Total Pageviews

Sunday 15 May 2011

STOPPING FIRE

मुंबईत इमारतीला लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू’, ‘औंधमधील सदनिकेत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक’, ‘हडपसरमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी,’ या व अशा प्रकारच्या काही बातम्या आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतोही. घटना गंभीर असेल, त्यात कोणाची जीवितहानी झाली असेल तर काही काळ आपल्याला वाईट वाटतेही. त्यात संबंधित घटना ही आपल्यापासून लांबची असेल, तर वाईट वाटण्याचा कालावधी स्वाभाविकच काही मिनिटांचा असतो. तेवढय़ापुरता दुखाचा सुस्कारा टाकून आपण आपल्या कामाला निघून जातो. पण संबंधित घटना माझ्या आसपास किंवा माझ्या घरात घडू नये, यासाठी बहुतांश वेळा काळजी घेतली जात नाही, असेच आढळून येते. ही काळजी घेतली तर अशा घटनांचे प्रमाण तर कमी होईलच पण आपल्या मनाची दुखी अवस्थाही काही काळाने कमी होईल. त्यासाठी आगप्रतिबंधक किंवा दुर्घटनाप्रतिबंधक उपाययोजना काय करावी लागते, याची माहिती घेणे गरजेचे आहे.
शहरातील निवासी किंवा व्यापारी इमारतींमध्ये बऱ्याचदा आगीचे किंवा गॅसच्या स्फोटाचे प्रकार घडताना आढळतात. विशेषत निवासी इमारतीमध्ये लागलेली आग ही दोनच प्रकारे लागलेली असू शकते. एक तर घरातील विद्युत साहित्यामध्ये निर्माण झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे किंवा घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट झाल्यामुळे. या दोन्ही प्रकारांबाबत थोडीशी सावधानता बाळगली आणि माहिती घेतली तर या घटनांचे प्रमाण कमी होऊ शकते, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा विश्वास आहे.
शहरातील बहुतांश उंच इमारतींमध्ये स्वतची अशी एक अग्निशामक यंत्रणा उभारण्यात आलेली असते. किंबहुना ती कायद्याने बंधनकारकही आहे. या यंत्रणांमध्ये असलेले पितळेचे नोझल्स हे भंगाराच्या दृष्टीने किमती असल्यामुळे बऱ्याचदा त्यांची चोरीही होत असल्याचे आढळून आले. परिणामी ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा अनुभव आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितली. हा धोका ओळखून हे नोझल्स पितळेऐवजी स्टेनलेस स्टीलचे बनविण्यास कंपन्यांना सांगण्यात आले. त्यानंतर चोरीचे प्रकार कमी झालेले आहेत. अनेकदा घराच्या आसपास महावितरणचा ट्रान्स्फॉर्मर पेटला असता, काही नागरिक खालून बादल्याने पाणी मारताना दिसतात. परिणामी, आग आणखीच भडकते. अशा वेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी तेथे आल्यास ते पाणीच मारतात परंतु वेगळ्या पद्धतीने. अशा वेळी आगीच्या वर पाण्याचा फवारा सोडला जातो व त्याचे थेंब पावसासारखे ऑईलवर पडतात. परिणामी ऑईल थंड होते व आग विझण्यास मदत होते. मात्र, खालून बादलीने पाणी मारल्यास ऑईल भपकन पेट घेते. ते धोकादायक असते.
राज्य सरकारच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे निवृत्त सहसंचालक जी. एन. फाळके यांनी आग लागू नये अथवा लागल्यास ती विझवता यावी, या दृष्टीने काही मौलिक सूचना नागरिकांना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्युत दिव्यांच्या बटनाखाली किंवा वायरखाली कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत. गॅसवरील काम संपल्यानंतर पुन्हा तास-दोन तास आपण त्याचा वापर करणार नसू, तर अशा वेळी रेग्युलेटर बंद करून ठेवणे श्रेयस्कर असते. गॅसच्या नळीची नियमितपणे तपासणी करावी. गृहिणींनी गॅसवर उतू जाणारा पदार्थ ठेवून गॅसपासून दूर जाऊ नये. अशा पदार्थाच्या उतू जाण्यामुळे गॅस विझतो. परंतु, गॅसची गळती होण्याचा धोका असतो. त्यामुळे उतू जाणारा पदार्थ गॅसवर ठेवला असेल तर शक्यतो तेथेच थांबावे व लक्ष द्यावे. घरातील दिव्यांची बटने व वायरिंग काही काळानंतर तपासून घ्यावे. एखादे विद्युत उपकरण नव्याने घरात बसवायचे असेल, तर त्या ठिकाणचे वायरिंग व विद्युतपुरवठा तपासून घ्यावा. जेथे जेथे वायर जोडलेल्या असतील तेथील जोड काळजीपूर्वक तपासले जावेत. बऱ्याचदा जेथे वायर जोडलेली असते अशा जोडावर आग लागण्याची शक्यता असते.
मॉल, चित्रपटगृहे, महाविद्यालये, कार्यालये अशा ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असते अशा ठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना त्याविषयीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असते. अशा ठिकाणांना आपत्कालीन दरवाजा बसविण्याची गरज असते

No comments:

Post a Comment