भारत सरकारने रमझानच्या पवित्र महिन्यात मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये चाललेल्या लष्करी कारवाईत एकतर्फी शस्त्रसंधी घोषित केली होती. त्यावरून खूप वादविवादही झाले. कारण स्पष्ट आहे, दहशतवादाचा बंदोबस्त करण्यात सेनादल गुंतलेले आहे आणि दहशतवादाला धर्म नसेल, तर त्याविषयीची कारवाई धर्माच्या नावाने थांबवण्याचेही कारण नाही; पण अशा गोष्टी बोलण्यासाठी जितक्या सोप्या व तात्त्विक असतात, तितक्या प्रशासकीय व्यवहारात सोप्या सरळ नसतात. म्हणूनच अनेकदा सरकारी भूमिका दुटप्पीही भासू शकते. सरकारला दहशतवादाचा बंदोबस्त करतानाच आपल्या सामान्य नागरिकांच्या जीवनाचाही विचार करावा लागत असतो. म्हणूनच काश्मिरातील लोकसंख्या मुस्लिमबहुल असेल, तर त्या लोकसंख्येच्या सणावाराचाही विचार करावा लागतो. सगळ्या जनतेच्या जीवनाला रोखून धरता येत नाही. म्हणून असे विचित्र वाटणारे निर्णय घ्यावे लागत असतात; पण त्याचा अर्थ लष्कराच्या तुकड्या शस्त्रे खाली ठेवून गप्प बसत नसतात, की एकतर्फी हल्ला अंगावर घेऊन बळी जात नसतात.
त्याही काळात हल्ला झाला, तर तो परतून लावण्यासाठी शस्त्रे उगारण्याचा अधिकार सरकार वा सेनेने राखून ठेवलेला असतो आणि काश्मिरात त्याचीच तामिली चाललेली आहे. जिथे अशा आगाऊ हल्ल्याची शक्यता असते वा हल्ले होतात, त्याला तिथल्या तिथे चोख उत्तर दिलेही जाते आहे. तसे नसते तर, याही कालखंडात चकमकी झाल्या नसत्या आणि सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या बेछूट गोळीबाराला तडक उत्तर देऊन, त्यांच्या सीमेपलीकडल्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करून टाकल्या नसत्या. भारतीय काश्मिरात अतिरेक्यांवरील कारवाई शिथिल केली, म्हणजे पाकिस्तानातून होणारा गोळीबार वा घुसखोरीला मोकळीक दिलेली नव्हती; पण बहुधा पाक सैन्याला तितकी अक्कल नसावी. म्हणून त्यांनी शस्त्रसंधीचा आडोसा घेऊन भारतीय जवानांवर गोळ्या झाडणे वा रॉकेट हल्ले करणे असला आगाऊपणा केला. त्यात दोन-तीन जवानांसह नागरिकांचा बळी गेल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या तैनात अधिकार्यांनी पाकिस्तानची अजिबात निराशा केली नाही.
