Total Pageviews

Saturday, 19 May 2018

रमझानमधील ‘दया’ आणि ‘दगा’ महा एमटीबी -VIJAY KULKARNI

मुस्लिमांसाठी पवित्र-पाक महिना म्हणजे रमझान. गुरुवारपासून अल्लाच्या श्रद्धेला वाहिलेल्या या रमझानची सुरुवात झाली. मुसलमानही रोझे धरून या रमझानमध्ये भक्तिभावाने सामील होतात. त्यामुळे किमान रमझानच्या या महिन्यात काश्मीर खोर्‍यात शांतता नांदावी म्हणून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे रक्तपाती कारवाई नको, म्हणून विनंती केली. केंद्र सरकारनेही उदार मनाने आणि खोर्‍यातील स्थिती पाहता, केवळ गरज पडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासनही दिले. मुफ्तींनी मोदी आणि राजनाथसिंहांचे यासाठी आभारप्रदर्शन करून तीन-चार दिवसही उलटत नाही, तोवर पाकिस्तानने काल शस्त्रसंधींचे उल्लंघन करत सीमाभागात जोरदार गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक बीएसएफचा जवान शहीद झाला असून चार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
 
त्यामुळे प्रश्‍न हाच पडतो की, काश्मीरमध्ये बहुसंख्येने मुसलमान आहेत, म्हणून दहशतवाद्यांविरोधी कारवाई करू नये, असे मुफ्तींचे म्हणणे, तर दुसरीकडे इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानला मात्र रमझानशी, त्यामागील भावनांशी काही घेणे-देणे नाही का? भारताने सहिष्णूतेची, सामंजस्याची भूमिका घेत खोर्‍यातील दहशतवाद्यांनाही टिपायचे नाही, अशी मुफ्तींची अपेक्षा. पण, पाकिस्तानकडून मात्र ऐन रमझानच्या पहिल्या शुक्रवारी अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणजे जणू मुद्दाम भारताला डिवचण्याचा डावच म्हणावा लागेल. जणू मुफ्तींच्या शांततेच्या मागणीची खिल्ली उडवण्यासाठीच पाकने हा अमानवीय आणि रमझानलाही लाजवणारा हल्ला केला. म्हणा, पाकिस्तानकडून चांगल्याची, ‘पाकी’ वागण्याची मुळीच अपेक्षा नाही. कारण, त्यांच्या दृष्टीने ‘पाक’ म्हणजे ’पवित्र’ नव्हे, तर ‘पाप’च असावे. अशीच त्यांची वागणूक. अशीच पापं करत राहायची आणि निष्पापांचे जीव घ्यायचे, हीच त्यांची पापनीती. ७० वर्षांनंतरही पाकिस्तानमध्ये सुधारणा नाही आणि यापुढेही ती होईल, अशी अपेक्षा करणेही तसे व्यर्थच. पण, भारताने शांतता, सहिष्णुता, सौहार्द यांची मूल्यपेरणी करीत राहायची आणि दुसरीकडे पाकिस्तानने मात्र शत्रुत्व, दहशतवाद आणि दगाबाजी याचीच री ओढायची, असा हा दुर्देवी प्रकार. तेव्हा, रमझानच्या या पवित्र महिन्यातील ही ‘दया’ आणि ‘दगा’, दोन्ही गंभीर विचार करायला लावणारे आहेत.
 
 
00000000000000000000000000000000000000000000000000 
काश्मीरमधील कारवाया...
 
पाकच्या या नापाक हल्ल्याची मेहबूबा मुफ्तींनीही निंदा केली. ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत पाकिस्तानकडून रमझानच्या महिन्यात अशी कारवाई होणे, हे रमझानचा अनादर करण्यासारखे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडून मुफ्तींनी शांततेची अपेक्षाही बोलून दाखविली. पण, मुफ्तींनाही हे चांगलेच ठाऊक आहे की, पाकिस्तान हा सुधारणार्‍यांपैकी नाही. त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यातच मोदींचे वाढते जागतिक महत्त्व आणि पाकिस्तानातील ढासळत जाणारी अंतर्गत व्यवस्था, यामुळे पाक सरकार अधिकच बिथरले असून त्याचाच द्वेष सीमेवरील हल्ल्यांमध्ये असा उफाळून येतो. म्हणजे एकीकडे सीमेवर असे हल्ले करून वातावरण तापते ठेवायचे आणि दुसरीकडे फुटीरतावाद्यांना फूस लावून काश्मीरमधील अंतर्गत स्थिती धगधगती ठेवायची, ही पाकची रणनीती.
 
बुर्‍हान वाणी आणि गँगचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले. गेल्या एका वर्षात जवळपास २१७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून ६० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामुळे सैन्याच्या कारवाईमुळे एकीकडे दहशतवाद्यांची सद्दी संपत आली असली तरी खोर्‍यातील दहशतवाद्यांची आयात काही थांबलेली नाही. कारण, गुप्तचर यंत्रणेच्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी १५०-२०० दहशतवादी काश्मीर खोर्‍यात सक्रिय होते, पण आता त्यांची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे काश्मीर खोर्‍यातील दहशतवादाचे काळे ढग काही पूर्णपणे दूर झालेले नाहीत, हेही विसरून चालणार नाही. एकट्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापतींमुळे आतापर्यंत २१९ नागरिकांचे प्राण गेले आहेत, ते जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या या दहशतवादी कृत्यांना वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहेच. फुटीरतवाद्यांच्या आर्थिक मुसक्या आवळल्यामुळे त्यांच्या देशविरोधी कारवायांनीही खीळ बसली असली तरीही काश्मिरींमधील भारताविषयीचा रोष काही केल्या कमी झालेला नाही. त्यामुळे सैन्यानेही सामंजस्याची, चर्चेची भूमिका घेत स्थानिकांमधील असंतोष कमी होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही पर्यटकांवर दगडफेक करून काश्मिरी तरुणांनी नाहक त्यांच्याच बांधवांच्या रोजीरोटीचे ताट एकप्रकारे भिरकावून लावले आहे. तेव्हा, काश्मीरमध्ये स्थैर्य नांदायचे असेल तर अंतर्गत आणि बाह्य देशविरोधी शक्तींना वेळीच ठेचण्याशिवाय पर्याय नाहीच

No comments:

Post a Comment