी रुपयांची उत्पादने विकत घेतली जातात. आमचे ठाणे तर डासांचे माहेरघर म्हणून इतिहास-भूगोलात गाजले आहे. ठाण्याला राहणार्याा सरकारी नोकराला पूर्वी बॅड वेदर अलाऊन्स म्हणजे खास भत्ता मिळत असे. सध्या मोठय़ा प्रमाणावर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा करोडो रुपयांचा खर्च मच्छर निर्मूलनावर होत असला तरीही चराचर व्यापूनी दशांगुळे उरला अशा सर्वश्रेष्ठ भगवंताच्या लीलेप्रमाणेच बहाद्दर डास आपले अस्तित्व दाखवायला आणि आपल्याला चावायला पुरून उरले आहेत. आपले आणि सरकारचे आतापर्यंतचे धोरण आणि पवित्रे सपशेल चुकले असून या बहाद्दर डासांचा संहार केल्याबद्दल आपल्याला आता पश्चाचत्तापच झाला पाहिजे. आतंकवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सीमेवर सज्ज असणारे जवान, सीमा सुरक्षा दल, गुप्तहेर, दहशतवाद प्रतिबंधक दल, जगात प्रख्यात असणारे मुंबई पोलीस यांच्यावर आतंकवादाला आळा घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी हा खर्च विफल होत असल्याने आता गल्लोगल्ली गटारे आणि डबक्यातून मोठय़ा प्रमाणावर मच्छर निर्माण झाले तरच मुंबईच्या सुरक्षेची खात्री देता येईल. त्यामुळे आता पोलीस दलात असलेली कुत्री आणि पोलीस दलाकडे असलेले अश्रुधुर, एके-४७, मशीनगन, पाण्याचा फवारा याच्या जोडीनेच ठाण्यातील प्रभावी डासांना एकत्र करून पद्धतशीर रितीने त्यांना पोलीस दलाचा एक विभाग म्हणून त्यांची जोपासना केली तरच आतंकवाद्यांच्या हल्ल्यांमधून मुंबईकरांचा बचाव भविष्यात घडू शकेल. अमेरिकेने आतापर्यंत न्यूक्लीयर वेपन्स, केमिकल वेपन्स आणि बॉयोलॉजिकल वेपन्स याचा उपयोग इराक आणि इराणवर करण्याचे ठरवून त्यासाठी प्रयोगशाळांमधून त्याचे संशोधन आणि निर्मिती केली होती. त्याऐवजी आपल्या ठाणे आणि मुंबईतल्या जातीवंत डासांची प्रतिकारशक्ती आणि प्रभाव लक्षात घेतला तर मुंबई आणि ठाण्यामधून डास गोळा करून त्यांची अमेरिकेत निर्यात केली गेली तर आर्थिक अडचणीत असलेल्या आपल्या राज्य आणि केंद्र सरकारला फार मोठय़ा प्रमाणावर विदेशी मुद्रा उपलब्ध होऊ शकेल. आतापर्यंत या मच्छरपुराणाकडे आपले दुर्लक्ष झाले होते. भविष्यात आतंकवाद्यांच्या विरुद्ध एक प्रतिबंधक उपाय म्हणून घरोघरी मधमाशांप्रमाणेच डासांची जोपासना आणि सुरक्षा ठेवणार्या् पेठय़ा आता राज्य शासनाने घरोघरी वाटल्या पाहिजेत. शेवटी आपले सुरक्षा दल, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी आतंकवादासमोर हात टेकल्यानंतर शेवटी आपल्या बचावासाठी मुंबई आणि ठाण्यामधील दीर्घ परिचयाचे आपले डासच उपयुक्त ठरले, हे आता सिद्ध झाल्यामुळे त्यांचे उपकार स्मरण्यासाठी पोस्टाचे खास तिकीट केंद्र सरकारने प्रसिद्ध करायला हवे!सज्जनांचा पुरस्कार, दांभिकांचा धिक्कार, दीनदुबळ्यांचा कैवार, भ्रष्टांवर प्रहार!

No comments:

Post a Comment