Total Pageviews

Friday, 18 May 2018

राजरंग पाकिस्तानचे!! महा एमटीबी

पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री नवाज शरीफ, यांनी गेल्या आठवड्यात मुंबई हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानी डॉन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक स्टेटमेंट दिलं. मुलाखत काय दिली? असा स्टॅन्ड घेऊन ते काय राजकारण करू इच्छितात ? इत्यादी गोष्टींचा उहापोह इथे आज करू.
 
 
डॉनला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी सर्वप्रथम, पाकिस्तानच्या राज्यपद्धतीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, पाकिस्तानात २-३ वेगवेगळी सरकारे समांतर पद्धतीने कारभार चालवतात. आणि हे थांबवायलाच हवे. कामकाज फक्त कॉन्स्टिट्यूशनल किंवा निवडून गेलेल्या सरकारनेच चालवले पाहिजे. बाकी कोणी सत्ता ओरबाडू नये. आता असे म्हणत असताना ते, पहिले तर संविधानिक सरकार आणि दुसरे म्हणजे तिथे सरकारच्या डोक्यावर बसलेली मिलिटरी यांच्यावर हा निशाणा साधत आहेत, हे सहजच लक्षात येते. त्याच बरोबर त्यांनी अजून एक मोठा खुलासा केला. २००८ साली झालेला २६\११ म्हणून ओळखला जाणारा मुंबई हल्ला पाकिस्तान मधून भारतात शिरलेल्या अल-कायदाच्या पाकिस्तानी हस्तकांनी घडवून आणला हे त्यांनी कबुल केले. इतकेच नाही तर पाकिस्तानात या केसची सुनवाई अगदी मंद आणि थातुरमातुर पद्धतीने चालली आहे असेही ते म्हणाले.
 
 
त्यांच्या या जबाबाचा ही केस लढण्यासाठी भारताला मोठा फायदा तर पाकिस्तानला नुकसान होणार आहे. अर्थात हा खुलासा त्यांनीच याआधीही एकदा केलेला आहेच. आज निर्णायकपणे मांडला.
 
 
तसेच ते पुढे म्हणतात, आतंकवादी गट पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. आपण त्यांना का रोखू शकत नाही? आणि हीच काळजी रशियाचे आणि चीनचे अध्यक्ष पुतीन व Xi जिनपिंग यांनीही प्रदर्शित केली आहे.
 
 
आता आंतरराष्ट्रीय आतंकवादी हाफिज सईदला चीन पाठीशी घालतोय हे तुम्हा आम्हा सामान्य लोकांनाही ठाऊक आहे; ही गोष्ट अलाहिदा.!
 
 
तुम्हाला आठवत असेलच या दोनही देशांनी पाकिस्तानच्या आतंकवाद विरोधी कारवायांची स्तुती केली होती. पण ते पुरेसे नाहीये असेही हे देश म्हणत आहेत. आता यावर नवाझ शरीफ म्हणतात पाकिस्तानी सैन्य सरकारला नीटपणे आपले काम करू देत नाही. सतत वर्चस्व प्रस्थापित करून सत्ता स्वताच्या हातात कशी राहील याकडे त्यांचे लक्ष असते. आणि यातही पाक सरकारचा प्रचंड पैसा सैन्यावर खर्च होतो. त्यामुळे विकासात्मक अजेंडा राबवता येत नाही. प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. या सर्व मुद्यांना चांगलेच वजन आहे. या आणि अश्या सगळ्या गोष्टी समजू शकणाऱ्या, विचार करणाऱ्या, बुद्धीवादी समाजाला नवाझ शरीफ यांनी दिलेली ही इनपुट्स आहेत. आता मुद्दा असा की या गोष्टी त्यांनी आत्ता आणि अश्या मोकळेपणाने का मान्य केल्या.?
 
 

पाकिस्तानातही आता निवडणूका अगदी तोंडावर आहेत. त्याची तयारी सुरु झाली असे म्हणता येईल. आणि दिड वर्षांपूर्वी पाकिस्तान आर्मी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यामुळे पनामा केस मध्ये अडकलेले व त्यामुळे पदउतार झालेले शरीफ अश्या प्रकारे आपल्या अपमानाचा बदलाही घेत आहेत.
 
 
फॉर्मर क्रिकेटर इम्रान खान यांनी शरीफ हे भारतीय पंतप्रधान मोदीजी यांची भाषा बोलत आहेत असा आरोप केला आहे. नवाजना पाठिंबा देणाऱ्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या चँनल्सवर बोलावू नये अश्या सख्त सुचना ही पाक मिडियामध्ये फिरत आहेत.
 
 
अमेरिकेलाही अफगाणिस्तान संदर्भात पाक सैन्याचा हिशोब चुकता करायचा आहेच. त्यामुळे तेही दबा धरून बसले आहेत. तसच सीपेक आणि आशियातील चीनचे मनसुबे, या संदर्भांत पुढील घटनांचा आढावा आणि आखणी करण्याकरिता त्यांनाही venting time हवा असावा. बदलत्या आंतरराष्ट्रीय हवामानाला अनुसरून मोदीजी-जिनपिंग यांनीही अफगाणिस्तानात एकत्र प्रकल्पाची योजना केली आहे. पाकसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.
 
 
यासगळ्या घटनांमधून येत्या काळात पाकिस्तानी आभाळात अनेक interesting घटनांचे रंग पहायला मिळतील असे अनुमान काढता येते

No comments:

Post a Comment