Total Pageviews

Thursday 5 May 2011

SACHIN TENDULKAR PAYS 30 LAKH RUPEES FOR SAIBABA STATUE


सत्य साईबाबांच्या संगमरवरी पुतळयासाठी सचिन तेंडुलकरने तीस लाख रुपये दिले
IT IS NOT CRICKET
CAN THIS MONEY BE USED FOR POOR PEOPLE
CAN SACHIN LOOK AFTER A ORPHANAGE
 सत्य साईबाबांच्या संगमरवरी पुतळयासाठी सचिन तेंडुलकरने तीस लाख रुपये दिले आहेत. या कार्यासाठी इतरही अनेक सेलिब्रिटीज खिशात हात घालतील यात शंका नाही, कारण बाबांचा अनुयायी वर्ग बराच मोठा आहे आणि त्यात अनेक बडे राजकारणी, डॉक्टर्स, बॉलीवूड कलाकार यांचा समावेश आहे. पण सचिनने असं करावं का, यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच चर्चा रंगणार आहे. सचिनने स्वकर्तृत्वावर संपूर्ण कमाई केली आहे आणि तिचा विनियोग कसा करायचा हे ठरवण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे, असा युक्तिवाद काही जण करतील. तर, दुसरा गट काहीतरी नवा पर्याय सुचवेल.
या पुतळ्यांच्या मामल्यात, किंवा एकंदरच पुतळयांबाबत आपण थोडा अधिक विचार करण्याची गरज आहे. सध्या पुतळ्यांचा सुकाळ झाला आहे. गल्लीबोळात, कोणीतरी पुढाकार घेतो आणि पुतळा उभारतो. अनेक पुतळे असे असतात की, त्यांच्या खाली नाव लिहिले असते म्हणून तो त्या महनीय व्यक्तीचा आहे असे म्हणावे लागते.
बाबांचा पुतळा याला अपवाद असणार हे नक्की. कारण यात अनेक मोठी माणसे गुंतलेली असणार. शिल्पकार निवडतानाही विशेष काळजी घेतली जाईल हेही उघड आहे.
प्रश्न असा निर्माण होतो की, सचिनने पुतळयासाठी चेक लिहावा का? तसे न करता, त्याने गरीबांसाठी पैसे खर्च करावेत असा उपदेश आपण त्याला करण्याची गरज नाही, कारण हे तो करतोच आहे. खुद्द त्याच्या सासूबाईंशी संबंधित असलेल्या अनाथ मुलांच्या संस्थेसाठी तो बराच निधी देतो. इतकंच नव्हे तर, वेळ आली तर तो आपला वाटा वाढवण्यासही तयार होईल. तसंच काहीतरी काम त्यानं बाबांच्या आश्रमासाठी करायला काय हरकत आहे?
बाबांनी स्थापन केलेल्या अनेक संस्था धर्मादाय काम उत्तम करीत आहे. पुतळ्यासाठी रक्कम गोळा करण्याऐवजी प्राथमिक शिक्षण विशेषत: मुलींचे, आरोग्य, तरुण पिढीला संगणक शिक्षण, पाणी पुरवठा अशा बाबींची व्यापकता बाबांनी स्थापन केलेल्या संस्थांनी वाढवली तर देशाला, समाजाला कायमचा लाभ होईल. सचिनने या कामात पुढाकार घ्यावा, विश्वस्तांची मने वळवावीत आणि पुतळ्याऐवजी समाजोपयोगी कामांचा विचार करावा.
अशा वेळी बिल गेट्स, वॉरन बफे अशा अनेक परदेशी श्रीमंतांची आठवण होते. जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्तींमध्ये यांचा समावेश होतो. परंतु त्यांनीही जगभर, वर नमूद केलेल्या समाजोपयोगी कामांसाठी हात मोकळे सोडले. आपला किंवा आपली श्रद्धा असणाऱ्या महनीय व्यक्तीचा पुतळा किंवा अशा कोणत्या प्रकारे आठवण जपण्याचा त्यांनी विचार केला नाही.
किंबहुना अमेरिकेत, युरोपीय देशांत दानाची जी प्रथा तेथील उद्योजकांनी गेली अनेक शतके पाडली आहे, त्यात कायम अशा बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. यात जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था, विद्यापीठे उभारणे, संशोधनाला उत्तेजन देणे या बाबींचा समावेश होतो. आजही इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, केंब्रीज, अमेरिकेतील एमआयटी, कोलंबिया अशा ज्ञानमंदिरांचा लौकिक टिकून आहे तो तेथे मिळणारे शिक्षण, चालणारे संशोधन यामुळे आपल्याकडे अशी परंपरा किती शिक्षणसंस्था अभिमानाने मिरवू शकतील?
आपल्याकडे मोठमोठी देवळे उभारणे वगैरे बाबींवर धनाढ्य पैसे खर्च करतात. त्याऐवजी त्यांनी देखील परदेशी उद्योजकांचा कित्ता गिरवावा. खरे म्हणजे यासाठी परकीयांकडे बघायला नको. जमशेदजी जिजीभॉय यांनी व्यापारात बक्कळ कमाई केली, त्यातून जेजे हॉस्पिटल आणि जेजे स्कुल ऑफ आर्टस् यांना निधी दिला. टाटांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा कॅन्सर रिसर्च अशा संस्थांचा पाया रचला.
बिर्लांनीदेखील पिलानी येथे दर्जेदार शिक्षणसंस्था उभारली. अशी काही मोजकी उदाहरणे भारतात आहेत. सचिनने आपल्या कीर्तीचा, आपल्या शब्दाला असलेल्या मानाचा उपयोग करून देशाला, समाजाला पुढे नेणारे कार्य करावे.
हे सुचवताना सचिनच्या बाबांप्रति असलेल्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. फक्त त्याच्यासारख्या वैध मार्गाने कमाई करणाऱ्या आणि या देशावर प्रेम करणाऱ्यांनी थोडा वेगळा विचार करावा, हीच विनंती

No comments:

Post a Comment