Total Pageviews

Saturday, 12 May 2018

आयआयटी मुंबईतील एका चमूने नुकतीच सौर चूल तयार केली आहे. यानिमित्ताने सौरउर्जेतील संशोधन, वापर आणि भविष्य याचा वेध घेणारा लेख...

सूर्य रोज पृथ्वीवर प्रकाशाची उधळण करतो. कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतच्या टापूत म्हणजेच उष्ण कटिबंधात तर तो सौरउर्जेचे घडेच्या घडे रिते करतो. आणि तरीही त्या प्रदेशातल्या अनेक राष्ट्रांतल्या नागरिकांना अद्याप उर्जेचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्या समस्येवर तोडगा शोधायला आंतरराष्ट्रीय करारही होत आहेत. पण देशात सौरउर्जेचा वापर कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जे फुकट मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते. ते आपण वाया जाऊ देत असतो. ज्याचं मोल मोजावं लागतं, ते मात्र जपून जपून वापरत असतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सौरउर्जा. तळपत्या सूर्याची ही ऊर्जा वापरून आपण आपल्या देशाची वीजेची गरज भागवू शकतो. हे सर्व स्तरावर मान्य झाले आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र आजही ते प्रयत्न तोकडे पडत आहेत. याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे असतीलही; पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन या क्षेत्रात अनेकजण संशोधन आणि विकास करत आहेत. यामुळेच आज शहरात याचा जोरात वापर होऊ लागला आहे. 

आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी नुकतीच सौरचुलीची निर्मिती केली आहे. त्यांचा हा प्रयोग इतका उपयुक्त ठरला, की देशभरातील १५०० प्रयोगांमधून त्यांनी ओएनजीसीची स्पर्धा जिंकली आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. देशात सौर उर्जेचा वापर करून गावगावातील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास सोळंकी यांनी घेतला. पीएचडी करत असताना त्यांनी सौर उर्जा साठवून ठेवणाऱ्या उपकरणाच्या निर्मितीसाठी ते संशोधन करत होते. याचा वापर करून त्यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौर दिवे वाटलेत. इतकेच नव्हे तर तेथील सुमारे तीन हजार महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना सौरदिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तेच विकून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे सर्व करत असताना त्यांचे लक्ष सौरचुलीकडे वेधले गेले. सौरचूल तशी नवीन नाही. देशात बऱ्याच वर्षांपासून अशा सौरचुली आहेत. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या सौरचुली म्हणजेच सोलर कुकर हे अन्न शिजवण्यासाठी बाहेर उन्हात नेऊन ठेवाव्या लागतात. म्हणजे जेव्हा ऊन नसेल तेव्हा या चुलींचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. मग सोळंकी यांनी यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पूर्वीच्या संशोधनाला जोडून त्यांनी नवीन सौरचुलीची निर्मिती केली.



ही सौरचूल म्हणजे एखाद्या इंडक्शन कूकरसारखीच दिसते. यामध्ये बॅटरी लावण्यात आली आहे. दिवसभर साचणारी सौरउर्जा या बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते. त्याद्वारे यावर रात्री स्वयंपाक करणेही शक्य होते. हे संशोधन पूर्ण होत असतानाच 'ओएनजीसी'ने स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेत अशी चूल द्यायची होती, की ज्याचा वापर एलपीजी चुलीप्रमाणेच होईल. दिवसातील कोणत्याही वेळात ती वापरता यायला हवी तसेच अन्न शिजवण्याचा वेगही सामान्य चुलीप्रमाणेच असायला हवा. या सर्व अटींची या सौरचुलीत पूर्तता होणे शक्य होते. यामुळे त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १५०० स्पर्धकांतून निवडलेल्या अंतिम सहा स्पर्धकांच्या प्रयोगांमध्ये या प्रयोगाचा समावेश झाला आणि दिल्लीत दोन दिवस सोळंकी आणि त्यांच्या चमूने दिलेल्या वेळेत दिलेले शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न शिजवून दाखवले. यामुळे सोळंकी यांनी तयार केलेल्या या सौरचुलीची प्रथम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये तयार होणारी ही सौरचूल वर्षभरातील १५ एलपीजी गॅस वाचवू शकते. तसेच यासाठी येणारा खर्चही कमी आहे. ही सौरचूल आवश्यकतेनुसार तयार करून दिली जात असल्यामुळे ती दोन हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे. भविष्यात गावागावात ही चूल देऊन आजही जेवण तयार करण्यासाठी सुरू असलेला लाकूड, कोळशाचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा मानस असल्याचे सोळंकी सांगतात. सौरदिव्यांप्रमाणेच सौरचुली तयार करण्याचे प्रशिक्षण गावागावांतील महिलांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सोळंकी यांचा मानस आहे. 

शहरातील सौर प्रयोग 

कुर्ला पश्चिम येथील प्रीमिअर रेसिडन्सेस डी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ५० किलोवॅटचा (३० आणि २० किलोवॅट्स असे प्रत्येकी एक) सौरउर्जा प्रकल्प तीन महिन्यांपूर्वीच कार्यान्वित केला आहे. सोसायटीतील बहुतांश रहिवाशांनी त्याला संमती दिली. सोसायटीमध्ये दोन लिफ्ट, सहा मोटर पंप, २०० ट्यूबलाइट्सचा वापर व्हायचा. त्यामुळे दर महिना सोसायटीला ७० हजार ते १ लाख रुपये वीजबिलापोटी भरावे लागत. आता सोसायटीचे वीजबिल जवळपास शून्य झाले आहे. सौरउर्जा प्रकल्पासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च आला. त्यापैकी १० लाख रुपये सरकारी अनुदान (सबसिडी) वजा जाता २० लाख रुपये सोसायटीने खर्च केले. 'सोसायटीच्या गच्चीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. महिन्यातून एकदा त्याची साफसफाई केली जाते. तेव्हाही शटडाऊन वगैरे काही करावे लागत नाही. वीजबिलापोटी वाचणारी रक्कम लक्षात घेता साधारणपणे दीड वर्षातच आम्ही प्रकल्पासाठी केलेला खर्च वसूल होईल', अशी माहिती सोसायटीचे सचिव मकबूल चौगुले यांनी दिली. हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना अक्षय बोरकर या तरुणाने मदत केली. 

शैक्षणिक संस्थाही आघाडीवर 

काही शैक्षणिक संस्थांनीही सौरउर्जेचा वापर सुरू केला आहे. शहापूरच्या शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटीच्या ३० एकर कॅम्पसमध्ये सौरउर्जा प्रकल्प पाच वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला आहे. या कॅम्पसमध्ये एकूण सात कॉलेजे आहेत. पाच वर्षांपूर्वी कॉलेजचा एकूण वीजवापर लक्षात घेता, तेव्हा दरमहिना साधारण तीन लाख रुपये वीजबिल येत होते. हे बिल सुमारे पाच लाखांवर गेले असते. त्यावेळी कॉलेजच्या संचालकांनी पुढाकार घेऊन सौरउर्जा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाची क्षमता १४० किलोवॅट (ऑफ ग्रीड) आहे. त्यानंतर काही दिवसांनी २५ किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड प्रकल्प सुरू करण्यात आला. तर, २०१६ मध्ये कॉलेजने ७२ किलोवॅट ऑनग्रीड सिस्टिम सुरू केली. या प्रकल्पातून जेवढी वीजनिर्मिती होते तिचा वापर कॅम्पसमध्ये तर केला जातोच. शिवाय, अतिरिक्त वीजही निर्माण होते. दर महिन्याला साधारणपणे २५ हजार युनिट्स विजचे उत्पादन होते. दिवसभराची विजेची गरज भागल्यावर रात्रीच्या वेळी कॉलेजला सुमारे दर महिना चार हजार युनिट्सची गरज भासते. ती विद्युत मंडळाकडून वीज घेऊन पूर्ण केली जाते. दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त वीज विद्युत मंडळाला देऊन केवळ उरलेल्या सुमारे २५०० ते ३००० युनिट्ससाठी कॉलेजला वीजबिलापोटी पैसे भरावे लागतात. सोनारपाडा येथील शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्येही ७० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प अलीकडेच कार्यान्वित करण्यात आला आहे. 

पर्यावरण वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्या देशाचे मौल्यवान परकीय चलन तेल आयात करण्यासाठी खर्च होते. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आपल्याकडून एक छोटा प्रयत्न म्हणून कॉलेजमध्ये हा सौरउर्जा प्रकल्प आम्ही पाच वर्षांपूर्वीच कार्यान्वित केला. सौरउर्जेमुळे हा खर्च दर महिना केवळ ७० हजार रुपये इतका होतो आहे. 

- हर्ष जोंधळे, संचालक, शिवाजीराव जोंधळे नॉलेजसिटी, शहापूर 

आज आपल्या देशात जे संशोधन सुरू आहे ते अद्याप कमी आहे. आपल्या देशात सौरउर्जा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक ते संशोधन झालेले नाही. जगभरात फोटोव्होल्टीक'वर संशोधन सुरू आहे. त्यानुसार भारतातही तसेच संशोधन सुरू आहे. प्रत्यक्षात धोरणात्मक बदल होऊन एकाग्रीत सौरउर्जेवर संशोधन होणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment