Total Pageviews

Sunday 8 May 2011

OSAMA ISI CHIEF DISAPPEARS

लादेनला कोण कोण भेटले याची माहिती अमेरिकेने मागवताच आयएसआयचे प्रमुख गायब!
अमेरिकेहून निघाले; पण पाकिस्तानला पोहचलेच नाहीत
परदेशात आश्रय घेतल्याची चर्चा

इस्लामाबाद, दि. 8 (पीटीआय) - अल कायदाचा म्होरक्या आणि 9/11च्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला आयएसआयचे कोणते अधिकारी भेटत होते, याची माहिती अमेरिकेने मागवताच आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा हे गायब झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच ते पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी अमेरिकेला गेले होते. शुक्रवारी पाशा यांनी अमेरिका सोडली; मात्र ते पाकिस्तानला परतलेच नाहीत. अमेरिकेच्या धास्तीने पाशा हे परदेशात गुप्तस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
कुख्यात ओसामा बिन लादेन हा पाच वर्षांपासून पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात आश्रयाला होता. अबोटाबाद शहरात पाकिस्तानची लष्कर अकादमी असून येथेच उच्चपदस्थ लष्करी अधिकार्‍यांचे बंगलेही आहेत. त्यामुळे लादेन हा पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात राहत होता, हे जगासमोर आले आहे. ‘ऑपरेशन ओसामा’नंतर अमेरिकेने आयएसआयचे कोणते अधिकारी लादेनला भेटत होते, ऑपरेशनपूर्वी कोणते अधिकारी भेटले, याचा तपशील मागवला आहे. हा तपशील मागवताच आयएसआयचे प्रमुख पाशा हे खुलासा करण्यासाठी बुधवारी अमेरिकेला गेले. शुक्रवारी ते अमेरिकेहून पाकिस्तानकडे रवाना झाले. मात्र पाकिस्तानला न येता ते परदेशात अज्ञात स्थळी गेल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सौदी अरब किंवा चीनमध्ये त्यांनी आश्रय घेतला असावा, अशी चर्चा आहे.
दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्सनेही उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या हवाल्याने पाकिस्तानचे लष्करप्रमुख अशफाक परवेझ कियानी आणि आयएसआयचे प्रमुख अहमद पाशा शुजा यांना लादेन अबोटाबादेत वास्तव्याला असल्याचे माहिती होते, असे वृत्त दिले आहे.
लादेन पाकिस्तानात कसा?
गिलानी आज संसदेत उत्तर देणार

इस्लामाबाद : अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानात कसा, याचे उत्तर पंतप्रधान युसूफ रजा गिलानी हे सोमवारी संसदेत देणार आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानात घुसून अमेरिकेने राबवलेल्या ‘ऑपरेशन ओसामा’चाही तपशीलवार खुलासा करणार आहेत. कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन हा आमच्याकडे नाही, असे छातीठोकपणे सांगणार्‍या पाकिस्तानचे पितळ ‘ऑपरेशन ओसामा’ने उघडे पडले आहे. लादेन पाकिस्तानात कसा, असा प्रश्‍न जगभरातून विचारला जात आहे.

No comments:

Post a Comment