Total Pageviews

Wednesday, 23 May 2018

‘शांती असेल तरच विकास शक्य असतो-महा एमटीबी 23-May-2018



’’ हे वर्तमानातल्या किंवा नजीकच्या इतिहासातील कुण्या तत्त्ववेत्त्याने म्हटलेले नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेत हे सांगितले आहे. कृष्णाने गीता अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितली होती. त्या वेळी पार्थ हतबद्ध झाला होता. आपण कुणाशी युद्ध करून कुणाला मारणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला मिळणारे राज्य आपण काय गमावून मिळविणार आहोत, असा सवाल त्याला पडला होता. आपल्याच आप्तांना मारून आपण राज्य मिळवावे काय, असा प्रश्न पडलेल्या पार्थाला कृष्णाने गीता सांगितली. त्यातच शांततेचे महत्त्व त्याने सांगितले. रससिद्धांतात नवरस सांगितले आहे. त्यात क्रोध हादेखील रस आहे; पण भवभूतींपासून कालिदासांपर्यंत सार्‍यांनीच हेच रस सांगितले आहे किंवा आपल्या लेखनात आणले आहेत. त्यात शांतरस नाही. तो गीतेत सांगितला गेला अन्‌ तोही युद्धभूमीवर. ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत शांतरसाची मांडणी केली. ती गीतेतून आली होती. गीता अनेकांनी आपापल्या दृष्टिकोनातून पुन्हा मांडली, पण त्यांना शांतरस नाही दिसला, ज्ञानेश्वरांना तो दिसला अन्‌ खर्‍या अर्थाने आयुष्याच्या सर्वच अंगाने विकास व्हायचा असेल तर तर शांतपर्वातच होऊ शकतो, असे कृष्णाने सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे सर्व आताच आठवण्याचे कारण, पुन्हा काश्मीरच्या सीमेवर असलेली युद्धजन्य परिस्थिती! तिकडे पीडीपीसोबत भाजपाने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यावर देशांतर्गत काही शहाण्यांनी टीका केली होती. सीमेच्या पलीकडे पाकिस्तानात आणि त्यांचा नवा मित्र असलेल्या चीनमध्येही ही बाब खचीतच न आवडणारीच होती. काश्मीर धगधगता ठेवण्यातच त्यांना रस आहे. पाकिस्तानात सत्ता टिकवायची असेल, तर भारतासोबत कुरापत काढा आणि काश्मिरात अशांतता पसरवा, हाच मार्ग सोपा वाटत असतो.
तिथल्या सत्तेवर नेहमीच लष्कराचा अंकुश असतो. लोकशाही मार्गाने आलेले सरकार कमकुवत असावे आणि ते स्थिर राहूच नये यासाठी तिथे सातत्याने नागरी राजकारण करणारे पक्ष आणि लष्कर प्रयत्न करीत असतात. आताही तेच सुरू आहे. भाजपाचे केंद्रात आणि देशभरातील अनेक राज्यांत सरकार आल्यावर केवळ देशांतर्गतच अस्वस्थता पसरली असे नाही, या अस्वस्थतेचा उगम पाकिस्तानातूनच झालेला आहे. कृष्णाने गीतेत शांतता असली तरच विकास शक्य आहे, असे सांगितले होते. मोदींनी तो केला. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी वांझोट्या चर्चा करणे म्हणजे केवळ नेभळटपणा आहे आणि फुटीरतावाद्यांच्या पाकधार्जिणेपणाला खतपाणी घालण्यासारखे आहे हे लक्षात घेऊन, शांतता नांदणार नाही तोवर चर्चा करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली. फुटीरतावादी आणि पाकिस्तानातून आलेले दहशतवादी दोघांनाही ठेचण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यावरही टीका करण्यात आली. चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, असे राजशिष्टाचारी विचार करणार्‍यांना वाटते.
मोदी सरकारच्या कुठल्याही वर्तनावर केवळ टीकाच करायची, असा एककलमी कार्यक्रम 2014 पासून राबविला जातो आहे. काश्मीरच्या संदर्भात चर्चेचे गुर्‍हाळ कधीचे सुरू आहे. त्याला नेभळपटणा समजून पाकिस्तानच्या कारवाया अधिकच उग्र होत गेल्या. त्यामुळे आता ‘भारतव्याप्त काश्मीर’ अशी एक नवीच संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्याला आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कडक शब्दात उत्तर दिले. काश्मिरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. अगदी दर सहा महिन्यात एका मोठ्या कामाचे