हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाबाबत आपण हल्ली काही प्रमाणात का होईना गंभीर बनलो आहोत. ती आपली गरजच आहे. प्रदूषणासारखे विषय किती गंभीर आहेत, याची जाणीव आपल्याला त्यांची तीव्रता वाढल्यानंतरच कळते. त्यामुळेच हवा आणि पाण्याव्यतिरिक्त अन्य घटकांचेही प्रदूषण सुरू आहे, हे अद्याप आपल्या गावीही नाही. यातील प्रमुख घटक आहे तो म्हणजे माती. होय, आपली मातीच प्रदूषित होत चालली असून, याबाबत आपल्याला पूर्वीपासून इशारेही मिळत आहेत; परंतु अद्याप जगाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. आता मात्र या प्रदूषणाने चांगलेच डोके वर काढले असून, माती दूषित झाल्यामुळे मानवाच्या आणि जनावरांच्या आरोग्याला गंभीर धोका उत्पन्न झाला आहे, असा अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) दिला आहे. याच संस्थेने यापूर्वीही तसा अहवाल दिला होता आणि जगाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु जगातील बहुतांश देशांचे या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीच्या अहवालात 2011 मध्येच एफएओने असे म्हटले होते की, जगातील जमिनीचे आरोग्य 25 टक्के बिघडले असून, भारतात लागवडीखाली असलेली तब्बल 42 टक्के जमीन त्याच वेळी प्रदूषित झाली होती. असा इशारा देणारी ‘एफएओ’ ही एकमेव संस्था नव्हे. ‘इस्रो’नेदेखील यापूर्वी असा इशारा दिला असून, मातीची सुपीकता घटत चालल्याचे नमूद केले आहे. दुर्दैवाने, मातीच्या प्रदूषणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक खूपच वरचा आहे. मातीतील सूक्ष्म जैविक घटकांच्या आधारेच शेती पिकते. त्यामुळे आपल्याला अन्न मिळण्याच्या दृष्टीने माती हा अत्यंत मूलभूत असा नैसर्गिक घटक आहे.
दुसरीकडे जगाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न संशोधकांना महत्त्वाचा वाटत असून, भविष्यातील लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळेल की नाही, अशी शंका आहे. आजच अन्नधान्याची जागतिक मागणी लक्षात घेता, सध्याच्या कृषी क्षेत्राव्यतिरिक्त 60 लाख हेक्टर अधिकचे क्षेत्र लागवडीखाली आणावे लागणार आहे; परंतु नेमके उलटे होत असून, जमीन वापरात वेगाने बदल होऊन कृषी क्षेत्र घटत चालले आहे. विकास या एकाच शब्दाचा आडोसा घेऊन आपणच आपल्या पोटाचे भवितव्य अंधकारमय करीत आहोत. उद्योग, रस्ते, धरणे यांसाठी बरेच कृषी क्षेत्र उपयोगात आणले गेले आहे आणि भविष्यात हेच घडत राहणार आहे, असे दिसते. त्यातही आता लागवडयोग्य जमीन जर प्रदूषित होत चालली असेल, तर या विकासाला काय अर्थ राहील? मातीच्या प्रदूषणाची कारणेही जगाला माहीत आहेत; पण तिकडे लक्ष दिले जात नाही. शेतीत सेंद्रिय खतांचा वापर घटून रासायनिक खतांचा अतोनात वापर होणे, नगदी पिकांसाठी जमीन भिजवून ठेवणे, जमिनीला विश्रांती न देता एकापाठोपाठ एक पिके घेत राहणे, पीक पद्धतीत फेरपालट न करणे, तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर, कीटकनाशकांचा मारा ही शेतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली मातीच्या प्रदूषणाची कारणे होत. याखेरीज वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे नवी आव्हाने समोर उभी ठाकली आहेत.
