Total Pageviews

Tuesday 31 January 2012

नवदीप सिंगचे हौतात्म्य वाया घालवणार का?

http://www.saamana.com/
नवदीप सिंगचे हौतात्म्य वाया घालवणार का?शहीद झालेल्या नवदीपची शौर्यगाथा हिंदुस्थानातील तमाम नागरिकांपुढे आणावी, असे प्रसारमाध्यमांना वाटले नाही. आपण आतापर्यंत या ‘सुपर हीरोज’ना ओळखू शकलो आहोत का? ज्या कश्मीरसाठी हे जवान प्राण देत आहेत त्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी राजकीय पातळीवर काय प्रयत्न चालले आहेत? सीमांचे संरक्षण करत असताना हिंदुस्थानी सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते. मात्र अहिंसेच्या अतिरेकी कल्पना, सत्तेचा स्वार्थी जुगार, दहशतवाद्यांना अभय, फुटीरवादाला प्रोत्साहन, सत्तेची हाव, घराणेशाहीची घातक परंपरा आणि त्यातून आलेली हुजरेगिरीची वृत्ती, देशहितापेक्षा सत्तेला आणि स्वार्थाला महत्त्व देण्याची परंपरा अशा दुर्गुणांमुळे हे हौतात्म्य आपण वाया घालवणार का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी रोखताना हौतात्म्य आलेल्या लेफ्टनंट नवदीप सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आले. जम्मू-कश्मीरमधील घुसखोरी रोखताना त्यांनी अचाट शौर्य दाखवले होते. नवदीप सिंगचे वडील सुभेदार मेजर (निवृत्त) जोगिंदरसिंग यांनी ते स्वीकारले.
कश्मीरमध्ये जवान जीवाची बाजी लावून लढत आहेत. पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फायदा करून घेणे राजकीय नेत्यांना जमले नाही; उलट विघातक राजकारणाने परिस्थिती चिघळतेच आहे. दरवर्षी हिंदुस्थानी लष्करातील दहा ते पंधरा अधिकारी आणि ३५० ते ५०० जवानांना कश्मीरसाठी वीरमरण येते. जबर जखमींची संख्या त्याच्या चौपट आहे. लेफ्टनंट नवदीप सिंग हा अवघ्या २६ वर्षांचा जवान. २१ ऑगस्टला त्याने पराक्रमाची शर्थ केली. नीलम नदी ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीत दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करताहेत, हे समजताच सहकार्‍यांसह तेथे धाव घेऊन तीन घुसखोरांना कंठस्नान घालताना शहीद झालेल्या नवदीपची शौर्यगाथा हिंदुस्थानातील तमाम नागरिकांपुढे आणावी, असे प्रसारमाध्यमांना वाटले नाही. आपण आतापर्यंत या ‘सुपर हीरोज’ना ओळखू शकलो आहोत का? ज्या कश्मीरसाठी हे जवान प्राण देत आहेत त्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी राजकीय पातळीवर काय प्रयत्न चालले आहेत? हिंदुस्थानातील करदात्यांचे कोट्यवधी रुपये कश्मीरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी ओतले जात आहेत. हा पैसा कुठे जातो, हे न सांगताही सर्वांना माहीत आहे. उर्वरित हिंदुस्थानातील नागरिकांनाही बेरोजगारीची समस्या आहे. महागाईच्या चटक्यांनी त्यांचेही जीवन होरपळून निघत आहे. तरीही देशभक्त नागरिक कश्मीरसाठी ओतल्या जाणार्‍या प्रचंड निधीबद्दल चुकूनही शब्द काढत नाहीत. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये ३०० ते ५०० दहशतवादी कारवाया करीत आहेत. याशिवाय ३००० ते ३५०० दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरीच्या तयारीत आहेत. जवानांचे शौर्य आणि निष्ठा यामुळे दहशतवादी आणि घुसखोरी यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
जम्मू-कश्मीरमधील काही माध्यमेही पाकिस्तानला पाठिंबा देणार्‍या बातम्या देतात. अशा पत्रकारांविरोधातही कायदेशीर कारवाई करायला हवी. सध्या कश्मीरमध्ये खोट्या बातम्यांचे पेव फुटले आहे. देशविरोधी खोटे आरोप करून कश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते, असे दाखवण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात. दुर्दैवाने केंद्र सरकारने नेमलेले संवादकही तशा गैरप्रचाराला पुष्टी देणार्‍या शिफारसी करतात. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना, सत्तेचा स्वार्थी जुगार, दहशतवाद्यांना अभय, फुटीरवादाला प्रोत्साहन, सत्तेची हाव, घराणेशाहीची घातक परंपरा आणि त्यातून आलेली हुजरेगिरीची वृत्ती, देशहितापेक्षा सत्तेला आणि स्वार्थाला महत्त्व देण्याची परंपरा अशा दुर्गुणांमुळे देशाची अधोगती होते आहे.
कश्मीरमधील गुरेझजवळ तैनात १५ मराठा लाइट इन्फंट्रीवर सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवण्याची जबाबदारी असते. पाचच महिन्यांपूर्वी येथे रुजू झालेला लेफ्टनंट नवदीप डोळ्यात तेल घालून सीमेवर गस्त घालत होता. २१ ऑगस्टची ती रात्र. मध्यरात्रीचे १२.४५ होत आलेले. आपल्या हद्दीतील नियंत्रणरेषा असणारी नीलम नदी ओलांडून १२ घुसखोर आत घुसल्याची माहिती नवदीपला मिळाली. आपल्या पथकासह नवदीपने या अतिरेक्यांंवर हल्ला चढवला आणि पहिल्याच तडाख्यात तीन अतिरेकी टिपले. पथकातील शिपाई विजय गजरे जखमी झाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत नवदीपने धडाडीने आणखी एका पाकिस्तानी घुसखोरास आपल्या बंदुकीचा हिसका दाखवत झटक्यातच खतम केले. पण त्याच वेळी अतिरेक्यांच्या एका गोळीने नवदीपचा वेध घेतला आणि भारतमातेचा हा वीरपुत्र धारातीर्थी पडला. ‘२६/११’ च्या मुंबईवरील हल्ल्यातील १० दहशतवाद्यांना मारण्याकरिता तीन दिवस लागले होते. पण कश्मीर सीमेवर नीलम नदीमधून झालेल्या या घुसखोरीनंतर पूर्ण रात्र चाललेल्या लढाईस आपल्या प्रसारमाध्यमांनी फारसे महत्त्व दिले नाही.
काय अर्थ आहे बलिदानाचा?सीमांचे संरक्षण करत असताना हिंदुस्थानी सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नवदीपच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रिय नवदीप, तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यंत अटीतटीची आणि तीव्र होती हे निश्चित. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दु:ख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. ‘‘काय अर्थ आहे तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा? आज तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या सार्‍या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायमची थंडावलीय. तुझा शहीद देह घरी आणला जाईल तेव्हा अमेरिकेप्रमाणे हिंदुस्थान सरकारकडून तुला मानपत्र दिले जाणार नाही किंवा इंग्लंडप्रमाणे संसदेच्या सर्वोच्च सभागृहात तुझ्या नावे शोकसंदेश वाचला जाणार नाही. एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही; कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. कश्मीर खोर्‍यातून तुला निरोप देताना सर्वात ज्येष्ठ अधिकारी तुला अन्य अधिकार्‍यांसह मानवंदना देतील. तुझ्या युनिटचे प्रतिनिधी तुला सुखरूप घरी पोहोचवतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलेस तो छातीस लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला जाईल. नवदीप, तुला नशीबवानच म्हणायला हवे.
तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास; कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या सार्‍यांचा विश्वास खरा ठरवलास. लेफ्टनंट, आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करून दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नाहीच. प्रश्‍न आहे तो इतरांचा. तुझ्यासारख्या शूरवीरांचे हौतात्म्य आम्ही वाया घालविणार आहोत का, हाच खरा प्रश्‍न आहे.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन

No comments:

Post a Comment