Total Pageviews

Thursday 5 May 2011

BURAKHA INTERESTING ARTICLE

मार्तंडराव आणि फ्रेंच मिसळ

फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी त्यांच्या देशामध्ये मुस्लिम स्त्रियांनी बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे. निर्णयामागील धार्ष्ट्याचे कौतुक आहे; पण निर्णयाचे काय? या घोषणेने भारतातील काही लोकांनीही अगदी आनंद व्यक्त केला. आणि ‘मुस्लिम समाजाला अशाप्रकारे सार्कोझी यांनी एक प्रकारे जबरदस्ती केली आहे आणि ते योग्य आहे’, ‘भारतातही हे व्हायला हवे, पण आपले सरकारच लेचेपेचे आहे’ इ. अशाही प्रतिक्रिया ऐकायला, वाचायला मिळाल्या. पण हे ‘स्वधर्माभिमानी’(?) हे सोयीस्कररित्या विसरतात की भारतात विशेषतः उत्तरेत बऱ्याच जातींत, समाजात हिंदू स्त्रिया सुद्धा अवगुंठनात असतात. ‘घुंगट’ तेवढा चालेल आणि ‘बुरखा’ नाही ही असहिष्णुता आणि भेद चुकीचा आहे.



या विषयात जबरदस्ती होऊ शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव चेहरा पाहण्याची मुभा सुरक्षाकर्मींना द्यायला हवी. पण समाजात वावरताना तुम्ही बुरखा/घुंगट घेऊ नका असे लादणे चुकीचे आहे. काही ठिकाणी उलट समाजातूनच जबरदस्ती होते, त्या स्त्रीची इच्छा नसतानाही. अशा ठिकाणी चाप लावायला हवा, जर खरी हिम्मत असेल तर!

तसेच काहीसे कोल्हापूर मधे! फ्रान्स आणि कोल्हापूर, तसे साधर्म्य काहीच नाही. पण 'मार्तंडराव' दोन्हीकडे आहेत! आणि ते मानवतेच्या तत्त्वांची सरमिसळ बनवत असतात; तिखटजाळ! ती असते 'मार्तंडरावांची फ्रेंच मिसळ'! कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात आत्तापर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता हे ऐकून धक्काच बसला. त्यावर मनसेचे आ. राम कदम आणि भाजपच्या सौ. नीता केळकर यांनी आंदोलन केले ही एक स्वागतार्ह बाब आहे. राजकारणी लोकांवर आगपाखड करताना चांगल्या कामाकडे काणाडोळा करून चालणार नाही. अशा ठिकाणी केवळ प्रवेशासाठी जोर जबरदस्ती केली तर ते योग्यच आहे. बरं इथेही धर्ममार्तंडांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यांनी चूक दुरुस्त करण्याचे सोडाच, पण या स्थितीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी भोंगळ शास्त्रीय कारणे देऊन तार्किकदृष्ट्या या चुकीच्या प्रथेचे स्पष्टीकरण दिले. वाचा ‘सनातन प्रभात’ - http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011/04/blog-post_4640.html

कारण असे दिले की, स्त्रियांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश का करू नये, यामागे शास्त्र आहे. मंदिरात पूजा करतांना वेदमंत्र म्हटले जातात. वेदमंत्र म्हटल्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. स्त्रियांची जननेंद्रिये ही शरिराच्या आतील बाजूस असल्यामुळे त्यांनी वेदमंत्र म्हटल्यास या उष्णतेचा त्यांना पुष्कळ त्रास होऊ शकतो. त्यांच्या गर्भाशयावर तिचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते; म्हणून शास्त्रानुसार स्त्रियांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, परिणामी वेदमंत्रांसहित पूजा करण्याचाही अधिकार त्यांना नाही.हे वाचल्यावर तर हसावे की रडावे हेच कळत नाही. ह्यांना वेदही कळले नाहीत आणि शास्त्रही कळले नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाबाबत किती झुंज दिली. त्यावेळीसुद्धा असल्या स्वयंघोषित बुद्धीशून्य कर्मठ लोकांनी विरोध केला. अक्षरशः दगडफेक केली. आणि धर्मात हे असलं मान्य नाही वगैरे तारे तोडले. असा धर्म सोडावा असं बाबासाहेबांच्या मनात आलं तर मग त्यात वावगं ते काय? जम्मू-काश्मीर मधेही या असल्या तथाकथित धर्मनेत्यांनी त्याकाळी परधर्मात जावे लागलेल्या लोकांना राजा हिंदू करून घेताना धमकी दिली, की जर त्यांना हिंदू केले तर आम्ही सरोवरात उड्या घेऊन प्राणार्पण करू. राजा घाबरला. आणि ते अहिंदूच राहिले. म्हणून ती बट्ट वगैरे आडनावे! म्हणजेच हे असे प्रकार घडतच आले आहेत आणि हेच खरे हिंदू धर्माचे शत्रू आहेत.

दुसरं कारण पुढे करण्यात आलं आहे की, दुसरे असे की, गाभाऱ्यात मंत्रोच्चार करून देवतेच्या तत्त्वाला आवाहन केलेले असते. त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. धर्मशास्त्राने सांगितलेल्या कोणत्याही शास्त्रविधानामध्ये अभ्यासहीन पालट करणे, त्याच्या विरोधात वर्तन करणे, हे पाप आहे. ते करणार्‍याला त्याचे फळ भोगावे लागते.हास्यास्पदच आहे हे कारण. देवतेच्या तत्त्वाला आवाहन आणि ते देवतेच्याच अंशाने अपवित्र होते? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, “सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो” – सर्वांच्या हृदयात माझा निवास आहे. पुरुषांना जी माता उदरात वाढवते तिच्यामुळे मंदिर अपवित्र होईल? मनात विकार आणि अविचार घेऊन जाणारे पुरुष मंदिर विटाळत नसतील तर कोणाही महिलेमुळे केवळ ती महिला आहे म्हणून मंदिराचे ‘पावित्र्य’ नष्ट होईल हे अशक्यच आहे.

शिवाय ह्यावर प्रतिवाद करताना मशिदी, मुसलमान ह्यांचे उदाहरण देऊन आव्हान केले आहे, की तिथेही महिलांना प्रवेश नसतो, तिथे आंदोलन करा. हे म्हणजे समोरच्याच्या घरात कचरा आहे, तो काढा, आमच्या घरातला तसाच राहू दे, असं म्हणण्यासारखं आहे. अथवा इस्लामसुद्धा मग हिंदू धर्माप्रमाणेच शास्त्रशुद्ध आणि तार्किक आहे असं म्हणावं लागेल..तेही आमच्या ‘मार्तंडरावांना’ पचनी नाही पडणार!

उगाच धर्मशास्त्र-धर्मशास्त्र म्हणून भुई थोपटून धर्माचे पालन केल्याचा आव आणणे चुकीचे आहे. हिंदुत्वाला पुष्ट करायचे असेल तर अशा भेदाभेदांच्या भावना संपुष्टात आणाव्या लागतील. त्याचे उगीच समर्थन करत बसू नये. कालौघात जो बदलत नाही तो विलयाला जातो. हिंदुत्वाचे टिकून राहण्याचे कारण म्हणजे तो लवचिक आहे उपचारांच्या बाबतीत आणि कट्टर आहे मूलतत्वांच्या बाबतीत उदा. सत्य, अहिंसा, सदाचार, प्रेम, विश्वबंधुत्व, ईश्वराचा सर्वांभूती निवास, आत्मौपम्य बुद्धि, समानता, पापभीरूता, परोपकार, कर्तव्यपालन, धर्माचरण इ. हे हिंदुत्वाचे अपरिवर्तनीय भाग आहेत. आणि अन्य कर्मकांड, पद्धती हे परिवर्तनीय भाग आहेत. त्यात युगानुकूल परिवर्तन झालेच पाहिजे. अन्यथा काळाच्या कठीण कसोटीवर कसा कस लागेल? एक गोष्ट आठवते- ‘प्रभाते तैलदीपं ज्वालयति’ अशा अर्थाचे सुभाषित होते. म्हणजे पहाटे तेलाचा दिवा लावून अभ्यासाला बसावे. आज जर ‘मार्तंडराव’ म्हणाले की, ‘मुला, बंद कर ती ट्युबलाईट आणि तेलाचा दिवा लावून बस अभ्यासाला’, तर मग दिवेच लागतील. म्हणून त्यातला ‘तेलाचा दिवा’ हा युगानुकूल परिवर्तनाचा भाग झाला. हे समजून हिंदुत्वाचे अनुसरण केले पाहिजे.

तालिबान, लादेन, फतवे असोत की अमेरिकेत झालेला कुराण जाळण्याचा प्रकार असो, सार्कोझींचा दडपण्याचा प्रयत्न असो की वर्ल्ड ट्रेड सेंटर ला दिलेली धडक असो ही सर्व असहिष्णुतेची उदाहरणे आहेत. जगभरात सांप्रदायिक असहिष्णुता डोकं वर काढत असताना हिंदुत्वाकडून जगाच्या (विचारी माणसांच्या, अभ्यासू लोकांच्या) आशा आहेत. विश्वबंधुत्वाचा आणि मानवी जीवन उन्नत बनवणारा (आयुर्वेद, योग, संस्कृत, संगीत इ.) हिंदुत्वाचा आशय जगात सर्वमान्य होत आहे. आपल्यालासुद्धा त्यात निर्णायक भूमिका बजावायची आहे.


अपेक्षित चित्र! "विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदु है,
संस्कृती सब की एक चिरंतन, खून रगों में हिंदू है |"


तेव्हा ‘मार्तंडराव’, उगीच वायफळ गोष्टींत शक्ती न दवडता धर्मांतरित होणारा वनवासी, आजही असमानतेचे चटके सोसणारा दलित वर्ग, तुटणारा पूर्वांचल, धुमसणारे काश्मीर, दक्षिणेतील लव्ह-जिहाद अशा कित्येक बाबी आहेत. तेव्हा गाभाऱ्यातून बाहेर या आणि अशा वस्त्या, वाड्या, पाडे इथे मनात समरसतेचा भाव घेऊन जा आणि प्रेम द्या. स्नेहसूत्रात बांधा सर्वांना. तिथे तुम्हाला मनात सल आणि वेदना घेऊनही हिंदू म्हणून टिकून राहिलेली पण तुमची वाट बघत असलेली मंडळी दिसतील. त्यांच्या डोळ्यातली आशा संपण्याच्या आत पोहोचूया. नाहीतर उशीर होईल... 

No comments:

Post a Comment