लोकार्पण किंवा भूमिपूजन करण्यात येते. काश्मिरातील वाहतूक गतिमान व्हावी आणि हा भाग देशातील इतर भागांशी दृढपणे जोडला जावा, ही नीती आहे. पाकिस्तानला अर्थातच ते नको आहे. त्यासाठी पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असतो. नागरी भागांवर हल्ले केले जातात. काश्मीरात कुठलेही विकास काम पूर्णत्वास जाताना पाकिस्तानकडून हल्ले केले जातात, हे परवा पुन्हा एकदा सिद्ध झाले. काश्मीरच्या गुरेज भागात बांधण्यात आलेल्या 330 मेगावॅटच्या किशनगंगा ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.
झोजिला बोगद्याचे भूमिपूजनही करण्यात आले. गेल्या चार वर्षांत देशात रस्ते आणि दळणवळणाच्या इतर साधनांच्या बांधणीने गती पकडली आहे. त्यामुळे हा बोगदाही तातडीने बांधून पूर्ण होणार, हे सांगण्याची गरज नाही. हा बोगदा झाला की काश्मिरातील श्रीनगर, कारगिल आणि लेह हे प्रांत जोडले जातील. झोजिला पासपर्यंतचा साडेतीन तासांचा प्रवास पंधरा मिनिटांवर येणार. अर्थात, काश्मिरात होणारे पूल, रस्ते, बोगदे यामुळे काश्मीर तीव्र गतीने देशाशी जोडला जातो आहे. विकासालाही गती आली आहे. तिथे अशांतता माजवून विकास होऊ द्यायचा नाही, ही नीती पाकिस्तानची आहे. त्यामुळे अर्थातच काश्मिरींमध्ये नैराश्य पसरते. तिथला पर्यटनाचा व्यवसाय मंदावतो. व्यापारउदीमही थंडावतो आणि रिकाम्या हातात शस्त्रे पेरणे अत्यंत सोपे असते. तेच नेमके केले जाते आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान दहशतवादाला अजीबातच थारा देत नाही, अशी भंपक भूमिका पाकिस्तान घेत आला आहे. अर्थात, वारंवार तोंडघशीही पडला आहे.
अमेरिकेने त्याबाबत आता स्पष्ट भूमिका घेतल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यातच मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच सांगून टाकल्याने जगासमोर पाकिस्तानची पुरती लाज झाली आहे. एकीकडे फुटीरतावाद्यांना ठेचून काढत असताना दहशतवाद्यांचे हल्ले परतवून लावले जात आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा याला विरोध असल्याचे जगासमोर मांडण्यासाठी स्थानिक तरुणांना भरकटवून त्यांच्या हाती शस्त्र, दगड दिले जात आहेत. आता त्यावरही उपाय काढण्यात आला. लष्कराने कडक भूमिका घेतली. होत असलेली विकासकामेही काश्मिरी जनतेला दिसत आहेतच. मागे काश्मिरात महापूर आला तेव्हा भारत सरकारच धावून आले होते, हेही ताजे आहे. त्यामुळे नागरी वसत्यांमध्ये अस्वस्थता आहे, हे दाखविण्यासाठी करण्यात आलेली कारस्थानेही निष्प्रभ ठरली आहेत.
शांतता प्रस्थापित करत असतानाच विकास कामांना गती देणे, ही केंद्र सरकारची नीती राहिली आहे. आताही श्रीनगर, कारगिल, लेह या भागात 25 हजार कोटींच्या विकास कामांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हे गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने नागरी भागांवर हल्ले सुरू केले. त्याला तितक्याच प्रबळपणे सीमा सुरक्षा दलांनी उत्तर दिल्यावर पाकिस्तानला याचना करावी लागली. एकीकडे याचना करून दुसरीकडे दुसर्‍याच दिवशी पाकड्यांनी अर्निया प्रांतात गोळीबार केला. आता केंद्र सरकार सिंधू नदीचे पाणी अडविणार आहे. रमजानच्या महिन्याचे कारण देत शांततेची याचना करायची अन्‌ दुसरीकडे असे हल्लेही करायचे, ही पाकची कुनीती आहे. भारताचे सरकार शांततेसाठी वेळी शस्त्राचा वापर करीत दुसर्‍या बाजूने विकास कामांना गती देत आहे. ही सकारात्मक व्यूहनीती आहे. गीतेत कृष्णाने जे सांगितले आणि ज्या पृष्ठभूमीवर सांगितले त्याचा नेमका अर्थ केंद्र सरकारला कळला आहे. शांतताच हवी आहे; पण त्यासाठी नेभळट चर्चा करत बसण्यापेक्षा युद्ध करून शांतता प्रस्थापित करायची अन्‌ त्याच वेळी विकास कामांनाही गती द्यायची, अशी त्रिवेणी वाटचाल सुरू आहे...

No comments:

Post a Comment