Total Pageviews

1,109,998

Friday, 14 March 2025

वाचस्पती कै. स्वर्णलता भिशीकर - चैतन्याची अद्भुत खाण!!--TARUN BHARAT-डॉ. अनघा लवळेकर

 कै. आप्पांच्या, कै. अण्णांच्या मानसकन्या.. ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या , स्वरूपयोग परिवाराच्या ज्येष्ठ साधिका लेखिका, कवयित्री, संवादिका, जीवन-समुपदेशिका ही आणि अशी अनेक रूपे ज्यांच्यात एकवटली अशा लताताई. 

ज्ञानाचा अभिजात वारसा, अध्यात्माचा स्वयंभू पिंड आणि जीवनाप्रति करुणेचा सहजभाव, ही त्रिपुटी असलेल्या दुर्मीळातील दुर्मीळ व्यक्तींपैकी एक म्हणजे वाचस्पती स्वर्णलता भिशीकर. सर्वांच्या आत्मीय ‘लताताई’ दि. 4 मार्च रोजीच्या रात्री हे लौकिक जग सोडून, अलौकिकाच्या प्रवासाला निघून गेल्या. परंतु, त्यांच्या समृद्ध चिंतनाचा, लेखनाचा, अध्यात्म साधनेचा, अर्थगर्भ काव्यलेखनाचा आणि प्रखर राष्ट्रसेवेचा आदर्श त्यांनी, आपल्या सर्वांसमोर उलगडून ठेवला आहे. 

चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर या संघप्रेरित कार्यकर्त्याच्या घरात, 1951 साली त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन काळात ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पा पेंडसे यांच्या परीस-स्पर्शाने, लताताईंच्या मूळ कुशाग्र प्रज्ञेला राष्ट्रअर्चनेचे व्यापक उद्दिष्ट मिळाले. त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी, ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्य करण्यात व्यतीत केले.

 महाविद्यालयीन काळामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या युवती विभागाच्या उभारणीत, त्यांचा मोलाचा सहभाग होताच; परंतु एकीकडे ‘विद्यावाचस्पती पदवी’साठीचे संशोधन करताना, ज्ञानप्रबोधिनीच्या कन्यका प्रशालेच्या पायाभरणीची जबाबदारीही त्यांनी पेलली. त्याचवेळी कै. आप्पांच्या स्वीय साहाय्यकाच्या भूमिकेतून, त्यांच्या संपर्काचा प्रचंड विस्तार लताताईंनी संपूर्ण समर्पित वृत्तीने केला आणि जोपासलाही! वाचन कौशल्य या अत्यंत कळीच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या मूलभूत विषयावर त्यांनी मिळवलेली ‘विद्यावाचस्पती पदवी’ प्रायोगिक अभ्यासमालेतील मैलाचा दगड म्हणावी, इतकी शास्त्रशुद्ध आणि उपयोजित आवाका असलेली आहे. त्या अभ्यासाच्या जोरावर गती वाचनाचे प्रशिक्षण वर्ग ज्ञान प्रबोधिनीमध्ये, शालेय मुलांपासून ते औद्योगिक अधिकार्‍यांपर्यंत विकसित होऊ शकले, ही त्याची महत्त्वाची फलश्रुती आहे.

कै. आप्पांच्या निधनानंतर ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक कै.व.सी.तथा अण्णा ताम्हनकर यांच्याही कामात, त्या बरोबरीने उभ्या राहिल्या. ज्ञान प्रबोधिनीसमोर त्याकाळी असणार्‍या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, आशाताई भोसले यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम योजला गेला, तो लताताईंच्या आणि गो. नी. तथा आप्पा दांडेकर यांच्या अपार स्नेहाच्या माध्यमातून झालेल्या संपर्कामुळेच. असे असंख्य स्नेहबंध त्यांनी जोडले, जोपासले आणि ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात सामावून घेतले. देश-विदेशामध्येही भारतीय संस्कृती आणि अध्यात्म विचार यांची मांडणी, बाल आणि युवा वर्गापासून ते साधना मार्गावर चालणार्‍या अनुभवी साधकांपर्यंत विविध गटांसमोर त्यांनी सातत्याने केली. 

