तशी ती घटना मोठीच. पण. सर्वांच्याच लेखी दुर्लक्षित राहिली. सनसनाटी निर्माण करण्याची कुवत नसल्याने असेल किंवा या देशातील कथित पुरोगाम्यांसाठी अडचणीची ठरणार असल्यानेही असेल कदाचित, पण अपवादानेच कुणी त्या घटनेची दखल घेतली. झालं काय की, राज्याच्या टोकावर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात गेल्या आठवड्यात पोलिसांनी 34 नक्षलवाद्यांच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच राजाराम खांदला येथे सात नक्षली तसल्याच एका कारवाईत मारले गेले. या दोन्ही घटनांबाबत तसा सगळीकडे आनंदच व्यक्त होत होता. हो! दु:ख व्हायचे कारणच काय? असे असताना समाजातील कथित हुशार मंडळींचा एक गट लागलीच घटनास्थळी दाखल झाला. त्यांच्या पातळीवर, त्यांच्या पद्धतीने या घटनेचे वाभाडे काढण्याची तयारी त्यांनी आरंभलीच होती, तर गावकर्यांच्या जराशा ‘वेगळ्या’ वर्तणुकीचा अनुभव त्यांना अस्वस्थ करू लागला. एरवी ‘यांनी’ आपल्या अधिकारांचे प्रदर्शन मांडत साहेबी थाटात गावात यायचे, पोलिसी पद्धतीनं चौकशा करायच्या. सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभं करून मोकळं व्हायचं, हीच त्यांची प्रचलित रीत होती. गावकर्यांचं काय, ही मंडळी एवढ्या दुरून आपल्या गावात आल्याचेच त्यांना कौतुक. दूरवरच्या शहरांतून धुराळा उडवीत आलेला त्यांच्या गाड्यांचा ताफाही एरवी दुर्गम भागातील या आदिवासी बांधवांसाठी कौतुकाचा विषय! त्या गाड्यांमधून उतरलेली शहरी माणसं आपल्याशी बोलतात, चार-दोन प्रश्न विचारतात, एवढ्यानेच हुरळून जायचेत लोक आजवर. मग ही मंडळी आपल्याच गावातील त्या घटनेबाबत तिकडे नागपूर, दिल्ली, मुंबईत जाऊन काय अकलेचे तारे तोडतात, काय चलाखी करतात, याबाबततर खबरबातही नसायची गावातील कुणालाच.
हीच परिपाठी वर्षानुवर्षे चालत राहिली आहे. एखाद्या घटनेत नक्षलवादी मारले गेले रे गेले की कम्युनिस्ट विचारांच्या स्वयंघोषित शहाण्यांची ‘सत्यशोधक’ समिती लागलीच गावात हजर! पण, नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलिस, गावकरी मारले जातात तेव्हा मात्र पत्ता नसतो यातल्या कुणाचाच दूरदूरपर्यंत. ही बाब पूर्वानुभावानं गावकर्यांच्याही ध्यानात आली अन् बहुधा त्यामुळेच, यंदा कसनासुरात दाखल झालेल्या सत्यशोधन समितीला त्यांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला.
पोलिसांच्या कारवाईत नक्षलवादी मारले गेले की लागलीच धावत येता, मग गावातली आमची माणसं मारली जातात, तेव्हा का नाही येत, या आणि अशा कित्येक प्रश्नांचा भडिमार सुरू झाल्याने अडचणीत सापडलेल्या नक्षलसमर्थकांच्या टोळीतील सदस्यांची तारांबळ उडाली. या प्रकरणातून दोन गोष्टी साध्य झाल्यात. एकतर कालपर्यंत यांनी यायचं, यांनीच प्रश्नांची सरबत्ती करायची अन् गावकर्यांनी गुमान ऐकून घ्यायचं, असल्या कार्यपद्धतीवर पहिल्यांदा खीळ बसली. दुसरं म्हणजे दुर्गम भागात राहात असले, नाही म्हणायला जगण्याचीही काहीशी विवंचना असली, तरी गावाकडची ही माणसं, हे लोक समजतात तेवढी अडाणीही राहिलेली नाहीत आता. त्यांनाही भल्या-बुर्याची, खर्या-खोट्याची जाण आहे. कोण फसवतंय्, कोण लुबाडतंय्, कोण वापर करून घेतंय् अन् कोण खरोखरीच पाठीशी उभं राहतंय्, हेदेखील एव्हाना लक्षात आले आहे त्यांच्या. नक्षल्यांनी आजवर आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, गरिबीच्या आपल्या परिस्थितीचा जगभर बाजार मांडला, अन्याय-अत्याचाराची वस्तुस्थिती होतीच कधीकाळी, पण त्यातून बाहेर काढण्यापेक्षा कुणाच्यातरी राजकारणासाठी सौदेच झाले त्या परिस्थितीचे. त्यामुळे प्रश्न सुटले नाहीतच. उलट इतरांनीच त्या प्रश्नांच्या राईचा पर्वत करून वाहवाही लुटली. आदिवासी मात्र होता तसाच राहिला... पण, सभोवतालच्या लोकांना समजून घेण्याबाबतचा त्याचा बाणेदारपणा मात्र दुपटीने वाढला. परवाचा कसनासुरातला प्रत्यय नेमका त्याच संदर्भातला आहे...
