Total Pageviews

Wednesday 13 August 2014

EBOLA TERROR

इबोला हिमोरेजिक फीव्हर (ईएचएफ) या विषाणुजन्य आजाराच्या साथीमुळे सध्या जगात चिंतेचे वातावरण आहे. आफ्रिका खंडातील गिनी या देशामध्ये गेल्या मार्च महिन्यापासून इबोलाची साथ फैलावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या आजाराच्या साथीने लायबेरिया, नायजेरिया, सिएरा लिओन या अन्य तीन देशांतही हातपाय पसरले. इबोलाच्या साथींच्या इतिहासातील सर्वात जीवघेणी साथ सध्या पश्चिम आफ्रिकेतील काही देशांत फैलावली आहे. इबोला या आजाराचे विषाणू सर्वप्रथम वटवाघळांमध्ये आढळून आले होते. त्यानंतर हे विषाणू आफ्रिकेतील चिंपांझी व गोरिलांमध्ये संक्रमित झाले. या वन्यप्राण्यांशी संपर्क आलेल्या आफ्रिकेच्या नागरिकांमध्ये काही काळानंतर या विषाणूंची लागण झाली. पूर्वी हा आजार फक्त प्राण्यांपुरताच मर्यादित होता; पण आता इबोला विषाणूंचे संक्रमण माणसाकडून माणसाकडेही होऊ शकते. इबोला आजाराच्या विषाणूंचे पाच प्रकार असून त्यातील तीन आफ्रिकेत व अन्य दोन प्रकारचे विषाणू फिलिपाइन्समध्ये सापडतात. त्यातील फिलिपाइन्समध्ये आढळणारे इबोलाचे दोन विषाणू हे फारसे घातक नाहीत. मात्र, आफ्रिकेमधील इबोलाचे तीन प्रकारचे घातक विषाणू जर जगाच्या अन्य खंडांतील देशांत पसरले तर मोठा बाका प्रसंग उद्भवणार आहे. इबोलाची लागण झालेल्या रुग्णाला विशेष उपचार कक्षातच (क्वारंटाइन)ठेवावे लागते. इबोलाची लागण झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन रुग्ण चोवीस तासांत किंवा पुढील दोन दिवसांत मृत्युमुखी पडतो. इबोला आजार संपूर्ण बरा होण्यासाठी सध्या कोणतीही परिणामकारक लस वा औषध अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे हा आजार झाल्याचे निदान करण्यासाठी जी चाचणी करावी लागते तिची सुविधाही सर्वच देशांमध्ये उपलब्ध आहे, असेही नाही. इबोलाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांना सर्वात पहिल्यांदा त्याची लागण होण्याचा धोका आहे. इबोलाच्या विषाणूंची माणसांत लागण झाल्याचे सर्वप्रथम 1976 मध्ये उजेडात आले. त्या वर्षी सुदान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये इबोलाच्या साथीने थैमान घातले होते. आफ्रिकेतील इबोला नदीच्या काठी असलेल्या प्रदेशांमध्ये या आजाराची साथ प्रथम फैलावल्याने त्या नदीचेच नाव या आजाराला देण्यात आले. त्यानंतर इबोला नदीतूनही बरेच पाणी वाहून गेले आहे. मात्र, आफ्रिकी देशांतील दारिद्र्य व तेथील वैद्यकीय सुविधांची वानवा यांच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या इबोलाच्या साथीने सुमारे हजार लोकांचा बळी घेतलेला आहे, तर 1700हून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या देशांना आणीबाणीची परिस्थिती जाहीर करणे भाग पडले आहे. इबोलाच्या साथीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आपले पन्नास वैद्यकीय तज्ज्ञ पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये पाठवणार आहे. त्याचप्रमाणे इबोलावरील संशोधनातून प्रायोगिक तत्त्वावर निर्मिली गेलेली, पण आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी फारशी परिणामकारक ठरू शकत नसलेली काही औषधे व अन्य वैद्यकीय मदतही या देशांत पाठवणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे. इबोला साथीच्या संकटाकडे जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच भारतानेही अतिशय गांभीर्यपूर्वक पाहिले आहे. इबोला साथीने ग्रस्त असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सुमारे 45 हजारांहून अधिक भारतीय नोकरी-धंद्यासाठी वास्तव्य करून आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजेत समावेश असलेले सीआरपीएफचे 300 जवान लायबेरिया या देशात सध्या तैनात आहेत. इबोलाग्रस्त देशांमधील भारतीयांना प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्यासाठी काही तातडीची पावले केंद्र सरकारने उचलली आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की, इबोलाची लागण झालेल्यांपैकी कोणी भारतीय आफ्रिकेतून भारतात परतले तर त्यांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव इथेही होण्याची शक्यता आहे. त्यातून जर भीषण परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड द्यायला आपली वैद्यकीय यंत्रणा पुरेशी सक्षम नाही. इबोला आजाराची निदान चाचणी करण्याची सुविधा भारतात दोन-तीन महत्त्वाच्या संस्था वगळता अन्य कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे विदेशातून भारतात येणार्‍यांच्या रक्त तपासणीचीच सुविधा तातडीने उभारून चालणार नाही, तर इबोलाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल. हे आव्हान केंद्र सरकारने पेलणे आवश्यक आहे. शास्त्रीय संशोधनातून जग आज इतके आधुनिक होऊनही एड्स, कॅन्सरसारखे काही आजार पूर्ण बरे करण्यासाठी अद्यापही रामबाण उपाय शोधण्यात यश आलेले नाही. इबोला या आजारानेही जगापुढे असेच आव्हान उभे केले आहे व त्यापुढे माणूस सध्या तरी हतबल आहे.

No comments:

Post a Comment