आपल्याकडे मातीचे परीक्षण करून शेतकर्यांना मातीच्या आरोग्याचे एक कार्ड दिले जात आहे; परंतु प्रगती पुस्तकात अधोगती दिसत असेल आणि त्यावर उपाययोजनाच केल्या जात नसतील, तर प्रगती पुस्तक देण्याचा उपयोग काय? आरोग्य बिघडलेल्या मातीतून मानवी आरोग्याला पोषक अन्नपदार्थ उत्पादित होऊ शकतील का? मातीच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम दिसून येण्यास सुरुवातही झाली आहे. पाणी भरून ठेवल्यामुळे जमिनी एकदा क्षारपड झाल्या की, पुन्हा त्यावर कुसळही उगवत नाही. त्यामुळे मातीचे आरोग्य जपायचेच असेल, तर रासायनिक घटकांचा मारा कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, शाश्वत पीक पद्धतीचा उपयोग करणे यांसारखे उपाय योजावे लागणार आहेत. याखेरीज पिकाच्या काढणीनंतर उरलेले अवशेष जमिनीत कुजवावे लागतील. आपल्याकडे शेतकर्यांना केवळ पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, एवढेच मार्गदर्शन केले जात असून, शाश्वत पीक पद्धतीचे मार्गदर्शन अभावानेच केले जात आहे.
मातीच्या प्रदूषणाबाबत त्यांचे प्रबोधनही झालेले नाही. त्यामुळे मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी एक मोठा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार असून, सरकारला तो प्रत्येक शेतकर्यापर्यंत पोहोचवावाच लागणार आहे; अन्यथा मातीचे प्रदूषण वाढत जाऊन जमिनीची उत्पादकता हळूहळू अशीच कमी होत जाईल.
मातीला आर्द्रतेचा पुरवठा झाल्यानंतर ती शेतीसाठी, फळबागा फुलवण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. प्रत्येक भागात असणार्या पावसाचे प्रमाण आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता याही घटकांचा परिणाम मातीवर होत असतो. या सर्व नैसर्गिक कारणांचा विचार करून शेतीविषयक आणि अन्नसुरक्षाविषयक समग्र धोरण जागतिक स्तरावरच खरे तर आखले गेले पाहिजेत; परंतु तसे घडताना दिसत नाही. मातीचे होत असलेले प्रदूषण दुर्लक्षित केले जात आहे, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.
रासायनिक घटक शेतीबरोबरच उद्योगांमध्येही वापरले जातात. हे घटक आणि इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळून तिची उत्पादकता कमी करतात. शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा या रसायनांमुळे नाश होतो. तसेच हे रासायनिक घटक पिकांमध्येही उतरतात आणि मानवी आरोग्याला अपायकारक ठरतात. कीटकनाशकातील सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड ही रसायने जमिनीत मिसळल्यास जमिनीतून दुर्गंधी येते. त्यामुळेच रसायनांचा अतिरेक सर्वच पातळ्यांवर टाळायला हवा. पिकांच्या सिंचन पद्धतीत आणि पीक पद्धतीत नैसर्गिक घटकांना अनुसरून बदल करायला हवेत.
जमिनीत पाणी भरून ठेवल्यास तिच्या खालच्या थरातील क्षार वरच्या थरात येतात आणि तिथेच साठून राहतात. त्यामुळे जमीन क्षारपड, नापीक आणि कडक बनते. त्यामुळेच पिकांना योग्य तेवढेच पाणी दिले पाहिजे. नांगरणी, कोळपणी, पेरणी, खुरपणी या सर्व प्रक्रिया जमिनीच्या प्रकारानुसारच केल्या पाहिजेत; अन्यथा जमिनीतील सुपीक द्रव्ये वाहून जाण्याचा धोका असतो. जमिनीची धूप थांबविणेही अग्रक्रमाचे आहे. औद्योगिकीकरणाचे दुष्परिणामही रोखायलाच हवेत. तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली जंंगलतोड रोखण्यासाठी कडक उपाय योजणे गरजेचे आहे. वेळ निघून जाण्याच्या आत या गोष्टी केल्या नाहीत, तर भविष्यात माती आपल्याला माफ करणार नाही.
No comments:
Post a Comment