Total Pageviews

Tuesday 4 November 2014

वाघा येथील बाँबहल्ला हा पाकिस्तान देश म्हणून किती रसातळाला चाललेला आहे, याचे निदर्शक

वाघा येथील बाँबहल्ला हा पाकिस्तान देश म्हणून किती रसातळाला चाललेला आहे, याचे निदर्शक आहे. अन्य दहशतवादी हल्ले आणि वाघा येथील घटना यांत मूलत: फरक असून ताजा दहशतवादी हल्ला हे थेट लष्कराला देण्यात आलेले आव्हान आहे. उत्तर वझिरिस्तानच्या परिसरात पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेतलेली असून वाघा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा या कारवाईच्या निषेधार्थ होता. त्यात जवळपास ६० जणांचे प्राण गेले. मृतांत लष्करी सैनिक आणि सर्वसाधारण नागरिक, महिला अशा सर्वाचाच समावेश आहे. वास्तविक वाघा येथील समारंभस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था असते. तरीही इतका मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, हे अनेक अंगांनी प्रश्न निर्माण करणारे आहे. या बाँबस्फोटाची तीव्रता इतकी होती की भारताच्या बाजूला असलेल्या अनेकांच्या पायाखालची धरणी भंगल्याचा भास झाला. हा हल्ला होता तो पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करण्यासाठी. इतके दिवस पाकिस्तानी राजकीय सत्तेने लष्कर हे दहशतवाद्यांच्या सुप्त पाठिंब्यासाठी वापरले. या पापाची सुरुवात माजी लष्करशहा झिया उल हक यांच्यापासून होते. झिया हे सत्तेवर येण्याचा काळ आणि अमेरिकेने अफगाणिस्तानात तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या विरोधात उचापती करण्याचा काळ एकच. अफगाणिस्तानात रशियन फौजा घुसल्यानंतर त्या देशाच्या विरोधात अमेरिकेने नाना उद्योग केले. अफगाणिस्तानातील घुसखोरी हे सोव्हिएत रशियाचे व्हिएतनाम असल्याचे सिद्ध व्हावे ही अमेरिकेची इच्छा आणि आकांक्षा होती. ती पूर्ण व्हावी यासाठी अमेरिकेने मिळेल त्याची मदत घेतली आणि ती घेताना कोणताही साध्यसाधन विवेक पाळला नाही. अफगाणिस्तानात रशियाच्या विरोधात लढण्यास तयार आहेत म्हणून या जागतिक महासत्तेने सौदी अरेबियाच्या मदतीने सर्व इस्लामी देशांत मिळेल त्याची भरती केली. प्रसंगी मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांत गुन्हेगार म्हणून तुरुंगात असलेल्या गुंडपुंडांचीही त्यांनी सुटका करवली आणि या अशा ओवाळून टाकलेल्यांना शस्त्रसज्ज करून अफगाणिस्तानात लढण्यासाठी पाठवले. अमेरिकेच्या या निर्लज्ज नियोजनाचा सर्वात मोठा लाभार्थी पाकिस्तान. तो असा की ही बेकायदा व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी जनरल झिया यांनी उचलली. त्याचा दुहेरी फायदा त्यांनी उचलला. अमेरिकेकडून या उद्योगार्थ मिळणाऱ्या मलिद्याचा वाटा स्विस बँकेत खासगी खाते उघडून स्वत:साठी वापरला आणि उरलेला भारताविरोधात भडकावणारे मदरसे स्थापन करण्यात घालवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावर्ती भागात सर्वाधिक संख्येने मदरसे उभे राहिले ते जनरल झिया यांच्या कारकिर्दीत. तेव्हा आता जे काही होत आहे ते जनरल झिया यांनी लावलेल्या विषवल्लीस बहर आल्यामुळे. जनरल झिया यांच्या काळात पाकिस्तानची गाडी जी घसरली ती पूर्णपणे रुळावर आलीच नाही. मुलकी प्रशासन आणि लष्करी यंत्रणा यांच्यात तेव्हापासून संघर्ष अधिकच तीव्र होऊ लागला आणि दोहोंतील विसंवादामुळे दहशतवाद्यांचेच फावले. बेनझीर भुत्तो अथवा नवाझ शरीफ यांनी आपापल्या परीने मुलकी अधिकार सर्वोच्च राहतील हे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. पाकिस्तानी व्यवस्थेत लष्कराचे हितसंबंध मोठय़ा प्रमाणावर आहेत. या लष्करी अधिकाऱ्यांचे महाप्रचंड जमीनजुमले असून पाकिस्तान सतत अस्थिर राहण्यात त्यांना रस असतो. याचे कारण असे की युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास या लष्करी अधिकाऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा वाटा मिळत राहतो