1990 साली ज्ञान प्रबोधिनीने सोलापूर येथे, कै. अवंतिकाबाई व कै. जनुभाऊ केळकर यांनी स्थापन केलेली ‘बालविकास मंदिर’ ही प्रस्थापित शाळा चालविण्याचा व वाढवण्याचा पत्कर घेतला, तेव्हा कै. अण्णा ताम्हनकर यांच्यासोबत लताताई आणि गायत्रीताई सेवक या सोलापुरात नुसत्या गेल्याच नाहीत, तर सोलापूरकरच झाल्या. लताताई तर गेल्या 35 वर्षांत, त्यांच्या विविधांगी कार्यामुळे सोलापूरवासीयांच्या आदराची आणि विश्वासाची जागा बनल्या. सोलापूरमधील शाळेत, बालविकासाच्या दृष्टीने केलेले अभिनव प्रयोग, शासनाच्या साक्षरता चळवळीला लताताईंच्या दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वामुळे मिळालेली विलक्षण गती आणि सुयश, अध्यात्माच्या ओढीने जमणार्‍या हजारोंना मिळालेला त्यांच्या सत्संगाचा पावन स्पर्श, अशा कैक आघाड्यांवर लताताईंनी लोकांच्या बुद्धी आणि हृदयाला अनुकूल दिशेने घडवण्याचे कार्य अथकपणे केले. बालविकास मंदिराच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, शासनासमवेत त्यावेळी करावा लागलेला विधायक भूमिकेतील संघर्ष आणि त्याचवेळी त्याच रचनेतील सुजाण वृत्तींच्या माणसांना जोडून घेणारी त्यांची अत्यंत रुजू आणि स्नेहमयी वृत्ती, या दोन्हीचा लोकविलक्षण मिलाफ समाजाने अनुभवला.

1993 सालचा किल्लारी भूकंप, हा एका मोठ्या सामाजिक शैक्षणिक उलथापालथीचा कारण बनला. त्यावेळी हराळीसारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षणाच्या वर्गांपासून, सुरुवात करून आज शेकडो विद्यार्थ्यांना सामावून घेणारी निवासी शाळा प्रकल्प संकुल उभारण्यामध्ये, अण्णा आणि लताताईंचे अथक परिश्रम शिंपले गेले आहेत. आता तर आसपासच्या परिसरातील तांड्या- वस्त्यांमध्ये ही शिक्षणाची गंगा पोहोचवणारी एक चळवळ म्हणून ‘हराळी केंद्र’ विकसित होत आहे. अशा सर्व उपक्रमांच्या पाठीशी असलेले लताताईंचे सखोल चिंतन आणि अदम्य प्रेरणा, कार्यकर्त्यांना बळ पुरवीत आली आहे. ‘ज्ञान बनो कर्मशील-कर्म ज्ञानवान’ हे वाक्य, लताताईंच्या आयुष्यात पूर्णांशाने प्रतिबिंबित झालेले दिसते. 

लताताईंचे सामाजिक काम केवळ शिक्षणाला पुढावा देणे एवढेच मर्यादित राहिले नाही, तर अक्षरशः ‘जे का रंजले गांजले-त्यांसी म्हणावे आपुले’ या उक्तीनुसार, त्यांनी शेकडो जणांच्या व्यथांवर हळूवार फुंकर घालत, सहज अशा संवादातून त्यांना आयुष्याची उभारी पुन्हा दिली. सर्व स्तरातल्या वयाच्या आणि वृत्तींच्या व्यक्तींनी, त्यांचे भरून आलेले आभाळ मोकळे करण्यासाठी आणि सार्थकतेने जगण्याची उर्मी जागी होण्यासाठी, लताताईंच्या कुशीत काही काळ विसावा घेतलेला आहे. ‘वज्राद्पी कठोराणि-मृदुनि कुसुमादपि’ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पंजाबच्या अशांत काळातील, ज्ञानप्रबोधिनीच्या युवतींनी केलेला अभ्यास दौरा लताताईंच्या निर्भय आणि तरीही स्नेहपूर्ण नेतृत्वामुळे, अनेक कसोटीच्या प्रसंगांमध्येही यशस्वी झाला. देवराळा येथील रूपकुंवर सती प्रकरणावेळच्या अभ्यास दौर्‍यातही, काही बांक्या प्रसंगांमध्ये ज्या लताताईंचे उग्रचंडीचे रूप बघायला मिळाले. त्याच लताताई त्यांच्या सहवासात आलेल्या कठीण, ताठर व्यक्तीलाही त्यांच्या रुजुतेच्या बळावर कसे वितळायला लावत, याचेही अनेक प्रसंग कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाले. 

अत्यंत रसाळ आणि प्रेरक लेखन, ही तर त्यांची एक खास अशी ओळख आहे. त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत आशयसमृद्ध आणि अक्षर वाङ्मय ठरावे अशी आहे. भगिनी निवेदितांच्या सार्ध शताब्दी वर्षांमध्ये, निवेदितांच्या कार्यावरील पुस्तिकासंचातील शिक्षण विचारांवरील लताताईंनी लिहिलेले पुस्तक, शिक्षण क्षेत्रासाठी एक अमूल्य असा ठेवा बनले आहे. स्वामी विवेकानंदांच्या ‘अ ीळीळपस लरश्रश्र ीें कळपर्वी छरींळेप’ या पुस्तकाच्या ‘हिंदूतेजा जाग रे’ या अनुवादापासून ते ‘उजळती वाट’सारख्या, कुमारवयीन मुलांना सोप्या सोप्या उदाहरणातून व्यक्ती विकासाचे नेमके मर्म सांगणार्‍या पुस्तकापर्यंत, त्यांच्या अभिव्यक्तीचा विस्तार आहे. 

कविता हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ‘देवचाफे’ हा त्यांचा वयाच्या विशीत लिहिलेला कवितासंग्रह. त्याला लाभलेले कुसुमाग्रजांसारख्या ऋषी-कवीचे, आशीर्वादपर प्रास्ताविक आणि राज्य सरकार पुरस्कारही मिळावा, ही त्यांच्या स्वयंभू प्रतिभेला मिळालेली महत्त्वाची पावतीच आहे. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी केलेला भावानुवाद म्हणजे, आत्मचिंतनाची हळूवार झुळूक आहे. सर्वांना प्रिय असलेल्या आणि अत्यंत अचूक आणि भरीव शब्द योजना असलेल्या, त्यांच्या अनेक पद्य, गीतांनी प्रबोधिनीच्या कित्येक पिढ्यांमध्ये प्रेरणेचा झरा वाहता ठेवला आहे. ‘आव्हान हे ज्योती ना किया’, ‘शुभ्र सुगंधित पुष्पे’, ‘गिरी कुहरातील गर्द बनातील’ अशा जोशपूर्ण गीतांपासून, ‘पाखरे भरारली निळी नभे झळाळली’सारख्या सुंदर अशा संचलन गीतापर्यंत आणि ‘राष्ट्ररथाला विजयी होण्यासम बल चक्रे दोन हवी’ या सुंदर शब्दांनी विणलेल्या, स्त्री पुरुष संपूरकतेवरच्या गीतापर्यंत किती किती गीतांना आठवावे? 

या सर्वांच्या पल्याडची त्यांची अजून एक ओळख म्हणजे, त्यांनी आयुष्यभर साधलेली आत्मविलोपी अध्यात्म साधना.

