पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती हा नक्कीच मनाला आनंद देणारा सोहळा आहे. मात्र, त्याचबरोबर जिल्हास्तरापर्यंत सक्षम वाचनालये उभी करण्याची गरजदेखील मोठी आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात भिलार नावाचे गाव आहे. जगाच्या नकाशावर भिलार गावाचे एक
वेगळ्या संदर्भात कोरले जाण्याच्या उपक्रमाची वर्षपूर्ती आज भिलारला साजरी केली जाईल. वाचनसंस्कृतीचे पाईक असलेल्या ज्ञानपंढरीच्या वारकर्यांना त्यांचा विठोबा हल्ली भिलारला भेटतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ४ मे २०१७ ला उभारलेले पुस्तकांचे गाव. राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तकाचे गाव उभे राहिले. अनेकांना हा उपक्रम शासकीय आरंभशूरपणाचाच एक कार्यक्रम वाटला होता. मात्र, राज्याच्या सांस्कृतिक खात्याने पुस्तकाच्या गावाची संकल्पना नुसतीच लावून धरली नाही, तर ती यशस्वीपणे रुजवूनही दाखविली. ज्या विचारसरणीच्या मुशीतून तावडे घडले त्या विचारसरणीला साहित्य, कलाप्रकार, वाचनसंस्कृती याच्याशी वावडे असल्याचा कांगावा या क्षेत्रातल्या लब्ध प्रतिष्ठितांकडून नेहमीच केला जातो. मात्र, पुस्तकाचे गाव यशस्वी करून तावडेंनी या सगळ्यांना काहीच न बोलता चोख उत्तर दिले आहे. ही संकल्पना मांडली गेली तेव्हा ‘इथेच पुस्तके मिळत असताना भिलारला कोण जाणार?,’ असे नाक मुरडण्याचे उद्योग केले गेले होते. मात्र, गेल्या वर्षभराच्या काळात या ठिकाणी हजारो वाचनवेड्या रसिकांनी भेटी दिल्या आहेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी ‘हे ऑन वे’च्याधर्तीवर आपण हे गाव साकारत आहोत, हे सुरुवातीलाच सांगितले होते. मात्र, त्यांनी यासाठी जे गाव निवडले त्याला एक स्वत:ची अशी ओळख आहे. वाई ही लक्ष्मणशास्त्री जोशींची कर्मभूमी. विकीपीडिया आणि गुगलचा शोध लागण्यापूर्वी ज्ञानपिपासा बाळगणार्याना विश्वकोषाचा ज्ञानसागर खुला करून देण्याचे काम सातारा जिल्ह्यातल्या या गावात केले गेले. किंबहुना, यामुळेच की काय, पुस्तकाच्या गावाचे हे रोप इथे रुजले आणि आता बहरतानादेखील दिसत आहे. कथा, कादंबर्या, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, प्रवासवर्णनं अशा विविध साहित्य प्रकारातील सुमारे पंधरा हजारांहून अधिक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिथे जा, निवांत पुस्तके चाळा, वाचत बसा कोणत्याही अडथळ्यांशिवाय तासन्तास तुम्ही तिथे पुस्तके वाचत बसू शकता. मुख्य म्हणजे, इथे पुस्तकांची घरे आहेत दुकाने किंवा केंद्रे नाहीत. वाचनसंस्कृती रुजविण्याचे मोठे काम या गावाच्या माध्यमातून सुरू आहे.
मुळात वाचनसंस्कृती हा आपला पिंड नाही. अत्यल्प असा लोकसंख्येचा एक हिस्सा सोडला तर आपल्याकडे पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय दिसत नाही. असली तरी घेतलेली पुस्तके वाचण्याची, त्यांच्या आधारावर संदर्भ शोधण्याची, त्या संदर्भांच्या आधारावर काही तर्क बांधण्याची आपली वृत्ती नाही. ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ असा आपला खाक्या आहे. संदर्भयुक्त पुस्तकांचे वाचन करून आपले मत निर्माण करण्यापेक्षा सांगोवांगीच्या गोष्टी ऐकून त्यात थोडासा आपला रंग मिसळून पुढे सांगण्यातच आपल्याला रस. व्हॉट्सऍपसारख्या माध्यमांच्या वाढत्या वापरानंतर तर विकृतीचा महापूरच आला आहे. जाज्वल्य देशभक्ती आणि वीररसाचा परिपाक असलेले शिवचरित्र मात्र त्याच्या द्वेषमूलक व्हॉट्सऍप आवृत्त्या आज पश्चिम महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वत:च्या तोंडच्या गोष्टी घालून तरुणांची माथी फिरविण्याचे उद्योग करणारे महाभागही आपल्याकडे आहेतच की... महत्त्वाचे म्हणजे, भिलारपासून जेमतेम शंभर-दीडशे किलोमीटरच्या परिघातच ही मंडळी विखुरलेली आहेत. भिलारसारख्या ठिकाणी येऊन यांनी जरा आपले अध्ययन केले तर त्याचा थोडासा उपयोगच होईल आणि भ्रष्ट झालेली मती ताळ्यावर येईल. एका विशिष्ट जातीसमूहाविषयी द्वेषभावना पसरविण्यासाठी केला जात असलेला ऐतिहासिक संदर्भाचा दुरुपयोगही आज महाराष्ट्राची शोकांतिका होऊन बसला आहे.