यांच्या गोळीबार व रॉकेटला असा जबरदस्त जवाब दिला, की तीन दिवसांत पाकिस्तानी रेंजर्सच्या प्रमुखाला दाती तृण धरून शरणागती पत्करावी लागलेली आहे. तीन दिवस भारताकडून होणारा भडिमार आटोपत नसल्याचे बघितल्यावर, पाक सीमेवर पहारा देणार्या रेंजर्सच्या मुख्याधिकार्याने भारताशी संपर्क साधला. गोळीबार व भडिमार थांबवण्यासाठी गयावया सुरू केल्या. कारण, सीमेपलिकडे असलेल्या पहार्याच्या चौक्याही उद्ध्वस्त झाल्या असून, सीमेलगत वावरणेही पाक रेंजर्सना अशक्यप्राय होऊन गेले आहे. त्याचा इन्कार करून तोंड लपवणेही पाकला शक्य राहिलेले नाही. काश्मिरात घुसवलेले जिहादी आणि चिथावण्या देऊन प्रशिक्षित केलेले इथले स्थनिक दहशतवादी, यांच्या मदतीने भारतीय सीमा व काश्मिरात धुमाकूळ घालण्याची रणनीती पाकिस्तान मागली दोन दशके यशस्वीरीत्या वापरत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय कायदे व राष्ट्रसंघाच्या नियमावलीचा आडोसा घेऊन, पाकिस्तान भारताशी सतत छुपे युद्ध खेळत राहिलेला आहे. त्याचे सर्वात मोठे शस्त्र भारताचा सभ्यपणा हेच राहिलेले आहे, सणासुदीला भारताची भूमिका लवचिक होते आणि त्याच वेळी भारतीय सेनेला गाफील पकडता येते, असा पाकचा अनुभव आहे. म्हणूनच मग रमझानचा पवित्र महिना पुढे करून शस्त्रसंधीच्या मागण्या केल्या जातात. तितकी सवलत मिळाली, मग हल्ले केले जातात. हा आजवरचा प्रघात राहिलेला आहे; पण मागल्या चार वर्षांत मोदी सरकारने आपल्या भूमिकेत आमूलाग्र बदल केलेला आहे, त्यात जशास तसे उत्तर हे सूत्र स्वीकारलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, स्थानिक पातळीवर जिथे तातडी असेल, तर विभागीय अधिकारी परस्पर निर्णय घेत असतात. प्रसंगी सीमारेषा ओलांडूनही पाकप्रदेशात प्रतिहल्ला करण्यापर्यंतही मोकळीक नव्या सरकारने सेनादलाला दिलेली आहे.
त्याच वेळी काश्मिरात आधी दबा धरून बसलेल्यांना हुडकून काढून त्यांचा खात्मा करण्याची मोहीम अखंड राबवली जात आहे. विविध कायदा यंत्रणा व लष्कराचे सुसूत्रीकरण करून स्थानिक प्रसंगानुसार निर्णय होत असतात. साहजिकच, पाकला तडाखा बसलेला आहे. त्यामुळे मग सीमेपलीकडून थेट गोळीबार व रॉकेटचे हल्ले अधूनमधून होत असतात. सर्जिकल स्ट्राईकने त्यांचे धाबे दणाणलेले आहे; पण खुमखुमी कायम आहे. त्यामुळेच मग असे अतिरेकी हल्ले होतात. त्यावर निषेध नोंदवण्याचा परिपाठ भारताने बंद केला असून, गोळीला गोळी व रॉकेटला रॉकेटचे उत्तर दिले जाते आहे; पण गेला आठवडा अखेरीस सीमा सुरक्षा दलाने युद्धसदृश पाऊल उचलले. पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अनेक चौक्या बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करून टाकल्या. त्यात कित्येक रेंजर्स मारले गेले आहेत आणि त्यांचे मृतदेहही हलवण्याची सवड पाकला मिळाली नाही. भारताचा भडिमार इतका भयंकर होता, की सीमेलगत पाक सैनिकांना हिंडणे फिरणेही अशक्य होऊन गेले. पाकने अशी अपेक्षा केलेली नव्हती. म्हणूनच प्रतिहल्ल्याचा इन्कार करण्याचे नाटक सोडून पाक रेंजर्सनी शरणागती पत्करली. भारतीय सैनिकांनी शस्त्रसंधी करण्यासाठी गयावया सुरू झाल्या. मुळातच त्याची काहीही गरज नव्हती. खोडी त्यांनी काढली व भारताने फक्त प्रत्युत्तर दिलेले आहे. तेवढेही सोसण्याची कुवत नसेल, तर उचापती कराव्यात कशाला? पण, म्हणतात ना, ‘कोडग्याला लाज नाही, कालचे बोलणे आज नाही.’ ‘लातों के भूत बातों से नही मानते.
No comments:
Post a Comment