Total Pageviews

Thursday, 16 January 2025

समर्थ भारत, समर्थ सेना ब्रिगेडिअर हेमंत महाजन MAHARASHTRA TIMES

भारतीय लष्कराचा आज ७७ वा स्थापना दिन. यंदा पहिल्यांदाच लष्करदिनाचे मुख्य संचलन पुण्यात होत आहे. यानिमित्ताने या संचलनाविषयी आणि भारतीय लष्कराच्या सद्यस्थितीविषयीचा हा उहापोह

भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ (पुढे हे पद चीफ ऑफ आर्मी स्टाफ-(लष्करप्रमुख )असे झाले.) जनरल (पुढे फील्ड मार्शल) एम. के. करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन ब्रिटीश कमांडर इन चीफ यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. तीन वर्षांपूर्वीपर्यंत लष्कर दिन कायम दरवर्षी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये साजरा केला जात असे. तिथे या दिवशी संचलनानंतर लष्करी शौर्य, सेवा अन्य पुरस्कारांचे वितरण केले जाते.लष्कर दिनाचे हे दिमाखदार संचलन देशभरातील विविध ठिकाणी घेण्यात यावे, असा निर्णय केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला. जेणेकरून विविध ठिकाणच्या नागरिकांनाही आपल्या लष्करी सामर्थ्याचे, शिस्तीचे दर्शन घडेल. त्यानुसार पहिले संचलन बेंगलुरू येथे तर दुसरे लखनौ येथे पार पडले. तर तिसऱ्या वर्षी यंदा पहिल्यांदाच हे संचलन पुण्यात होत आहे. दरवर्षी विविध ठिकाणी हे संचलन करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे त्या त्या भागातले लोक लष्कराशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातील. तिथल्या युवकांनाही लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल.

 

पुणे ही लष्करासाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. लष्कराच्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या संस्था, जागा पुण्यामध्ये आहेत.सात-आठ राज्यांंमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक संस्था पुण्यातच आहेत. याशिवाय पुण्यात काही महत्त्वाचे लष्करी तळही आहेत. संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) विविध प्रयोगशाळा, आघाडीच्या शैक्षणिक संशोधन संस्थांचे जाळे यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटला लष्करी नकाशात मानाचे स्थान आहे. त्यामुळे लष्कर दिनाचे संचलन पुण्यात होण्याला एक वेगळेच महत्त्व आहे. या कार्यक्रमापूर्वी एक ते दोन आठवडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातनो युअर आर्मीया प्रदर्शनाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांना लष्कर जाणून घेता आले, लष्कराचे सामर्थ्य अनुभवता आले, शस्त्रे जवळून पाहता आली. त्याचप्रमाणे आता संचलनासाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना जाणे शक्य होणार नाही, त्यांना त्याचे थेट प्रसारणही पाहता येईल. त्याद्वारे पुणेकर या संचलनाला उत्तम प्रतिसाद देतील. त्याद्वारे पुणेकरांचे लष्करावरील प्रेम, लष्कराविषयीची आपुलकी आणखी वाढीस लागेल याची मला खात्री आहे.

 

भारतीयलष्कर अत्यंत व्यावसायिक आणि जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक आहे. कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आणि सुसज्ज आहे, अशी ग्वाही नुकतीच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भारत चीन सीमा सध्या शांत आहे. मात्र, सीमा वाद संपलेला नाही. परंतु, चीन सीमेवर कुठल्याही प्रकारचे आव्हान उभे राहिले, तरी त्याला चोख प्रत्युत्तर द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर आपण बहुतांशी नियंत्रण मिळवले आहे. मात्र, पाकिस्तानने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचाही बिमोड करण्यासाठी आपण सज्ज आहोत. अन्य शेजारील देशांमधील परिस्थिती, घडामोडींवरही आपले बारीक लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

