कालच आशिया - पॅसिफिक प्रदेशातल्या २५ देशांच्या तुलनात्मक सामर्थ्याचं मोजमाप करणारा एक निर्देशांक जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातल्या ‘लोवी इन्स्टिट्यूट’ तर्फे जाहीर करण्यात आलेल्या या निर्देशांकात भारताला चौथा क्रमांक मिळाला आहे. ही भारतासाठी नक्कीच एक शुभवार्ता आहे. भारत राबवत असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणांची ही फलश्रुतीच म्हणावी लागेल. आशिया - पॅसिफिक प्रदेश हा अर्धी पृथ्वी व्यापणारा आहे. पश्चिमेकडे पाकिस्तान, उत्तरेकडे रशिया, दक्षिणेकडे ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड आणि पूर्वेकडे महाकाय पॅसिफिक महासागरापलीकडे असलेली अमेरिका यांनी वेढलेल्या या प्रदेशात २५ प्रमुख देश येतात. त्यातले अमेरिका, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया हे प्रमुख. गेल्या काही वर्षांमध्ये आशिया - पॅसिफिक प्रदेशातलं चीनचं वाढतं आक्रमण, त्यामुळे हवालदिल झालेले व्हिएतनामसारखे छोटे देश, उत्तर कोरियाचा आक्रमकपणा आणि या प्रदेशात शांततेसाठी प्रयत्न करणारे भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया-जपान यांमुळे आशिया-पॅसिफिक प्रदेश आंतरराष्ट्रीय पटलावर सतत चर्चेत राहिला आहे. लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालामुळे या प्रदेशातल्या देशांच्या ताकदीचं मूल्यमापन आकडेवारीच्या रूपात जगासमोर आलं आहे.
हा निर्देशांक तयार करण्यासाठी एकूण आठ निकष वापरले गेले - आर्थिक संसाधने, लष्करी क्षमता, लवचिकपणा, भविष्यकालीन धोरणं, परराष्ट्र धोरणांवरचा प्रभाव, आर्थिक संबंध, लष्करी संबंध आणि सांस्कृतिक प्रभाव. या आठ निकषांच्या आधारावर ‘सामर्थ्य निर्देशांक‘ तयार करण्यात आला. यात सर्वात सामर्थ्यशाली अर्थातच अमेरिका आहे. दुसर्या क्रमांकावर चीन, तिसर्या क्रमांकावर जपान, तर चौथ्या क्रमांकावर भारत आहे. रशिया पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि चीन यांना ‘सुपरपॉवर’ असे संबोधले गेले असून जपान आणि भारत यांना ‘मेजर पॉवर’ असे संबोधले गेले आहे. त्याखालोखाल असलेल्या रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, न्यूझीलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, तैवान, फिलिपिन्स आणि उत्तर कोरिया यांना ‘मिडल पॉवर’, तर बांग्लादेश, ब्रुनेई, म्यानमार, श्रीलंका, कोलंबिया, मंगोलिया, लाओस आणि नेपाळ या राष्ट्रांना ‘मायनर पॉवर’ असे संबोधले गेले आहे. या २५ देशांमध्ये भारतला ‘मेजर पॉवर’ हा किताब मिळणं आणि रशिया व ऑस्ट्रेलियाच्याही भारत पुढे असणं ही भारतासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. अहवालामध्ये भारताला ‘जायंट ऑफ द फ्युचर’ असे संबोधले गेले आहे. वर नमूद केलेल्या आठ निकषांपैकी भारत सांस्कृतिक प्रभाव आणि भविष्यकालीन डावपेच या निकषांमध्ये तिसरा; आर्थिक संसाधनं, लष्करी क्षमता, परराष्ट्र धोरणातील प्रभाव या निकषांमध्ये चौथ्या क्रमांकावर असून ‘लवचिकता’ या निकषामध्ये भारत पाचवा आहे. आर्थिक संबंध (७ वा क्रमांक) आणि लष्करी जाळे (१० वा क्रमांक) याबाबतीत मात्र भारत थोडासा मागे आहे. भारताचं एकंदर सामर्थ्य वाढण्यात ‘लुक ईस्ट’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांचा मोठा वाटा आहे.
हा अहवाल अमेरिका आणि चीन यांच्याही तौलनिक सामर्थ्याचं विश्लेषण करणारा आहे. सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका जरी सर्वोच्च असली तरी चीन आता अमेरिकेच्या फार मागे राहिलेला नाही. लोवी इन्स्टिट्यूटच्या निर्देशांकात अमेरिकेला ८५ तर चीनला ७५.५ गुण दिलेले आहेत. आर्थिक संबंध, परराष्ट्र धोरणातील प्रभाव, आणि भविष्यकालीन डावपेच यांच्या बाबतीत चीन अमेरिकेच्याही पुढे आहे. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत मात्र अमेरिकेने चीनला तब्बल ६५ गुणांनी मागे टाकले आहे. त्यामुळे आशिया खंडाच्या राजकारणावर अमेरिकेची सत्ता राहणार की चीनची, याबाबत संदिग्धता असल्याचं हा अहवाल सांगतो. एक मात्र खरं की, आशिया-पॅसिफिक प्रदेशावर कोणालाही वर्चस्व सांगताना भारताला दुर्लक्षून चालणार नाही. भारताचा सामर्थ्याच्या बाबतीतला चौथा क्रमांक आपल्याला आणि जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा आहे.
No comments:
Post a Comment