Total Pageviews

Friday 30 December 2016

देशात काय चालले आहे? कश्मीर ते मणिपूर -संजय राऊत


‘राज्यकर्ते मुर्दाड आहेत. त्यांना पुत्र, पती आणि बाप गमावल्याचे दु:ख काय कळणार?’ असा आक्रोश पुण्यातील वीर जवान सौरभ फराटे याच्या मातापित्यांनी केला आहे. कश्मीरात वर्षभरात ६० च्या वर जवान शहीद झाले. ‘नोटाबंदी’वरील प्रवचने हा त्यावरचा उपाय नाही. कश्मीरला मागे टाकेल असा उद्रेक मणिपूर राज्यात सुरू आहे. त्याचे कुणाला काही वाटते काय? देशात नक्की काय चालले आहे, याविषयी आपल्यापैकी कितीजणांना कल्पना आहे? राज्य कोणत्याही पक्षाचे असो, देश नीट चालावा म्हणजे झाले. तसे आज खरोखरच होत आहे काय? आपण देशाची ‘व्याख्या’ स्वत:पुरती बदलून घेतली आहे. देश म्हणजे मी व माझा धर्म. देश म्हणजे मी आणि माझी जात. देश म्हणजे मी आणि माझे सुख, माझे गाव. फार तर माझा जिल्हा आणि शहर. १४०-१५० कोटी लोकसंख्येच्या देशात काय चालले आहे ते पाहायला आज वेळ कुणाकडे आहे? आपण कश्मीरवर बोलतो आणि वाचतो, पण कश्मीरपेक्षा भयंकर अवस्था सध्या मणिपूरची आहे. तेथेही दहशतवाद्यांचे लष्करी तुकड्यांवर हल्ले सुरू आहेत व जनता रस्त्यावर उतरून हिंसाचार करीत आहे. राजधानी इम्फाळमध्ये नोटाबंदीनंतर जी चलनटंचाई निर्माण झाली त्यामुळे त्रासलेल्या जनतेने रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त केला. चलनटंचाई, वाढलेली महागाई, सतत होणारे दहशतवादी हल्ले यामुळे मणिपूरची जनता संतापली. रविवारी त्यांनी रस्त्यांवर उतरून तोडफोड केली. वाहने पेटवून दिली. ‘नोटाबंदी’नंतर मणिपुरात आर्थिक अडचणी वाढल्या. सध्या तेथे जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा बंद आहे. कायदा-सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. पण मणिपूर हा आपल्या देशाचा एक भाग आहे हे आपण विसरून गेलो. पंतप्रधान ‘कश्मीर’ प्रश्‍नावर बोलतात. लष्करप्रमुख व संरक्षणमंत्री कश्मीर दौर्‍यावर जातात व त्याचे फोटो प्रसिद्ध होतात, पण मणिपूर पेटले आहे, तेथे असा एखादा ‘दौरा’ काढल्याचे स्मरत नाही. पेटलेल्या ईशान्येवर कोणी ‘मन की बात’ बोलताना दिसत नाही. मुर्दाड राज्यकर्ते ‘‘राज्यकर्ते मुर्दाड आहेत. यांना पुत्र, पती आणि बाप गमावल्याचे दु:ख काय कळणार?’’ असा टाहो पुण्यातील वीर जवान सौरभ फराटे याच्या मातापित्यांनी फोडला आहे. कश्मीर खोर्‍यात आणखी एक जवान शहीद झाला. त्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. २१ तोफांच्या सलामीनंतर सर्वकाही शांत झाले. पण कश्मीरातील जवानांचे हौतात्म्य कोणत्याही थेट युद्धाशिवाय सुरूच आहे व जवानांच्या शवपेट्या महाराष्ट्रातच सर्वाधिक येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे हृदय जळते. अमित शहा व त्यांचे सहकारी देशाच्या अर्थकारणावर बोलत आहेत. नोटाबंदीच्या फायद्यावर बोलत आहेत. पण महाराष्ट्र फक्त रोज गमावणार्‍या वीरपुत्रांवर बोलत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही दहशतवाद्यांचे हल्ले का थांबले नाहीत? कश्मीरात आमच्या जवानांच्या हौतात्म्याची संख्या दुपटीने वाढली आहे. ‘नोटाबंदी’नंतर अतिरक्यांनी बँका लुटल्या व नवीन नोटांची बंडले पळवून नेली. यावर सरकार व त्यांचे समर्थक ‘शांती शांती’चा नारा देत बसले आहेत. मणिपूरची स्थिती माहीत नाही व कश्मीरकडे डोळे झाकून पाहत आहोत. हा देश मुर्दाडांचा आहे, असे वीरपुत्र सौरभ फराटेचे मातापिता सांगतात ते अशावेळी खरेच वाटते. मणिपूरची नाकेबंदी कश्मीर व इतर सीमावर्ती राज्यांत फरक करू नये असे वाटते. कश्मीरच्या बाबतीत ज्या भावना आहेत त्या मणिपूरच्या बाबतीत असू नयेत हे चुकीचे आहे. कश्मीरातील जनता रस्त्यावर उतरते, त्यांच्या हक्कांसाठी भांडणारे सर्वपक्षीय नेते हीरो ठरतात. कारण कश्मीरचा प्रश्‍न हा राष्ट्रीय नसून मुसलमानांचा म्हणून मांडला जातो. मणिपुरात समस्या त्याहून गंभीर आहेत. पण तेथील प्रश्‍न मुसलमानांशी संबंधित नाही. त्यामुळे कश्मीरप्रमाणे मणिपुरातही एखादे सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्यावे अशी मागणी कोणी करीत नाही. मणिपुरातील हिंसाचारामागे सरळसरळ चीनची फूस आहे हे समजून घेतले तर गांभीर्य लक्षात येईल. आजही मणिपुरातील काही संघटनांनी ‘नाकाबंदी’ केली आहे. ४८ दिवसांनंतरही ही नाकाबंदी उठू शकली नाही. रस्ते, हायवे बंद आहेत. इंटरनेट बंद आहे. रस्त्यात डिझेल-पेट्रोलची टंचाई आहे व पेट्रोल ४०० रुपये लिटरने विकले जात आहे. अर्ध्या राज्यात सतत १४४ कलम लागूच असते, पण मणिपूरच्या भविष्याची चिंता नाही. मणिपूरमुळे देशाच्या राजकारणावर प्रभाव पडत नाही. त्यामुळे मणिपूर जळत असताना भाजपसह सगळ्याच राष्ट्रीय पक्षांचे मन फक्त उत्तर प्रदेशात गुंतले आहे. सरकारचे सर्व निर्णय उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून होत आहेत. मणिपूरसारखी राज्ये जळून खाक झाली तरी चालतील, पण उत्तर प्रदेश जिंकायला हवे. मणिपूरचा घास गिळून चिनी लाल अजगराने ढेकर दिला तरी चालेल, पण उत्तर प्रदेशात राजकीय पराभव होता कामा नये, या विवंचनेत सगळेच आहेत - See more at: http://www.saamana.com/utsav/rokhthok-deshat-kay-chalale-ahe#sthash.hsnmutL4.dpuf

No comments:

Post a Comment