Total Pageviews

Monday 14 April 2014

THE ACCIDENTAL PRIME MINISTER-SANJAY BARU-PC PAREKH COAL SECRETARY

हा देश मॅडम सोनिया व त्यांचे चिरंजीव राहुल हेच चालवीत आहेत आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यांचे कळसूत्री बाहुले आहेत. गेली दहा वर्षे जनतेने हाच अनुभव घेतला आहे. बारू आणि पारख यांनी त्यात नवीन काय सांगितले? यूपीए सरकारचा ‘कोळसा’ त्यांनी पुस्तकातून पुन्हा उगाळला इतकेच! नवीन काय सांगितले? पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सोनिया गांधींच्या आदेशानुसारच राज्यकारभार करीत होते असा दावा पंतप्रधानांचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांच्या पाठोपाठ आता माजी केंद्रीय कोळसा सचिव पी.सी. पारख यांनीही केला आहे. संजय बारू यांनी हा ‘गौप्यस्फोट’ त्यांच्या ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग ऍण्ड अन्मेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकात केला आहे, तर पी.सी. पारख यांनी हे ‘खळबळजनक सत्य’ त्यांच्या ‘क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर : कोलगेट ऍण्ड अदर ट्रूथ’ या पुस्तकात उघड केले आहे. बारू काय किंवा पारख काय, या दोघांनी जे ‘फटाके’ फोडले आहेत त्यामुळे थोडीफार खळबळ जरूर झाली. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोनिया मॅडमच्या आदेशानुसार चालणारे, त्यांनी हुकूम दिला की थांबणारे, त्या सांगतील तेवढेच बोलणारे ‘बाहुले’ आहेत ही गोष्ट देशातील शेंबड्या पोरालाही माहीत आहे. या सरकारचा मुखवटा मनमोहन यांचा असला तरी असली चेहरा सोनिया आणि राहुल यांचाच आहे. दहा वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय हतबलतेमुळे मॅडम सोनियांना ‘महान त्याग’ वगैरे करावा लागला आणि मनमोहन सिंग ‘अपघाता’ने पंतप्रधान झाले. यूपीएच्या दुसर्‍या टर्मच्या वेळीदेखील पंतप्रधानपदी पुन्हा मनमोहन नावाच्या ‘गुळाच्या गणपती’ची प्रतिष्ठापना करण्याशिवाय गांधी माता-पुत्राला गत्यंतर नव्हते. मात्र हा सगळा देखावा होता. सरकारची सर्व सूत्रे ‘त्यागमूर्ती’ सोनिया यांच्याकडेच राहतील याची संपूर्ण खबरदारी गांधी कुटुंब आणि त्यांच्या कॉंग्रेजी पित्त्यांनी घेतली. त्यासाठी सोनियांना यूपीएचे ‘चेअरपर्सन’ बनविले गेले, राष्ट्रीय सल्लागार परिषद या ‘समांतर सरकार’च्या अध्यक्षा बनविले गेले. थोडक्यात सरकारच्या पाळण्याची दोरी पडद्याआडून सोनियांच्याच हातात राहील अशी व्यवस्था केली गेली. अणुकरारासारखा एखादुसरा विषय वगळता मनमोहन यांचा स्वतंत्र बाणा देशाला कधीच जाणवला नाही. सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली म्हणून जी पत्रकार परिषद मनमोहन सिंग यांनी गेल्या वर्षी घेतली ती त्यांच्या दुसर्‍या टर्मची पहिली अधिकृत पत्रकार परिषद होती. कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळीही हे मौनीबाबा जेमतेम दोन-तीन वाक्येच बोलले. बाकी बोलबाला होता तो राहुलबाबांचा आणि त्यांच्या माताजींचा. गुन्हेगार लोकप्रतिनिधींबाबतचा अध्यादेश कचराकुंडीत फेका असा ‘साक्षात्कार’ राहुलकुमारांना अचानक झाला होता तोदेखील मनमोहन यांच्या ‘मुस्कटदाबी’चाच भाग होता. एवढेच नव्हे तर मनमोहन सिंग दिल्लीमध्ये निवृत्तीचे जीवन जगण्यासाठी घर शोधत आहेत अशा कंड्या पिकविण्यामागे किंवा कपिल सिब्बल, पवनकुमार बन्सल, अश्‍विनीकुमार आदींची पक्षांतर्गत वासलात लावून पंतप्रधानांचा ‘चंदिगड क्लब’ मोडीत काढण्यामागेही राहुल ब्रिगेड आणि सोनियांचाच हात होता हे उघड आहे. अर्थात या अवनतीला आणि मानहानीला मनमोहन सिंग हे स्वत:देखील तेवढेच जबाबदार आहेत. सरदार असूनही त्यांनी दहा वर्षांत ना बाणा दाखवला ना ताठ कणा. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत असंख्य घोटाळे, महाघोटाळे गाजले. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पाच केंद्रीय मंत्र्यांना घरी बसावे लागले. काहींना तुरुंगाची हवा खावी लागली. कोळसा घोटाळ्याचे डाग तर मनमोहन सिंग यांच्या कोटावरही उडाले. भ्रष्टाचार, देशांतर्गत सुरक्षा, दहशतवाद, महागाईपासून गडगडलेल्या अर्थव्यवस्थेपर्यंत आरोपीच्या पिंजर्‍यात आहेत ते मनमोहन सिंग. देशाच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारचा प्रमुख असा बट्टा लागला तो मनमोहन सिंग यांनाच. सोळाव्या लोकसभा निवडणुकीचे रण पेटले आहे तेदेखील याच मुद्यावर. जनतेला देशाच्या या दुरवस्थेबाबत जाब हवा आहे, पण पंतप्रधानांना ना निवडणूक प्रचाराची आणि त्या प्रचार सभांमधून खुलासा करण्याची परवानगी आहे ना हाताची घडी तोंडावरील बोट काढण्याची. हा देश मॅडम सोनिया व त्यांचे चिरंजीव राहुल हेच चालवीत आहेत आणि पंतप्रधान त्यांचे कळसूत्री बाहुले आहेत याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा हवा? गेली दहा वर्षे जनतेने हाच अनुभव घेतला आहे. बारू आणि पारख यांनी नवीन काय सांगितले? यूपीए सरकारचा ‘कोळसा’ त्यांनी पुस्तकातून पुन्हा उगाळला इतकेच!

No comments:

Post a Comment