आणि जनरल झिया यांच्याप्रमाणेच त्यातील बराचसा वैयक्तिक खासगी उद्योगांत वापरता येतो. दरम्यानच्या काळात लष्करशहा बनलेले जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हेच केले. एकीकडे पंतप्रधान नवाझ शरीफ भारताशी चर्चापरिसंवादातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असताना या जनरल मुशर्रफ यांनी कारगिल घडवून आणले. आताही भारताबरोबर सौहार्दाचे संबंध निर्मितीची केवळ इच्छा पंतप्रधान शरीफ यांनी व्यक्त केल्यावर त्यांच्या लष्कराने काश्मीर प्रश्न उकरून काढला. तेव्हा याचा अर्थ इतकाच की पाकिस्तानात लोकशाही वगैरे असल्याचा दावा केला जात असला तरी निवडून आलेले सरकार केवळ नामधारी असते, हे कितीही कटू असले तरी वास्तव असते. भारत पाकिस्तान भाई भाईचा देखावा करीत पाकिस्तानात बिर्याणीवर ताव मारून येणारे बोलघेवडे काहीही सांगोत. पाकिस्तानातील शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या बेतात असून देश म्हणून तो जो काही दिसतो ते केवळ अल्लाभरोसेच म्हणावयास हवे. लष्कर आणि प्रशासन यांच्यात अविश्वास, राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यात अविश्वास, लष्कर आणि धर्मसत्ता यांच्यात तणाव आणि लष्करातही दुभंग अशी त्या देशाची परिस्थिती असून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, असे चित्र आहे. सध्या जे काही घडताना दिसते ते लष्करातील बेदिलीमुळे, हे लक्षात घ्यावयास हवे. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच उत्तर वझिरिस्तान परिसरात झर्ब- ए- अझ्ब मोहीम हाती घेतली. त्या देशास जागतिक लाजेकाजेस्तव असे काही करावे लागते. सरकार म्हणून आम्ही दहशतवाद्यांचा बीमोडच करू इच्छितो असे चित्र उभे करणे हा या मोहिमेचा उद्देश. त्याचाच भाग म्हणून अल कईदाच्या स्थानिक शाखांविरोधात या मोहिमेंतर्गत लष्करी कारवाया सुरू झाल्या होत्या. परिणामी या संघटनांच्या अनेक मुखंडांवर आश्रयासाठी अफगाणिस्तानात जाण्याची वेळ आली. त्यामुळे लष्कराविरोधात मोठा संताप होता. त्याचीच परिणती वाघा येथील स्फोटात झाली. एरव्ही शक्य झाल्यास या दहशतवादी संघटनांनी केवळ लष्करी आस्थापनांवरच हल्ला घडवून आणला असता. परंतु तसे केले असते तर केवळ लष्करी हानी झाली असती आणि सामान्य माणसावर त्याचा तितका परिणाम झाला नसता. वाघा हे स्थळ निवडले गेले ते या उद्देशाने. या स्थळी भारत आणि पाकिस्तान या उभय देशांतील नागरिक मोठय़ा प्रमाणावर दररोज जमा होतात आणि आपापल्या जवानांविषयी असलेला आदर वृद्धिंगत करून परत जातात. उभय देशांतील नागरिकांना राष्ट्रवादाचा मोठा डोस देण्यासाठी हे स्थळ ओळखले जाते. एकमेकांवर दातओठ खात, पाय आपटत चालून जात असल्यासारखे भासणारे परस्परांचे जवान पाहून वाघा येथे अनेकांच्या राष्ट्रवादी भावना उचंबळून येतात. याचा अर्थ येथे येणारे नागरिक आपापल्या लष्कराविषयी आदराची भावना बाळगत परत जातात. तेव्हा आत्मघातकी हल्ल्यासाठी हीच जागा निवडून दहशतवाद्यांनी या लष्कराविषयीच्या भावनेलाच तडा जाईल अशी व्यवस्था केली. त्याच वेळी आणखी एका दृष्टिकोनातून या हल्ल्याचा विचार करावयास हवा. तो म्हणजे लष्करातील बेदिली. जेथे हा बाँबस्फोट झाला त्या जागी लष्कराचा चोख बंदोबस्त होता आणि तेथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून पाहणी केली जाते. तरीही अंगावर इतकी स्फोटके घेऊन एखादी व्यक्ती त्या परिसरात पोहोचते तेव्हा शंकासंशयाची पाल चुकचुकल्यास नवल नाही. याचा अर्थ इतकाच की या कारवाई संदर्भात लष्करात काही दुमत नाही असे मानून चालणार नाही. तेव्हा लष्करातील या दुभंगाचा फायदा दहशतवादी संघटनांना झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधी पाकिस्तानी लष्करातील मतभेदांचा फायदा दहशतवादी संघटनांनी उचलल्याचे अनेक दाखले आहेत. हा ताजा दहशतवादी हल्ला या झर्ब- ए- अझ्ब मोहिमेचा झटका आहे.

No comments:

Post a Comment