युरोपमध्ये ज्या दोन घटना वाचनसंस्कृतीच्या उदयाला कारणीभूत ठरल्या त्यात ‘युरोपियन रेनेसान्स’ आणि छपाई यंत्राचा शोध यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या दोन गोष्टी युरोपियन वैचारिक चळवळींच्या केंद्रस्थानी आहेत. ‘रेनेसान्स’मुळे ज्ञानशाखांचा विकास झाला आणि छपाई यंत्रांच्या शोधांमुळे हे ज्ञान पुस्तकांच्या रूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. चर्चच्या अवास्तव हस्तक्षेपाच्या विरोधात युरोपभर अनेक विचारवंत उभे राहिले. आपल्या मूल्यांवर ठाम राहून त्यांनी या वर्षानुवर्षे स्थापित झालेल्या धर्मसत्तांना आव्हान दिले. मूल्यांची रूजवण पुस्तकांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये पोहोचविली. यातील अनेक जण अस्सल मूल्यांचे निर्माते होते असे मुळीच नाही. पण, त्यांच्या पुस्तकांनी, विचारांनी सर्वसामान्यांना लढण्याचे बळ दिले. ज्या प्रमाणात युरोपात वाचनसंस्कृती रुजली, त्या प्रमाणात ती आपल्याकडे रूजली नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. मात्र, भिलारसारख्या उपक्रमातून आशेचा एक किरण दिसतो. सरकारे येतात-जातात, मात्र असे उपक्रम त्यांच्यातील अंगभूत मजकुरामुळे आणि त्याच्या ताकदीमुळे उत्तरोत्तर वाढतच जातात. महाराष्ट्रातले हे पहिले भाजपचे सरकार अर्थोअर्थी पहिलेच! या सरकारच्या उपलब्धींचा पाढा जेव्हा वाचला जाईल, तेव्हा तेव्हा त्यात भिलारचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल. आपले सांस्कृतिक दारिद्र्य दूर करण्यात भिलारसारख्या गावांचा उपयोग निश्चितच आहे. भविष्यात या गावाने एखाद्या उत्तम संदर्भ ग्रंथालयाप्रमाणे आकार घेतला पाहिजे. देशोदेशीच्या ज्ञानवंतांना भिलारचे आकर्षण वाटले पाहिजे. सामाजिक विज्ञान व समाजाचे वर्तनशास्त्र याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. समाजाच्या सामूहिक वर्तनाचे ज्ञान व त्यातले अंदाज वर्तविण्यासाठी सरकारी स्तरावरही अशा खाजगी संस्थांची मागणी आता वाढली आहे. भिलार अशा संशोधनाचे केंद्र होऊ शकते का, याचीही चाचपणी झाली पाहिजे. जो अपेक्षा पूर्ण करू शकतो त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवता येतात, या उक्तीनुसार राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडून अजून काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. पुस्तके ही सरकारी निकडतक्त्यावर नसलेली बाब, ही भिलारमुळे विचारांच्या केंद्रस्थानी आली. वाचन हे केवळ मनोरंजन, विरंगुळ्याचे साधन नसून मूल्यनिर्मिती करण्याची मोठी ताकद असलेले साधन आहे. शंभर वर्षांहून अधिक वयोमान असलेली अनेक वाचनालये महाराष्ट्रभर आहेत. सक्षम जिल्हा वाचनालयाची काही योजना आणि भिलारप्रमाणेच त्याचींच उभारणी करण्याची गरज भिलारच्या वर्षपूर्तीनिमित्त व्यक्त करावीशी वाटते.
No comments:
Post a Comment