Total Pageviews

Sunday 13 May 2018

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे,-YAMAJI MALKAR

भारत हा केवळ मागणारा नव्हे तर जगाशी हस्तांदोलन करणारा देश होतो आहे, त्याचा
भारतीय नागरिक म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे. पण त्यासाठी, ‘आपण किती वाईट आहोत’, या टोकाच्या आत्मवंचनेच्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे.
विकसित देशांच्या तुलनेत आपला देश किती मागे आहे आणि आपण कशी त्यांची बरोबरी करू शकत नाही, असे विवेचन करण्याची आपल्या देशातील काही तज्ज्ञांमध्ये स्पर्धा लागलेली असते. पण ही जी टोकाची आत्मवंचना आहे, तिचा सारखा उच्चार करून कोणताच देश किंवा समाज पुढे वाटचाल करू शकत नाही, हे ते लक्षात घेत नाहीत. या चर्चेत आणखी एका बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे आपल्या देशाच्या आकारमानाच्या तुलनेत अधिक असलेली आपली लोकसंख्या. ती आज १३० कोटी इतकी प्रचंड आहे. म्हणजे भारतात प्रति चौरस किलोमीटरला ४५० लोक राहतात. लोकसंख्येच्या इतक्या प्रचंड घनतेची विकसित देश कल्पनाही करू शकत नाहीत.
देशात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वाटप १३० कोटी नागरिकांत करण्यापुरता हा विषय मर्यादित नाही, तर प्रचंड वैविध्य असलेल्या देशाला एका व्यवस्थेत बांधण्याचे आव्हान समोर उभे राहते. साम्यवाद म्हणजे हुकूमशाहीचा पुरस्कार करणाऱ्या चीनला जे जमले नाही, ते लोकशाही शासनप्रणाली मानणाऱ्या भारताने करून दाखवले पाहिजे, असे म्हणणे हा भारतावर अन्याय ठरेल. पण याही स्थितीत या देशाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढ्या सर्व विसंगतीमध्ये नवी आव्हाने पेलण्याचा प्रयत्न हा देश करताना दिसतो आहे. सुदैवाने नियतीने अशी एक परिस्थिती निर्माण केली आहे की तीत या महाकाय देशाची भूमिका वर्तमान आणि भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे.

आता-आतापर्यंत ज्या गोष्टींविषयी आपण आपल्या देशाला दोषच देत आहोत, त्या गोष्टीही पुढील प्रवासात कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे भारतीय शिक्षण. ते किती वाईट आहे, हे आपण दररोज बोलतोच. पण त्याची दुसरी एक बाजू आहे. इंग्रजांनी मूळ भारतीय शिक्षण पद्धती मोडून काढली, पण त्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकले. त्यामुळेच आज या देशात साडेसव्वीस कोटी मुले (अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त साडे सहा कोटी कमी) शालेय शिक्षण घेत आहेत. देशात तब्बल ५१ हजार महाविद्यालये आणि ८०० विद्यापीठे आहेत. त्यात साडेतीन कोटी विद्यार्थी (कॅनडाची एकूण लोकसंख्या) पदवी शिक्षण घेतात आणि दरवर्षी ८० लाख पदवीधारक बाहेर पडतात.(भूतानची एकूण लोकसंख्या) केवळ २४ टक्के मुले पदवीचे शिक्षण घेत असताना दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
याच शिक्षण पद्धतीतून पुढे गेलेले १.८६ लाख भारतीय तरुण आज अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहेत, एवढेच नव्हे तर त्यातील ६० टक्के तरुण हे अमेरिकेतील सर्वात उत्तम शिक्षण संस्थांत प्रवेश मिळवण्यात यशस्वी होतात.अमेरिकेबाहेरील देशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणांची संख्याही जवळपास तेवढीच आहे आणि त्यामुळेच जगात सर्वाधिक रिमिटन्स भारतात येतो. (६५ अब्ज डॉलर) अर्थात, लोकसंख्या आणि शिक्षण घेणाऱ्या तरुणांची प्रचंड संख्या यामुळेच दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार निर्माण झाले पाहिजेत, अशी भारताची अत्यावश्यक गरज निर्माण झाली असून ते तयार होत नसल्याने त्याचे ताण जाणवू लागले आहेत.
गुज्जर, जाट, पाटीदार आणि मराठा आंदोलनाच्या मुळाशी बेरोजगारीचा प्रश्न आहे. बेरोजगारी हाच आपल्या देशाचा सर्वात कळीचा प्रश्न आहे. तो सोडवायचा कसा, यावर देशात सध्या मंथन सुरू आहे. अमेरिकेच्या कोर्न फेरी संस्थेने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात भारताच्या मनुष्यबळाकडे जगाचे लक्ष असेल, असे म्हटले आहे. त्यानुसार २०३० मध्ये भारताकडे २४ कोटी रोजगाराभिमुख अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असेल आणि आशिया पॅसिफिक देशांत (चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, थायलंड) चार कोटी मनुष्यबळाचा तुटवडा असेल. विकसित देशांच्या लोकसंख्या कमी होत असून त्या देशांतही मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होईल आणि भारत हा मनुष्यबळ पुरवणारा एकमेव देश असेल, असे या अहवालात म्हटले आहे.
अर्थात, त्यासाठी त्या प्रकारची कौशल्ये भारतीय तरुणांना आत्मसात करावी लागतील, हे ओघाने आलेच. भारताने लोकसंख्या वाढीचा वेग कमी केला पाहिजे हे सर्वांनाच मान्य आहे; पण त्या दिशेने ठोस काही होत नाही तोपर्यंत वाढीव लोकसंख्येचा बोनस पदरात पाडून घेणे, एवढेच आपल्या हातात राहते. त्यामुळे यापुढील काळात कौशल्य विकासावर भारताला अधिक जोर द्यावा लागणार आहे. सरकारने ही गरज ओळखून या आघाडीवर काम सुरू केले आहे, ही चांगली बाब आहे.
कोर्न फेरी संस्थेने २०३० चा अंदाज दिला आहे. म्हणजे पुढील १२ वर्षांचा अंदाज केला आहे. पण जग ज्या वेगाने बदलते आहे, त्यात असे अंदाज किती खरे ठरू शकतील, हे आज कोणीही सांगू शकत नाही. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगात ज्या वेगाने धुमाकूळ घालते आहे, ते पाहता ही हुशार, अजस्र यंत्रे माणसांना निकामी तर करणार नाहीत ना, अशी सार्थ भीती सध्या व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही लाट भारतही रोखू शकेल, अशी आज स्थिती नाही. पण या संकटाचे निवारण करण्यात भारताला पुढाकार घ्यावा लागेल, एवढे नक्की.
असा पुढाकार घेण्याची निकड असणाऱ्या भारताला त्यासाठी आधी आत्मवंचनेतून बाहेर यावे लागेल. संधी आणि संपत्तीच्या वाटपाची अपरिहार्यता सांगणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाची नव्या परिस्थितीत उकल करावी लागेल. अर्थात, त्यासाठी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विकसित देश देऊ शकतात, या मानसिकतेतून बाहेर यावे लागेल आणि भारतासारखा भारत हा एकमेव देश असल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधण्याचे धाडस करावे लागेल. जगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करून त्यांना नव्या उंचीवर भारतीय घेऊन जातात, तर आपल्या देशातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे धाडस ते दाखवूच शकतात. त्यामुळे ही केवळ कल्पना आहे, असे मानण्याचे कारण नाही.

अनेक भारतीय उद्योगपती अमेरिकन उद्योग ताब्यात घेत आहेत, ओलासारखी भारतीय कंपनी देशाबाहेर सेवा देऊ लागली आहे, टीसीएससारखी कंपनी १०० अब्ज डॉलरचा महत्त्वाचा टप्पा पार करते आहे, अमेरिकेच्या वॉलमार्ट कंपनीला भारतीय फ्लिपकार्ट कंपनी ताब्यात घेऊन स्पर्धेत उतरावे लागते आहे आणि त्यासाठी ती कोट्यवधी रुपये ओतण्यास तयार झाली आहे, हवाई क्षेत्राचे नवनवे उच्चांक भारतात प्रस्थापित होत आहेत, आधारच्या तंत्रज्ञानाची मागणी जगातील ४० देश करू लागले आहेत, जगातील सर्वशक्तिशाली नेत्यांच्या फोर्ब्जच्या यादीत भारताच्या पंतप्रधानांचा समावेश होतो आहे, सौरऊर्जेसंबंधी जागतिक व्यासपीठाचे नेतृत्व भारत करू लागला असून त्याचे जागतिक कार्यालय भारतात सुरू झाले आहे आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे जगातला सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगाशी हस्तांदोलन करावे ही जशी भारताची गरज आहे, तसे भारताशी हस्तांदोलन करावे, ही जगाचीही गरज आहे, असे जे काही होते आहे, त्याचा सार्थ अभिमान एक भारतीय नागरिक म्हणून असलाच पाहिजे.

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तिमत्त्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तिमत्त्व’ विकासातही आपल्यातील विसंगतींचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तिस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना? आपल्या देशाची शक्तिस्थळे जाणून घेऊन पुढे गेले पाहिजे, असे काळ सांगतो आहे. तो आवाज प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाने ऐकलाच पाहिजे

No comments:

Post a Comment