सैनिकी परंपरा असलेल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शेवते या
गावचा मूळ रहिवासी असणाऱे प्रथमेश दिलीप कदम हे गेल्या आठ वर्षांपासून
भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. भोपाळ दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातातील बचाव
मोहिमेत ते सहभागी झाले होते. या ठिकानी बचाव कार्यादरम्यान झालेल्या स्फोटामध्ये
ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दिल्ली येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना
७८ तासांच्या मृत्यूशी झालेल्या तीव्र झुंजीनंतर अखेर प्रथमेश कदम हे शहीद झाले.
दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या या दुःखद घटनेच्या वृत्ताने शेवते या प्रथमेश
यांच्या मुळगावावर शोककळा पसरली आहे.
शेवते या महाड तालुक्यातील सैनिकी परंपरा असलेल्या ८० घराच्या
उंबरठय़ाच्या गावातील प्रथमेश हा लहानपणापासून नाशिक येथे आपल्या आई वडील व
कुटुंबियांसमवेत राहात होता. नाशिक येथीलच एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये बारावीपर्यंत
आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने भारतीय सैन्यदलात प्रवेश केला.
शहीद प्रथमेशचा संदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडून प्राप्त
झालेल्या माहितीनुसार गेल्या चार पिढय़ांपासून कदम कुटुंबातील किमान एकजण भारतीय
सैन्यदलांमध्ये दाखल झाला आहे. प्रथमेशचे चुलते चंद्रकांत शंकर कदम हे बॉम्बे
इंजिनीरिंग मधून आपली सेवा बजावून निवृत्ती स्वीकारून आपल्या मूळ शेवते या
गावी सध्या वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा बॉम्बे इंजिनिअरिंगमध्ये सध्या
देश सेवा बजावित आहे.
आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात सामील झाल्यानंतर प्रथमेशने ईएमई
या सैन्यदलातील विभागामध्ये आपली सेवा बजावत होता. यानंतर प्राथमिक प्रशिक्षणानंतर
त्याने बडोदा चंदीगड व राजस्थान येथे सेवा केली होती. शनिवार बारा मे रोजी
दुपारनंतर त्याच्या विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार भोपाळजवळील
रेल्वे मार्गावर अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या बचाव कार्यात प्रथमेश असलेल्या
त्यांच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले होते .
शहीद प्रथमेशचे चुलते सुभाष शंकर कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार
भोपाळ येथील रेल्वे अपघातादरम्यान बचाव कार्य करीत असताना झालेल्या स्फोटामध्ये
प्रथमेश ला गंभीर जखमा झाल्याने त्याला शनिवारी रात्री पुढील उपचारासाठी नवी
दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या घटनेची माहिती नाशिक येथील
त्यांच्या आई वडिलांना कळविण्यात आल्यानंतर ते भोपाळ करता रवाना झाले मात्र
प्रथमेशची स्थिती अधिक गंभीर झाल्याने त्याला दिल्ली येथे रवाना केल्याची
माहिती देऊन त्या पाठोपाठ आई वडिलांना दिल्ली येथे रेल्वेच्या मार्गाने जाण्याची
व्यवस्था करण्यात आली .
बुधवारी सकाळी शासकीय कार्यालयातून प्रथमेशच्या या दुःखद निधनाचे
वृत्त समजताच महाड शहरासह तालुक्यातील विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात
आला. महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ यांनी या संदर्भात प्रथमेश कदम
यांच्या शेवते येथील निवासी जावुन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
शहीद प्रथमेशच्या नातेवाइकानी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली
येथून रात्री उशीरा अकरा वाजता विशेष विमानातून प्रथमेशचे पार्थिव शरीर प्रथम
मुंबई व त्यानंतर शेवते गावी आणण्यात येणार आहे. यानंतर सकाळी सातच्या सुमारास
प्रथमेशचे शव स्थानिक ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात
येणार आहे. नंतर ग्रामस्थांचे व विविध मान्यवरांच्या तसेच शासकीय अधिकार्यांच्या
उपस्थितीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील असे
त्याच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महाड तालुक्यातील विशेष करून रायगड वरध विनेरे या भागातील बहुसंख्य
गावातील नागरिक हे अनेक पिढ्यांपासून भारतीय सैन्यदलात आपली देशसेवा पार पाडीत
असून महाड तालुक्यातील आजवर झालेल्या अनेक शहीद परंपरांमधील प्रथमेशच्या रूपाने
अजुन एक तारा या महान परंपरे मध्ये सामील झाला आहे. प्रथमच्या या दुःखद निधनाच्या
वृत्ताने शेवते गावासह संपूर्ण विभागात शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment