Total Pageviews

Sunday, 6 May 2018

शहरी नक्षल समर्थकांचे मुख्य काम म्हणजे, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचे समर्थन करीत संरक्षण दलांच्या मनोबलाचे खच्चीकरण करणे-


शहरी नक्षल समर्थकांचे मुख्य काम म्हणजे, नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचे समर्थन करीत संरक्षण दलांच्या मनोबलाचे खच्चीकरण करणे. संरक्षण दलांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली की, ही मंडळी टाहो फोडतात. संरक्षण दले ही क्रूर असून, निरागस, निष्पाप अशा नक्षलवाद्यांना ती विनाकारण लक्ष्य करीत आहेत, असा कांगावा सुरू करतात. मग देशभर विविध कार्यक्रम घेत ही मंडळी कंठशोष करत हिंडतात. त्यात त्यांना मदत करतात ती माध्यमांमधील काही मंडळी! मात्र नक्षलवाद्यांकडून होणार्‍या हिंसेविरोधात ही मंडळी चकार शब्दही काढत नाहीत. तेव्हा मात्र यांना मानवाधिकाराचा विसर पडतो आणि ग्लासातल्या चमकदार पेयाचे घुटके घेत, वातानुकूलीत खोल्यांमध्ये बसून क्रांतीची स्वप्नं रंगवण्यात हे रंगून जातात.
शोषितांच्या न्याय्य हक्‍कांसाठी सुरू झालेली नक्षलवादाची चळवळ आज पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. ज्या आदिवासींसाठी ही चळवळ सुरू केली होती, आज त्यांच्याच जीवावर ही मंडळी उठली आहे. आदिवासींच्या समस्या सोडवण्यात प्रशासनही अपयशी ठरले आहे, यात दुमत नाही. तथापि, व्यवस्थेकडून झालेल्या चुका सुधारण्यात येत आहेत. मात्र, नक्षलवाद्यांना नेमके तेच नको आहे. कारण, प्रशासन करत असलेले प्रयत्न यशस्वी झाले, तर ही नक्षलवादाची चळवळ  कालबाह्य होणार आहे आणि या मंडळींना नेमके हेच नको आहे.
दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्राध्यापक महोदयावर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिद्ध होऊन हा पांढरपेशा नक्षलवादी आता आपले उर्वरित आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्नं पाहत घालवत आहे. त्याला शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे, प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला, तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून, तो नक्षलवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिद्ध होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणार्‍या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.
पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्‍तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रिय योगदान हे विचारी जनांना नक्‍कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्‍तीच जर देशविघातक अशा कृत्यांना पाठिंबा देत असेल, तर नक्षलवादविरोधी लढा कितीतरी तीव्र करण्याची वेळ आली आहे, हे एव्हाना लक्षात आलेच असेल. शस्त्रधारी नक्षलवाद्यांसोबतच शहरी भागात राहणार्‍या अशा अनेक पांढरपेशा साईबाबांविरोधात आज उभे राहण्याची वेळ आली आहे; अन्यथा संपूर्ण पिढीच ही मंडळी नासवतील, हे नक्‍की. नक्षलवाद म्हटले की, सर्वसामान्यपणे रेड कॉरिडोरम्हणून संबोधल्या जाणार्‍या पशुपती ते तिरुपती या भागाचा विचार सर्वांच्या मनात येतो. नक्षलवाद साधारणपणे या पट्ट्यात असणार्‍या राज्यांच्या जंगल प्रदेशात फोफावला असल्याचे चित्र आहे. मात्र, हे चित्र अपूर्ण आहे. नक्षलवाद फक्‍त एवढ्याच भागापुरता मर्यादित नाही. नक्षलवादाचे हे अपूर्ण चित्र पूर्ण होते ते शहरी भागात.
विविध पातळ्यांवर आज नक्षलवादी चळवळ काम करते आहे. त्यात त्यांचे वैचारिक पितृत्व येते ते डाव्या पक्षांकडे. त्यानंतर सशस्त्र नक्षलवादी आणि शहरात राहणारे, बुद्धिजीवी म्हणवणारे पांढरपेशे नक्षल समर्थक. सशस्त्र लढा देण्यासाठी देशाची संरक्षण दले ही पुरेशी समर्थ आहेत. मात्र, शहरी नक्षलवादाचा सामना हा समाजातील विचारी आणि संविधान, लोकशाहीवर श्रद्धा असणार्‍या जनांनाच करावयाचा आहे. शहरी नक्षलवाद हा सशस्त्र नक्षलवादाप्रमाणेच गंभीर आहे. किंबहुना, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देणेच आहे.
शहरी भागातील नक्षल समर्थक हे सशस्त्र नक्षलवाद्यांएवढेच धोकादायक आहेत. त्यात प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी कार्यकर्ते आदींचा समावेश प्रामुख्याने होतो. ही मंडळी अगदी तुमच्या-आमच्यासारखीच पांढरपेशी. शिवाय, यांचा व्यवसाय पाहता समाजात यांच्याबद्दल आदराचीच भावना जास्त असते. तेव्हा यांच्याबद्दल साधा संशयही कोणी घेत नाही आणि याचाच फायदा ही नक्षल समर्थक मंडळी घेत असतात. नक्षलवाद्यांच्या फ्रंट संघटना म्हणून ही मंडळी देशविघातक कृत्यांमध्ये भूमिका बजावत असतात.
हिंसक अशा नक्षलवादास नैतिक अधिष्ठान देण्याचे काम या मंडळींकडून होत असते. त्याचप्रमाणे चळवळीस मनुष्यबळ पुरवण्याचेही काम हे करतात. प्राध्यापक मंडळी हे काम अधिक कुशलतेने करतात. कारण, यांचा संपर्क हा तरुण पिढीशी सर्वाधिक असतो. शिवाय, प्राध्यापक असल्याने तरुणांना भावणार्‍या भाषेत ब्रेनवॉशिंग ही मंडळी अगदी सहजतेने करतात. त्यातूनच मग साईबाबासारखा जहाल नक्षलवादी प्राध्यापक तयार होतो. देशभर आज असे अनेक साईबाबा विविध महाविद्यालयांमध्ये आहेत आणि देशविघातक कृत्यांना पाठिंबा देत आहेत, त्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचा पांढरपेशा बुरखा फाडायची वेळ आली आहे.
प्राध्यापकांसोबतच वकील, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, मानवाधिकारवादी अशी अनेक वादीमंडळी शहरी भागात नक्षलवादाचे उदात्तीकरण करत आहेत. ही मंडळी विविध मार्गांनी व्यवस्थेविरोधात चिथावणी देणे, हिंसेचे समर्थन करणे आदी कामे करत असतात. हे करत असताना एक चलाखी ही मंडळी करतात, ती म्हणजे संविधान, लोकशाही, मानवतावाद, मानवाधिकार, शोषितांचा लढा, क्रांती अशा चार-दोन नावांचा सातत्याने जप करणे. यामुळे त्यांची लालकृत्ये झाकली जातात, असा त्यांचा समज असतो. शिवाय, ही मंडळी बर्‍याचदा सरकारी पदांवरही आपली वर्णी लावत असल्याने अनेक गोष्टी त्यांना सुखेनैवपणे करता येणे शक्य होते.
भारतीय संविधानास खरा धोका डाव्या विचारांच्या आड लपून हिंसक नक्षलवादी चळवळ चालविणार्‍या कम्युनिस्टांकडून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कम्युनिस्टांबद्दल अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, कम्युनिस्टांचा संविधानाला विरोध आहे, तो संविधान कामगारांच्या अहिताचे आहे म्हणून नव्हे, तर हे संविधान संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभे आहे म्हणून! कम्युनिस्टांना भारतात प्रोलिट्रिएट लोकांची हुकूमशाही हवी आहे आणि या हुकूमशाहीला अनुसरून त्यांना संविधान हवे आहे. दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, डाव्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत. जेणेकरून ते संसदीय मार्गांनी सत्तेवर येऊ शकले नाहीत, तर या अनिर्बंध हक्‍कांचा वापर करून ते राज्य उलथून टाकू शकतील आणि भारतात हुकूमशाही आणू शकतील. (संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लेखन, खंड - 17, पृष्ठ क्र. 406)
या सर्व प्रकारापासून प्रामुख्याने देशातील तरुणवर्गाने सावध राहण्याची गरज आहे. कारण, कथित डाव्या क्रांतीचा विचार हा प्रत्येकालाच मोहविणारा असतो. मात्र, तो विचार अराजकाशिवाय अन्य काहीही देऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे डोळे आणि कान उघडे ठेवून समाजात वावरणार्‍या पांढरपेशा नक्षल समर्थकांचा संविधानविरोधी डाव उधळून लावण्याची गरज आहे

No comments:

Post a Comment