सुमारे 10 वर्षांपूर्वी बेनासूर टोलाच्या एका महिला सरपंचाला गावकर्यांच्या डोळ्यांदेखत गळा चिरून संपवले नक्षल्यांनी. तिने गावात उभारलेले चर्चही ध्वस्त केले गेले तेव्हा. ती शिक्षा होती, गावकर्यांची मोट बांधून त्यांना सकारात्मक दिशेने प्रवाहित करण्याकरता आरंभलेल्या प्रयत्नांची. पत्रु दुर्गे नावाचा एक तरुण कार्यकर्ताही असाच बळी ठरला नक्षलवाद्यांनी मांडलेल्या छळवादाचा. गावकर्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी मांडलेला तमाशा, मनाचा थरकाप उडविणारा तो थरार... सुन्न झाली घराघरातली माणसं. ते गावकरी. त्यांच्या आक्रोशाने सारा आसमंत व्यापून टाकला गेला होता. पण, एकही सत्यशोधन समिती कधी आली नाही त्या घटनेची चौकशी करायला अन् सत्य जगासमोर मांडायला. का? हे कृत्य नक्षलवाद्यांनी केले होते म्हणून? नक्षल्यांची हत्या झाली की लागलीच मानवाधिकाराचे स्मरण होते या लोकांना अन् आदिवासी मारला जातो तेव्हा नाही होत कुणालाच मानवी अधिकारांची आठवण? कसनसूर आणि राजारामच्या घटनेत नक्षली मारले जाताच आंध्रप्रदेशपासून तर पुण्यापर्यंतची मंडळी एकत्र येऊन गडचिरोलीत दाखल होते. फक्त गरीब आदिवासी मारले जातात तेव्हाच फुरसत होत नाही त्यांना इथे पोहोचण्याची.
एरवी नक्षलवादी चळवळीचे समर्थन करण्याची एकही संधी सोडत नाहीत ते. ही चळवळ म्हणजे सरकारी यंत्रणेविरुद्धचे युद्ध असल्याचा दावा असतो त्यांचा. पण, हे युद्धही त्यांना एकतर्फी हवे असते. त्यात फक्त पोलिसच मेलेले हवे असतात त्यांना. पोलिसांच्या बंदुकीने नक्षलवाद्यांच्या माना उडाल्या की मात्र जीव कळवळून उठतो त्यांचा. जर, या चळवळीचा एका युद्धाच्या स्वरूपात स्वीकार केलाय् तर मग स्वकीयांच्या मृत्यूची कल्पना का मानवत नाही चळवळीच्या समर्थकांना? त्यांनी पुकारलेल्या युद्धात फक्त पोलिसांनीच मरायचं का? त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास नाही, त्यांचा सरकारी यंत्रणेवरही म्हणे विश्वास नाही. मग लोकशाही व्यवस्थेतल्या चौथ्या स्तंभावर बरा विश्वास बसतो त्यांचा! सरकार अन् पोलिसांविरुद्धचे रडगाणे गाण्याकरिता प्रसारमाध्यमांचा वापर करताना कुठेच आडकाठी येत नाही नक्षलवाद्यांना? फक्त इतर यंत्रणांबाबत बोलायचे म्हटले की लोकशाही व्यवस्थेवरील अविश्वासाचे तुणतुणे वाजवायला मोकळे असतात सारे. परवा, नक्षल समर्थकांच्या या टोळक्याच्या नेमक्या याच नौटंकीवर वार झालेत. टोेळक्यातील सदस्य दाखल होताच, लोकांनी प्रश्नांचा मारा सुरू केला. उत्तरं देताच येणार नाहीत, अशा प्रश्नांनी सळो की पळो करून सोडले त्यांनी या शहाण्यांना. मग गडचिरोलीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात कुठे पत्रकारांशी संवाद साधण्याचीही गरज उरली नाही. गडचिरोलीतही, जे मारले गेले ते नक्षलवादी नव्हते हेही धड म्हणता आलं नाही त्यांना. उगाच चार-दोन वर्षांपूर्वीच्या कुठल्याशा प्रकरणात काय घडलं होतं नि कसा अन्याय झाला होता, अशा फालतू गोष्टींचा फाफटपसारा असलेला अहवाल ‘या’ या घटनेच्या संदर्भात सादर करण्यात ताकद खर्ची घातली त्यांनी. ज्यांनी प्रश्नांचा भडिमार केला ते लोक म्हणजे पोलिसांनी ‘पाठविलेले’ लोक ठरवून गावकर्यांच्या भावना पायदळी तुडविण्याचाही प्रयत्न, सत्य शोधण्याचा दावा करणार्या या नक्षल समर्थकांनी परवा केला.
पांढरपेशावर्गातील नक्षल समर्थकांच्या विविधांगी क्लृप्त्यांचे आश्चर्य नाहीच. गेली कित्येक वर्षे हाच धंदा चाललाय् त्यांचा. तो नक्षली चळवळीच्या कार्यपद्धतीचाही एक भाग आहे. चळवळीतील कुणी मेलं की लागलीच पोलिस आणि सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करत धारेवर धरण्याचा. आज इतक्या वर्षांनंतर त्यांनाच आरोपीच्या िंपजर्यात उभे करत धारेवर धरण्याची आदिवासी जनतेने अनुसरलेली तर्हा, हीच परिवर्तनाची नांदी आहे.
No comments:
Post a Comment