दुसरीकडेआत्मनिर्भर भारतसूत्रानुसार लष्करातील शस्त्रांचे आधुनिकीकरण वेगाने चालू आहे. अनेक शस्त्र भारतातच तयार होत आहेत. दहा वर्षांपूर्वी आपल्याला लागणारी ७० टक्के शस्त्र इस्त्रायल, अमेरिका, रशिया आदी देशातून आयात केली जात होती. आता हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. येत्या चार ते पाच वर्षांमध्ये शंभर टक्के भारतीय बनावटीची शस्त्रे असतील, अशी खात्री वाटते. एकेकाळी शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश अशी भारताची ओळख होती. पण आता आपण शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा एक मोठा देश बनलो आहोत.  २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने २१ हजार कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात केली आहेत. शस्त्रास्त्र निर्यात केल्याने उत्पादन संख्या वाढून आपल्यासाठी उत्पादन खर्च कमी होतो. भारतीय बनावटीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र फिलीपाईन्सला आपण पुरवले आहे. आता हेच व्हिएतनाम आणि इंडोनेशियाही मागत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. खासगी क्षेत्रालाहीमेक इन इंडियामध्ये सामील करून घेतले आहे.आघाडीच्या खासगी कंपन्याही परदेशात निर्यात करत आहेत.सैन्यासाठी आवश्यक सर्व दारूगोळाही देशातच बनत आहे, ही देखील अभिमानाची गोष्ट आहे. कारगिल युद्धात आपल्याला प्रचंड खर्च करून दारूगोळा विकत घ्यावा लागला होता. त्यासाठी दुप्पट, चौपट किंमत मोजावी लागली होती. कोणतेही महत्त्वाचे शस्त्र आपल्यालाच बनवता आले पाहिजे, हे आपले धोरण असून त्याला यशही येत आहे.

शस्त्रांबरोबरच शस्त्र वापरणारा सैनिकही महत्त्वाचा असतो. अग्निवीरांची सध्याची कामगिरी चांगली आहे. मात्र, यात काही सुधारणा करायची का, हे आणखी काही वर्षांच्या अनुभवावरून निश्चित करता येईल. लष्करातील महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण अधिकाधिक वाढवले जात आहे. सध्या लष्करात सुमारे तीन हजार महिला अधिकारी आहेत. पायदळ चिलखती दल (आर्मर्ड कोअर) व्यतिरिक्त सर्वत्र महिलांना प्रवेश देण्यात आला आहे. सैनिकांच्या बाबतीत मिलिटरी पोलिसमध्ये महिलांची भरती झालेली नाही. लवकरच अन्यत्रही त्यांना सामावून घेतले जाईल.

याशिवाय लष्करात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आर्टिफिशयल इंटलिजन्स, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणाही लष्कराने आत्मसात केली आहे. ड्रोन्स, चालकरहित वाहने, उभयचर वाहने, सायबर सिक्युरिटी आदीबाबत लष्कराने प्रगतीचा मोठा पल्ला साध्य केला आहे. जगातील सर्वाधिक मानाची क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिंपिकस्पर्धेत लष्करी क्रीडापटूंनी सुवर्णपदकांसह अनेक पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. ‘मिशन ऑलिंपिकअंतर्गत लष्कर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू घडवत आहे.लष्कर अनेक पर्यावरणपूरक उपक्रमही राबवत आहेत. हजारोनिवृत्त लष्करी अधिकारी-जवान देश उभारणीसाठीमोठे योगदान देत आहेत. याशिवाय देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास लष्कर मदतीला धावून जाते. पूर, वादळ, भूस्लख्खन अशा कोणत्याही संकटात लष्करी जवान मदत बचावकार्यात आघाडीवर असतात.

देशाच्या सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असली, तरी भारतीय सैन्याची क्षमता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.अंतर्गत बाह्य सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जायला, भारतीय लष्कर समर्थ आहे, एवढे आपण खात्रीने नक्कीच सांगू शकतो. भारतीय लष्कर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद.

No comments:

Post a Comment