 कै. विमलाजी ठकार आणि स्वामी माधवनाथ, या दोघांचाही अनुग्रह त्यांना लाभला होता. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणार्‍या योग्याचे रूप, त्यांच्यामध्ये आम्हाला नित्य बघायला मिळाले. ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ म्हणजे काय, हे लताताईंच्या सहवासातल्या प्रत्येकाला कोणत्याही औपचारिक शब्दांशिवायच उमगले असणार, यात शंका नाही! परमात्म्याचा अंश प्रत्येकाच्या स्वरूपात आहे, हे सत्य सहवासात येणार्‍या प्रत्येकाशी, त्यांच्या होणार्‍या वर्तनातून सहजपणे प्रतिबिंबित होताना आम्ही पुन्हा पुन्हा अनुभवले आहे. एक शब्दही न बोलता ज्यांना दुसर्‍यांच्या व्यथा समजतात आणि जे त्यावर हळूवार फुंकर घालतात, अशा मोजक्या साधकांपैकी लताताई एक आहेत. (होत्या असे म्हणायला जीभ धजावत नाही. इतक्या त्या मनातून अजूनही आम्हा सर्वांच्या निकट आहेत.) आयुष्यभर स्वतःच्या गरजांचा अत्यंतिक संकोच करून घेत असतानाही, इतरांच्या गरजांचा विशालवृत्तीने विचार स्वीकार करणे, हे त्यांना कसे जमले असेल?

 ‘मृत्यू’ या विषयावरीलही त्यांचे चिंतन दीर्घकाळ चालू असणार असेच वाटते. सुमारे 25 वर्षांपूर्वी काहीशा धाडसाने त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, “माणसाचे अस्तित्व शरीराशिवाय वेगळे असते का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? पुस्तकातील उत्तरे मला माहीत आहेत. पण, तुमचा अनुभव असेल तर तसे सांगा.”

 

आजही त्यांचे खणखणीत शब्द मला स्पष्ट आठवतात. त्या म्हणाल्या होत्या, “होय. मी असा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी हे विश्वासाने सांगू शकते की, शरीर हे माणसाचे खरे अस्तित्व नाही.” त्यानंतर त्याविषयी कोणतीही शंका माझ्या मनात उद्भवली नाही. अशाच काही निमित्ताने, दोन वर्षांमागे त्यांनी मला ओशो यांचे ‘अबाऊट लिविंग अ‍ॅण्ड डाईंग’ हे पुस्तक वाचायला सांगितले. ते वाचत असतानाही, लताताईंचे 25 वर्षांपूर्वीचे शब्द माझी सोबत करत होते. गेली दीड वर्षे ज्या दुर्धर आजाराचा सहवास त्यांना लाभला, त्यालाही त्यांनी स्नेहभावाने कसे आपलेसे केले, हे त्यामुळे आता उमगते. अत्यंत समत्वचित्ताने स्वतःच्या निर्वाणानंतर काय करायचे याचे टिपण स्व:हस्ताक्षरात करून, पूर्ण तयारीनिशी या अनुभवाला त्या सज्ज झाल्या होत्या. हे केवळ कल्पनेपलीकडील वास्तव आहे.

 

अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाला लौकिक जीवनात जे अनेक पुरस्कार मिळाले, त्याच्या कितीतरी पलीकडे आणि उंचावर असे स्थान त्यांना ओळखणार्‍या, किंचित सहवासही लाभलेल्या किंवा त्यांच्याविषयी फक्त ऐकलेल्या हजारो-हजारो लोकांच्या हृदयात मिळालेले आहे. त्यांच्या कर्मयोगाचा आणि आत्मविलोपी वृत्तीचा वारसा जमेल तसा पुढे नेणे, हेच खरे तर त्यांचे पुण्यस्मरण आहे. म्हणूनच असे वाटते,

 

देवाघरचा पारिजात हा फुलला अपुल्या घरी,

विशुद्ध सात्विक शुभ्रसुमांनी दरवळली ओसरी।

स्मरति रूपे किती बिलोरी पूर्णिम् चंद्रापरी,

छाया-माया तुझी निरंतर जपतो हृदयांतरी।

शब्दांना ओलांडून जावे तिथे तुझा गं गाव,

चैतन्याने चैतन्यागृही सहजच केला ठाव।

आदरणीय लताताईंच्या स्मृतीस सस्नेह-सादर अभिवादन!

 

 




https://www.mahamtb.com//Encyc/2025/3/8/Vachaspati-Swarnalata-Bhishikar.html

No comments:

Post a Comment