Total Pageviews

Wednesday 13 March 2013

 
सुरक्षित मुंबई आणी देश
हीच दहशतवादी कारवायात बळी पडलेल्याना खरी श्रद्धांजली

१२ मार्च १९९३चाकाळा शुक्रवार.’ याच दिवशी झालेल्या सलग १३ बॉम्बस्फोटांनी मुंबईच्या सुरक्षिततेचे तीन-तेरा वाजले होते. तेव्हापासून आजतागायत मुंबई पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीला जर रोखायचे असेल तर ज्या शहरात आर्थिक केंद्र एकवटली आहेत, त्यावर हल्ला करायचा हे काम पाकिस्तानने काही देशद्रोही तस्कर-गुंडांना हाताशी धरून पार पाडले होते. कारण मुंबई म्हणजे फक्त लोकसंख्येने देशातील मोठे शहर नाही तर या शहराएवढी आर्थिक उलाढाल होणारे दुसरे शहर भारतात नाही. मुंबईतून देशाला सर्वाधिक सीमा शुल्क (६० टक्के), प्राप्तिकर (३३ टक्के) आणि उत्पादन शुल्क (एकूण देशापैकी २० टक्के) मिळतो. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नव्हे तर भारताच्या आर्थिक आघाडीवरील यशाचे प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. आणि या मोठेपणामुळेच दहशतवाद्यांची वाकडी नजर या महानगरावर पडली आहे. नैसर्गिकरीत्याच मरण पावण्याची शक्यता जास्त१२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात १२ बॉम्बस्फोट घडविण्यात आले. या घटनेला दोन दशके पूर्ण झाली. त्यातील दाऊद, टायगर मेमन आणि ४० आरोपी वगळता १८९ आरोपींना अटक केली. त्यातील १०० आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले असून १० आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. परंतु कसाब अफजल गुरूला फाशी देण्यात आली, मग मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवून सार्‍या देशात हाहाकार माजविणार्‍या आरोपींना फाशी देण्यास इतका विलंब का, असा सवाल जनतेकडून केला जात आहे.१२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात माहीमचा स्मगलर टायगर मेमन, दाऊद आदि गुंडांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशार्‍यावरून बॉम्बस्फोट घडविले. त्यात २५७ जण ठार झाले, तर ७३० लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोट मालिकेत भाग घेणार्‍या १८९ आरोपींना अटक करण्यात यश आले. परंतु दाऊद, टायगर मेमन आदी ४० प्रमुख आरोपी काही अजून मुंबई पोलिसांच्या हाती लागले नाहीत.अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १०० आरोपींना दोषी ठरवून १० आरोपींना ३१ जुलै २००७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. परंतु शिक्षा देण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांविरुद्ध, तर ज्यांना निर्दोष सोडण्यात आले अशा आरोपींविरुद्ध पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले असल्याने हा बॉम्बस्फोट खटला दोन दशके लोटली तरी अद्याप प्रलंबित आहे. १९९३ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी पन्नाशी ओलांडली असून त्यातील जन्मठेप झालेले बहुसंख्य आरोपी खटल्यास होत असलेल्या विलंबामुळे नैसर्गिकरीत्याच मरण पावण्याची शक्यता आहे. फाशी देण्यात आलेल्या १० आरोपींचीही तशीच गत होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अटक करण्यात आलेले जामिनावर सुटलेले १० आरोपी मरण पावले आहेत.मुंबई शहरात १९९० पासून बॉम्बस्फोट मालिका सुरू असून आतापर्यंत अतिरेक्यांनी १०० च्यावर बॉम्बस्फोट घडवून आणून ६०० च्यावर निरपराध लोकांचे बळी घेतले आहेत. दर एक वर्षाआड मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडविले जातात.मुंबापुरीला वारंवार घायाळ होताना पाहावे लागले. सहा डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपरला बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. २७ जानेवारी २००३मध्ये विलेपार्लेत स्फोट झाला. १४ मार्च २००३ मध्ये मुलुंडला लोकलमध्ये स्फोट होऊन १० लोक दगावले. २८ जुलै २००३ मध्ये घाटकोपरला बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट होऊन चार लोक ठार झाले. २५ ऑगस्ट २००२ला झवेरी बाजार आणि गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांनी ५० जणांचा बळी घेतला. ११ जुलै २००६ मध्ये लोकलमध्ये सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, त्यात २०७ जण ठार झाले. त्यानंतर गाजला मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भीषण दहशतवादी हल्ला. १२ मार्च १९९३ रोजी सुरू झालेली ही दहशतवादी हल्ल्यांची साखळी अजूनही तुटलेली नाही. हादरे अजूनही बसताहेत मुंबईतील पहिल्या साखळी बॉंबस्फोट मालिकेमुळे देशाच्या राजकारणावरच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेपासून समाजाच्या मानसिकतेपर्यंत अनेक घटकांवर कायमस्वरूपी परिणाम झाले. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीपाठोपाठ पुढे देशाची राजधानी, आयटी केंद्रे, धार्मिक क्षेत्रे, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत शहरे दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवली. त्या बॉंबस्फोटांचे हादरे आजही बसताहेत, अगदी कालपरवाच्या हैदराबादमधील स्फोटांपर्यंत. भारतीय उपखंडात पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेसारख्या देशांत या दहशतवादाचे जाळे पसरले. माओवाद्यांसोबतच अन्य बंडखोर गट, अमली पदार्थ- शस्त्रास्त्रांचे तस्कर यांच्यापर्यंत त्याची व्याप्ती वाढली. त्यातून राजकारणातही उजव्या विचारसरणीचा गट अधिक प्रभावी, प्रखर बनला. त्याचे परिणाम वेगवेगळ्या हल्ल्यांतून सर्वसामान्य आजही भोगताहेत. मुंबईवर वीस वर्षांपूर्वी हल्ला झाला, तेव्हा गुप्तचर यंत्रणांतील समन्वय आजच्याइतका नव्हता. संपर्क-दळणवळणाचे जाळे भक्कम नव्हते. आर्थिक व्यवहार खिळखिळे करण्याचा हेतू असला, तरी आजवर कधी तो साध्य झाला नाही. अमेरिकेत ज्याप्रमाणे /११च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना डोके वर काढता येणार नाही, अशी स्थिती तेथील प्रशासनाने केली, तशी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून मुंबई सुरक्षित ठेवणे, हीच मुंबईमधील दहशतवादी कारवायात बळी पडलेल्या निष्पापांना खरी श्रद्धांजली ठरेल .दर वेळी स्फोट झाले किंवा घातपाती घटना घडली, की सुरक्षा उपायांचा आढावा घेतला जातो. घोषणा होतात. अत्याधुनिक यंत्रणा पुरवण्याचे वायदे केले जातात. त्यासाठी परदेश दौरे होतात. पण पोलिसांच्या आधुनिक शस्त्रांपासून बुलेटप्रूफ जॅकेटच्या, खबऱ्यांचे जाळे सक्षम करण्यापर्यंतच्या अनेक योजना कागदावरच राहतात. सुरक्षा यंत्रणांतील समन्वयापासून दहशतवादी जाळ्यांच्या माहितीच्या सुसूत्रीकरणापर्यंत फक्त चर्चा झडत राहते. अगदी दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटांच्या मालिकेच्या वेळीही याचाच अनुभव आला. दहशतवादी हल्ल्यांतून आपण काय शिकतो, काय धडा घेतो हे महत्त्वाचे ठरता आपण तेच धडे पुन्हा गिरवतो आहोत का, हाच प्रश्‍न दोन दशकांनंतरही कायम आहे आणि तेच या महानगरीचे दुर्दैव आहे.काही चान्गल्या घडामोडीदहशतवादी कारवायांचा देशपातळीवर तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) स्थापना करण्यात आली. 26-11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये, यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) च्या तळाची मुंबईत स्थापना करण्यात आली. राज्य सरकारनेही "फोर्सवन' कमांडो पथक "क्विक रिस्पॉन्स टीम' तयार केले. गुप्तचरांचे जाळे विकसित करण्यासाठी "महाराष्ट्र इंटेलिजन्स ऍकॅडमी'ही स्थापली. परंतु गुप्तचर विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नसल्याने सुरक्षा यंत्रणांपुढे असलेल्या अडचणी अद्याप कायम आहेत. भारतद्वेष हे पाकिस्तानचे भांडवल असल्याने पाकिस्तानने पॅन इस्लामची कास धरली. यात अफगाणिस्तानच्या समस्येची भर पडल्याने सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला भरघोस आर्थिक मदत मिळाली. त्याचमुळे पाकिस्तानी आणि अफगाणी दहशतवाद्यांना महत्त्व आले आहे. भविष्यात अमेरिका अफगाणिस्तानातून निघून गेली की मोकळे झालेले तालिबानी आपल्यावरच उलटतील, हे निश्‍चित. दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताने आपल्या सागरी सीमा उत्कृष्ट प्रकारे संरक्षित केल्या पाहिजेत. हिंदी महासागरांमधील मुस्लिमबहुल देशांमध्ये "अल कायदा'चे जाळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिसरात निर्मनुष्य बेटेही पुष्कळ आहेत. अफगाणिस्तानातील अफूची वाहतूक "आयएसआय'मार्फत तेथूनच होत असल्याने नार्को टेरिरिझमही वाढला आहे. पाकिस्तानातील अणुइंधन अतिरेक्‍यांच्या हाती जाण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे भारतात अतिरेक्‍यांना हातपाय पसरू देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.
 

No comments:

Post a Comment