Total Pageviews

Sunday 11 August 2013

NAIK KUNDLIK MANE PUNCH

हे व्यर्थ न हो बलिदान काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत; पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फायदा करून घेण्याचे राजकीय नेत्यांना जमले नाही; उलट विघातक राजकारणाने परिस्थिती चिघळत आहे. संकुचित सत्ताकारण देशकारणावर कुरघोडी करत आहे.दरवर्षी भारतीय लष्करातील दहा ते पंधरा अधिकारी आणि २50 ते ३00 जवानांना काश्‍मीरसाठी वीरमरण येते. जबर जखमींची संख्या याच्या चौपट आहे.सध्या जम्मू आणि काश्‍मीरमधून २५0 ते ३00 दहशतवादी कारवाया करीत आहेत. याशिवाय १000 ते १500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पूछ विभागातल्या सरला चौकीजवळ जवळ गस्त घालणाऱ्या सहा जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला केल्या मुळे आपले पाच जवान शहीद झाले.या मध्ये ४ जवान २१ बिहार बटालियनचे होते आणि नायक कुंडलिक माने हे १४ मराठा लाईट इन्फंट्रीचे होते.या हल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.याच भागात मी माझी बटालियन ७ मराठा लाईट इन्फंट्री बरोबर पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी थाम्बावयाचे काम १९९५-१९९८ सालामध्ये केले होते. बटालियनला केलेल्या कामगिरी बद्दल १७ शुरता पुरस्कार मिळाले.हे करताना आमचे तिन जवान शहिद झाले. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, आहेत काय? या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या,अशाच प्रतिक्रिया संतप्त भारतीयांच्या पण होत्या. लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे नमूद केले . पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचा ,भारतीय जनतेचा आणि लष्कराचा अवमान संरक्षण मंत्री अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला. अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून,अवसानघातकी कृत्य केले. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. काय अर्थ आहे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाचा? सीमांचे संरक्षण करत असताना भारतीय सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कुंडलिक तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यांत अटीतटीची आणि तीव्र होती. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दुःख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. काय हे अर्थ आहे. तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा ? एका लहानशा खेड्यातला तुझा जन्म. तू लष्करात भरती झालास. का निवड केलीस तू लष्कराची ? नोकरी मिळवण्यासाठी, तेवढेच एक उत्तर नक्कीच नाही. कुटुंबातील पार्श्‍वभूमी, देशप्रेम या अनेक कारणांमुळे तू लष्करात दाखल होण्यास प्रेरित झालास? आज मात्र तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या साऱ्या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायामची थंडावलीय. एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. तुझ्यासारख्याच अनेक वीरपुत्रांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडया गेटवर जळते आहे, पण त्याच इंडिया गेटवर तुझे नाव मात्र आम्ही कोरणार नाही. कारण त्यावर ब्रिटिशांसाठी लढलेल्या तत्कालिन जवानांची नावे आहेत. यापेक्षा विरोधाभास ते कोणता. पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. काश्‍मीर खोऱ्यातून तुला निरोप देताना सर्वात ज्येष्ठ अधिका्र्यानी तुला अन्य अधिकाऱ्यांसह मानवंदना दिली. तुझ्या युनिटचे प्रतिनिधीनी तुला घरी पोहचवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलीस त्या छतात लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला गेला.तुझ्या अन्तदर्शनाला ऊसळलेला जनसागर या आधी कधिच बघितला नव्हता. तुझ्या वडील,आई, पत्नी मुलाच्या दुःखभरल्या डोळ्यातून अखंड वाहणारी आसवे आणि तुझ्या अकाली जाण्याने प्रचंड धक्का बसलेले आणि दिग्‌मूढ झालेले तुझे कुटुम्ब यांना पाहून पाषाणालाही पाझर फुटला. तुझ्या युनिटचे अधिकारी तुला शौर्यापदक मिळावे यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील. कालांतराने तुझी पत्नीला ते शौर्य पदक देऊ केले जाईल आणि अत्यंत गर्वाने तुझ्या घरांत ते मिरवले जाईल. तुझ्यासारखेच अनेक जवान कारगिलच्या भूमीवर धारातीर्थी पडले. परंतु आज त्या अत्यंत पराक्रमी जवानांचा साधा स्मृतिदिनदेखील साजरा करणे या देशवासीयांना जमत नाही. त्या अत्यंत वीरश्रीपूर्ण लढाईची आठवणही दरवर्षी योग्य त्या पद्धतीने केली जात नाही. "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव अमर राहील मात्र तुझे युनिट १४ मराठा लाईट इन्फंट्री आणि तुझ्या रेजिमेंटमध्यो तुझे नाव चिरकालासाठी कोरुन ठेवले जाईल. युनिटच्या क्वार्टर गार्डवर देखील तुझे नाव येऊन दरवर्षी तुला आदरांजली वाहिली जाईल. तुझे फॉर्मेशन हेडक्वार्टर आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये तुझे नाव अभिमानाने झळकत राहील. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री रेगिमेन्ट्ल सेन्टर प्रशिक्षण केंद्रावरील "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव राहील. सेवेत दाखल होण्याआधी प्रत्येक जवान तुला या भवना मध्ये येऊन वंदन करेल. काही वर्तमानपत्रांमध्ये तुझ्या सहकाऱ्यांकडून तुझ्या नावे शोकसंदेशही छापला जाईल. अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतील. मात्र लष्करी गणवेश ज्यांनी अनुभवला आहे. ते आणी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक मात्र हा संदेश अत्यांत तपशीलात वाचतील. त्यांना तुझ्याविषयीच्या अभिमानाने भरुन येईल. आयुष्याच्या संध्याकालाकडे झुकताना तुझ्या शौर्याच्या आणि धाडसाच्या आठवणी ही तुझ्या मातापित्यांकडची सर्वात मोठी ठेव असेल. तुझ्या सहवासातील क्षण त्यांच्याकरता सर्वात अनमोल असतील. तुझी प्रिय आई तुझा विचार जेव्हा जेव्हा करेल, तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतील. मात्र तिच्या त्या अश्रूभरल्या डोळ्यात तुझ्या विषयी तुझे वडील कदाचित धीर गंभीरपणे तुझ्याविषयी बोलत राहतील. मात्र त्या धीरोदात्त संवादातही त्यांची अभिमानाने फुलून आलेली छाती कुणाचाच नजरेतून सुटणार नाही. तुझे नातेवाईक, भावंडे, तुझा गाव आणि परिसर यांच्यासाठी तू कायामच एक रिअल हिरो बनून राहशील. तुझ्या नावाची शाळा उघडली जाईल. गावातल्या एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला "शहीद कुंडलिक माने मार्ग" असे नाव दिले जाईल. गावकऱ्यांच्या तोंडी तू एक दंतकथा बनून राहशील अजरामर होशील. तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या साऱ्यांचा विश्‍वास खरा ठरवलास, कुंडलिक आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करुन दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नक्कीच नाही. ईश्‍वर आणि सैन्य सर्वांच्याच आदराचा विषय !! मात्र केवळ संकटकाळीच, एकदा का संकट टळावे मग देवाकडे दुर्लक्ष आणि सैन्याचा तर विसरच. जम्मू-काश्‍मीरमधील काही माध्यमेही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या बातम्या देतात. अशा पत्रकारांविरोधातही कायदेशीर कारवाई करायला हवी. विविध भागांत फुटीरतावादी व दहशतवादी काश्‍मीरमधील जनतेशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विद्वेषाचे जाळे पसरवत आहेत. सध्या काश्‍मीरमध्ये खोट्या बातम्यांचे पेव फुटले आहे. देशविरोधी खोटे आरोप करून काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते, असे दाखवण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन विविध आघाड्यांवर समावेशक धोरण आखायला हवे. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना, सत्तेचा स्वार्थी जुगार, दहशतवाद्यांना अभय, फुटीरवादाला प्रोत्साहन, सत्तेची हाव, घराणेशाहीची घातक परंपरा आणि त्यातून आलेली हुजरेगिरीची वृत्ती, देशहितापेक्षा सत्तेला आणि स्वार्थाला महत्त्व देण्याची परंपरा अशा दुर्गुणांमुळे देशाची अधोगती होते आहे

No comments:

Post a Comment