Total Pageviews

Sunday, 13 May 2018

महापराक्रमी राजा : छत्रपती संभाजीराजे-पोपट नाईकनवरे

छत्रपती संभाजीराजेंची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असणार्‍या संभाजीराजांना राजकारणातील डावपेच आणि बाळकडू लहानपणीच मिळाले. अनेक भाषा अवगत असणारे संभाजीराजे अत्यंत शूर आणि पराक्रमी होते. गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी, म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय यांच्या विरोधात राजेंनी फक्त लढाया किंवा फक्त युद्धच केले नाही, तर त्या सत्ताधिशांना असा धडा शिकवला की पुन्हा कधीही त्यांनी राजांच्या विरोधात मोगल बादशहा औरंगजेबाला मदत करण्याचे धाडस करण्याचा विचारही केला नाही. 
इतिहासाच्या पानापानांना व मराठी माणसाच्या मनामनांना साद घालणारे एक ऐतिहासिक सुवर्णपान म्हणजे छत्रपती शिवाजीपुत्र छ. संभाजी महाराज होत. या महापराक्रमी, धाडसी, शत्रूंच्या मनात धडकी निर्माण करणार्‍या छत्रपतींची आज जयंती. 

संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांचा जन्म ज्येष्ठ शु. 12 शके 1579 म्हणजेच दि. 14 मे 1657, गुरुवार या दिवशी पुरंदर किल्ल्यावर झाला. मातोश्री सईबाई यांचे देहावसान संभाजीराजांच्या जन्मानंतर लगेचच दोन वषार्र्ंनी झाले. त्यामुळे संभाजीराजांच्या संगोपनाची जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्याकडे आली. त्यांनी छत्रपती संभाजीराजांचा शिवरायांप्रमाणेच सांभाळ केला. जिजाऊंबरोबरच पुतळाबाई आणि पुण्याजवळील कापूरहोळ गावच्या धाराऊ पाटील या महिलेने त्यांना मातेप्रमाणे प्रेम दिले. राजपुत्र असल्यामुळे त्यांना राजकारणातील डावपेच आणि राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाल्यामुळे शिवाजी महाराजांच्या पश्‍चात अनेक सरदार आणि राजघराण्यातील काहीव्यक्तींचा विरोध असतानाही त्या विरोधावर मात करत त्यांनी रायगडावर 16 जानेवारी 1681 रोजी सर्वांच्या साक्षीने राज्याभिषेक केला. 
छत्रपती संभाजीराजांनी आपल्या थोड्याच कालखंडात म्हणजेच 8 ते 9 वर्षांत गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी, म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय यांच्या विरोधात फक्त लढाया किंवा फक्त युद्धच केले नाही, तर त्या सत्ताधिशांना असा धडा शिकवला की, पुन्हा कधीही या सत्ताधिशांनी संभाजीराजांच्या विरोधात मोगल बादशहा औरंगजेबाला मदत करण्याचे धाडस केले नाही. यावरून संभाजीराजांच्या पराक्रमाची प्रचिती येते. 
छत्रपती शंभुराजांचा इतिहास किंवा पराक्रम विचारात घेताना औरंगजेबाविरुद्धचा संघर्ष विसरता येणार नाही. वास्तविक पाहता, छ. संभाजीराजांच्या सैन्यापेक्षा आणि स्वराज्यापेक्षा औरंगेजबाचे साम्राज्य व सैन्य किती तरी पटींनी अधिक होते. मात्र, तरीही बलाढ्य औरंगजेबाला मराठ्यांचे राज्य नष्ट करता आले नाही. उलट, स्वतःलाच नष्ट व्हावे लागले. औरंगजेब आणि संभाजीराजे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एका कारणरूपी घटनेचे वर्णन या ठिकाणी करणे सयुक्तिक वाटते. 
बुर्‍हाणपूर हे मोगल साम्राज्यात असणारे अने संपन्न ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करून औरंगेजबाने निर्माण केलेले सुरत शहर बदसुरत केले, त्याचप्रमाणे छत्रपती शंभुराजांनी बुर्‍हाणपूर जवळजवळ तीन दिवस लुटले. ही लूट एवढी प्रचंड होती की, मराठ्यांनी केवळ मौल्यवान वस्तू, सोने, जडजवाहीर आणि चांदीच्या वस्तू एवढेच लुटले. बुर्‍हाणपुरात मोगलांची काय फजिती झाली, याचे प्रत्यंतर औरंगजेबपुत्र अकबर याच्या पत्रावरून दिसते. औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात अकबर म्हणतो की, बुर्‍हाणपूर म्हणजे विश्‍वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ आहे; पण तो आज उद्ध्वस्त झाला. यावरून आपणास छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम दिसतो. म्हणूनच इंग्लंडचा दरबार त्यांचा उल्लेख वॉरलाईक प्रिन्स असा करतात. 
अशाच पद्धतीचा दुसरा प्रसंग म्हणजे, नाशिकजवळ रामशेज नावाचा किल्ला होता. तो किल्ला आपण सहज जिंकू, असे औरंगजेब बादशहाला वाटत होते. या किल्ल्याची जबाबदारी सूर्याजी जेधे व त्यांच्याकडे असणार्‍या पाच-सहाशे मावळ्यांकडे होती. हा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाने 30 ते 40 हजार फौजेनिशी शहाबुद्दीन फिरोजजंगाला पाठवले. सूर्याजी जेधे व त्यांच्या मावळ्यांच्या व छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमामुळे हा किल्ला मोगलांना साडेसहा वर्षे जिंकता आला नाही. शेवटी त्यांनी फंदफितुरीने हा किल्ला जिंकला. यावरून छ. संभाजीराजांच्या स्वराज्यात प्रत्येक मावळा हा शिवरायांच्या मावळ्याप्रमाणेच बहाद्दूर आणि स्वराज्यनिष्ठ, स्वराज्यावर प्रेम करणारा आणि आपल्या राजावर अपार निष्ठा असणारा होता, यात शंका नाही. 
छ. संभाजीराजांनी आपल्या जीवनात फक्त लढायाच केल्या नाहीत, तर एक राजा उत्कृष्ट साहित्यिकही असू शकतो, याचे उदाहरण त्यांनी इतिहासाच्या सुवर्णपानाला व मराठ्यांच्या मनाला घालून दिले. त्यांना अनेक भाषाही अवगत होत्या. याची अनेक उदाहरणे आपणास इतिहासात आढळतात. म्हणूनच त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी ‘बुधभूषण’सारखा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी राज्यकारभाराविषयीचे नियम, प्रशासन कसे असावे याबद्दलचे विचार आणि वडील छ. शिवाजी महाराजांबद्दल अनेक श्‍लोक लिहिलेले आढळतात. आजही या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे. एवढेच नव्हे, तर आज अनेक इतिहास अभ्यासक व संशोधकांनी त्यावर एम.फिल. व पीएच.डी. करून आपल्या राजाला मानाचा मुजरा केला आहे. 
छत्रपती संभाजीराजांनी परकीय सत्ताधिशांनी सुरू केलेल्या सक्तीच्या धर्मांतर मोहिमेला कडाडून विरोध केला. याचे पुरावे आजही मिळतात. तसेच अनेक साधू-संतांना राजांनी राजाश्रय दिला. 
अशा या महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, शत्रूचा कर्दनकाळ, प्रचंड ज्ञानी व साहित्यिक असणार्‍या राजाला फंदफितुरीने 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी कवी कलशासह पकडले आणि 11 मार्च 1689 रोजी त्यांचे निधन झाले. स्वाभिमानाने कसे जगावे हे शिवाजी महाराजांनी, तर स्वाभिमानाने मरावे कसे हे छ. संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले. भारतीय इतिहासामध्ये अनेक पराक्रमी राजे होऊन गेले; मात्र संभाजीराजांच्या शौर्याला, पराक्रमाला, धीरोदात्तपणाला आणि स्वाभिमानी वृत्तीलाही खरोखरीच तोड नाही

No comments:

Post a Comment