‘अगर फिरदौस बर रु-ए-जमीन अस्त, हामी अस्त, ओ-हामी अस्त, ओ-हामी अस्त’ असे उद्गार बादशाह जहाँगीरने काढले होते. त्याचा अर्थ ‘पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे’! आज याच स्वर्गाचे नरक बनवण्याचा नापाक उद्योग दहशतवाद्यांकडून सुरू आहे. त्याला अर्थातच पाकिस्तानचे पाठबळ आहे. बुरहान वानीचा खात्मा केल्यापासून काश्मीर खोर्यात दगडफेकीचा प्रकार जोरात सुरू झाला आणि अद्यापही तो सुरू आहे. अर्थात, एनआयएने दगडफेक्यांना आर्थिक मदत करणार्या फुटीरतावाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर तसेच अनेक दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारल्यानंतर या प्रकारात थोडी घट आली असली, तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. ही दगडफेक केवळ भारतीय लष्कर किंवा पोलिसांवरच होते, असे नाही. काही दिवसांपूर्वी शाळेला जात असलेल्या चिमुरड्या काश्मिरी मुलांच्या बसवर असा हल्ला झाला होता. आता अशाच हल्ल्यात चेन्नईमधून आलेल्या एका तरुण पर्यटकाचा मृत्यू झाला. यानंतर वेळोवेळी दगडफेक्यांची पाठराखण करणार्या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीही भडकल्या आहेत. दगडफेक्यांना कोणताही धर्म नाही, पाहुण्यांवर असा हल्ला करणे, ही काश्मीरची संस्कृती नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत आणि एकंदरीतच काश्मीर खोर्यातील स्थितीबाबत त्यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. यामधून ठोस काही तरी बाहेर पडेल, अशीच अपेक्षा केली जात आहे.
दहशतवादी, कट्टरपंथी हे नेहमीच धर्माच्या नावाखाली अधर्म करीत असतात, हे यापूर्वी पाकिस्तानातही वेळोवेळी दिसून आलेले आहे. पेशावरमध्ये शंभरावर शाळकरी मुलांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केल्यावर हे धर्मांध लोक अशा कृत्यांनी कोणता स्वर्ग मिळवू पाहत आहेत, असा प्रश्न जगभरातील लोकांना पडला! दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात एका स्कूलबसवर झालेली दगडफेकही असाच प्रश्न निर्माण करणारी आहे. काश्मीरची आभासी ‘आझादी’ किंवा धर्माच्या नावाखाली तिथे जे प्रकार सुरू आहेत, ते किती तकलादू आहेत, हे या घटनेवरून काश्मिरी जनतेच्याही लक्षात आले असावे. या प्रकारचा मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यापासून ते सर्वसामान्य काश्मिरी पालकांपर्यंत सर्वांनीच निषेध केला. ही घटना ताजी असतानाच आता ‘कश्मिरीयत’ला कलंक लावणारी आणखी एक घटना घडली. चेन्नईमधून आपल्या कुटुंबीयांसह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या आर. थिरुमनी या 22 वर्षांच्या तरुणाचा दगडफेकीत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मुफ्ती यांनी ही घटना म्हणजे ‘मानवतेची हत्या’ आहे, असे म्हटले असले, तरी आता अशा घटना थांबवण्यासाठी त्या किती निर्धाराने काम करतात, हेच अधिक महत्त्वाचे आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या मतदारसंघातच ही घटना घडली आहे. ओमर यांनीही या घटनेचा निषेध केला असला, तरी दगडफेक्यांचा खेळखंडोबा थांबवण्यासाठी ते सरकारच्या किती पाठीशी उभे राहतात, यावरून त्यांच्या (आणि त्यांचे तीर्थरूप फारुख अब्दुल्ला यांच्या) मनात किती खरी कळकळ आहे, हे दिसून येईल. पाकधार्जिण्या हुर्रियत कॉन्फरन्सच्या फुटीरतावाद्यांनी पैसा, अमली पदार्थ किंवा अन्य आमिषे दाखवून, कधी धाकदपटशाने तर कधी धर्माची भीड घालून अनेक तरुणांची माथी भडकवली आहेत. या तरुणांनी दगडफेक करून लष्करी कारवायांमध्येही अडचणी आणल्या होत्या. आपल्या लष्कराला व पोलिसांना समोरून दहशतवाद्यांच्या गोळ्या आणि पाठीमागून या माथेफिरू तरुणांच्या दगडांचा सामना करत कर्तव्य बजावावे लागते. दगडफेकीचा अक्षरशः ‘धंदा’ झाल्यावर एनआयएने फुटीरतावाद्यांवर छापे घालून त्यांची रसद बंद केली. मात्र, आता दया, सहानुभूती न दाखवता या दगडफेक करणार्यांच्याही मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘आपलेच आहेत’ किंवा ‘मतदार आहेत’ अशा कारणावरून तेथील राजकीय नेत्यांनीही त्यांची गय करता कामा नये, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मेहबुबा यांनी नुसती पोकळ वक्तव्ये करून भागणारे नाही! दहशतवादी आणि फुुटीरतावाद्यांबाबत जे कडक धोरण अवलंबले आहे, तसेच आता या दगडफेक करणार्या माथेफिरूंबाबतही अवलंबणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment