Total Pageviews

Friday 6 May 2011

CORRUPTION POLICE

पोलिसांच्या 'एन्ट्री'ने घेतला रिक्षाचालकाचा बळी सकाळ वृत्तसेवा May 07, 2011 शिये - गांधीनगर पोलिस ठाण्यातील दोन वाहतूक पोलिसांच्या एन्ट्रीच्या छळास कंटाळून शिये (ता. करवीर) येथील संजय आनंदराव जाधव (वय 34) या ऍपे रिक्षाचालकाने त्यांच्यासमोरच विष पिऊन आत्महत्या केली. रिक्षाचालकाने विष प्यायल्याचे दिसताच वाहतूक पोलिस पळून गेले. एन्ट्री मागणाऱ्या त्या दोन लाचखोर पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करत नाही, तोपर्यंत श्री. जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांनी नकार दिला. कसबा बावड्यातील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर या ग्रामस्थांनी बराच वेळ ठिय्या मांडला. अखेरीस पोलिस उपअधीक्षकांनी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यावर संजय जाधव यांचा मृतदेह सायंकाळी ताब्यात घेण्यात आला.
संजय जाधव यांचा भाऊ शशिकांत जाधव यांनी पोलिस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संजय जाधव आपली ऍपे रिक्षा (एमएच-09-बीए 804) घेऊन 5 मे रोजी सकाळी 10. 30 वाजता तावडे हॉटेलजवळून जात होते. त्या वेळी तेथे कॉन्स्टेबल संजय माताडे पोवार उभे होते. त्यांनी त्याची रिक्षा अडवून कागदपत्रे मागितली. कागदपत्रे तपासून 1 हजार रुपयांची मागणी केली. संजयने गयावया केली, तरीही त्यास सोडले नाही. उलट त्याला शिवीगाळ केली. हे दोन कॉन्स्टेबल वारंवार त्रास देत असल्यामुळे त्यांच्यासमोरच त्याने विष प्राशन केले. त्याने आपली पत्नी, भाऊ आणि मित्रास फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली. मी विष प्यायलो असून, माझ्या मृत्यूस दोन कॉन्स्टेबल जबाबदार आहेत, असे सांगितले.
संजय जाधव यांनी विष प्यायल्याचे दिसताच त्याला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पोलिस कॉन्स्टेबल कागदपत्रे विषाची बाटली घेऊन पोलिस ठाण्यात गेले. संजय जाधव यांना मित्रांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याची तक्रार देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेलो असता त्यांनी हद्दीचे कारण सांगून गांधीनगर पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. गांधीनगर येथे पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली दमदाटी केली.
या शिष्टमंडळात सागर शिंदे, शफीक फकीर, फय्याज नायकवडी, अमोल पुजारी, शरद पाटील, शिवानंद पाटील, शशिकांत कुंभार, उत्तम खोंबरे, विठ्ठल पोवार यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. त्यांनी सुरवातीस पोलिस निरीक्षक श्री. नागरगोजे यांना निवेदन दिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पायरीवर ठिय्या मारला. सुमारे दोन तास ते बसले होते. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक महेश सावंत यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाईचे आश्‍वासन मिळाल्यावर संजय जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, संजय जाधव यांच्यावर शोकाकूल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे

No comments:

Post a Comment