Total Pageviews

Sunday 6 May 2018

जिनांचे छायाचित्र हवेच कशाला ? महा एमटीबी

अखंड भारताची फाळणी करून पाकिस्तान नावाचा अनैसर्गिक आणि कुरापतखोर देश जन्माला घालणार्‍या मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र लावण्यावरून अलीगढ मुस्लीम विद्यापीठात मोठा गदारोळ उडाल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून दिसते. ज्या जिनांनी भारताची फाळणी व्हावी म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले, ज्यांनी सदैव भारतविरोधी भूमिका घेतली, अखंड भारतविरोधी कारवायांना बळ दिले, ज्या व्यक्तीमुळे लाखो लोकांच्या कत्तली झाल्या, हजारो मुली-महिलांवर अत्याचार-बलात्कार झाले त्या व्यक्तीचे छायाचित्र भारतातल्या एखाद्या विद्यापीठात लावणे हे जितके दुर्दैवी आणि लाजिरवाणे तितकेच कोणत्याही राष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात नेणारे. जिनांच्या छायाचित्राला विरोध करणार्‍या राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचाही हाच सवाल आहे की, मोहम्मद अली जिनांचे भारताच्या उभारणीतले योगदान ते काय? तर काहीच नाही. उलट धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे तुकडे करून उत्तर आणि पश्‍चिम सीमेवर कायमची डोकेदुखी निर्माण करणारी व्यक्ती म्हणूनच त्यांचे नाव घेतले जाते. ‘अशा व्यक्तीचे छायाचित्र तिथे असलेच पाहिजे’चा हट्ट करण्याची कोणाची हिंमत तरी कशी होते? जिनांच्या छायाचित्राचे समर्थन करणार्‍या विद्यार्थी संघाचे तर असेही म्हणणे आहे की, त्यांचे छायाचित्र 1938 साली विद्यापीठात लावले गेले, त्यामुळे ते इतिहासाचा भाग आहे म्हणून आम्ही ते छायाचित्र तिथून हटवणार नाही. खरे तर हे म्हणणे मूर्खपणाच्या सदरात मोडणारेच म्हटले पाहिजे. कारण, एकदा देश स्वतंत्र झाल्यानंतर, पाकिस्तानने जिनांना आपला जन्मदाता म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचा भारताशी काय आणि कोणता संबंध राहतो? कसलाच नाही आणि असला तरी कायम भारताचा, भारतीय राष्ट्रपुरुषांचा दुःस्वास, द्वेष करणारी व्यक्ती म्हणूनच. अशा व्यक्तीच्या समर्थनात कोणाला प्रेमाचे भरते येत असेल तर त्यांनाही जिनांच्या मांदियाळीतलेच म्हणावे लागेल. जिनांच्या छायाचित्रावर अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रशासनाचा दावा तर अजबच आहे. जिनांचे छायाचित्र विद्यार्थी संघाने त्यांच्या विभागात लावले असून ते आमच्या अधिकारकक्षेत येत नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. हा जिनांच्या छायाचित्राचा तांत्रिक गोष्टींआड दडून समर्थन करण्याचाच प्रकार. हा प्रकार जेवढ्या लवकर थांबेल तेवढे देशाच्या शैक्षणिक, सामाजिक सौहार्दासाठी उत्तम ठरेल; अन्यथा हा वाद आणखीनच चिघळेल.
 
00000000000000

 
... ही तर देशविरोधी कारवाई !
मोहम्मद अली जिना यांचा अलीगढ मुस्लीम विद्यापीठाशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले जाते. जिनांनी ना कधी त्या विद्यापीठात विद्यार्थी म्हणून पाऊल ठेवले ना कधी शिक्षक म्हणून. त्यामुळे तिथे त्यांचे छायाचित्र लावणे हे संतापजनकच. परंतु, ज्यांनी आपले मन आणि बुद्धीही देशविरोधकांकडे गहाण ठेवली आहे, त्यांना हे समजणार नाहीच. त्यांच्या तोंडून जिनांच्या कौतुकाचे शब्द बाहेर पडतच राहतील. पण, सर्वसामान्य राष्ट्रवादी आणि देशप्रेमी नागिरकांच्या हृदयात जिनांबद्दल कधीही आत्मीयतेचा लवलेशही निर्माण होऊ शकणार नाही. त्यांना सदैव देशाचे विभाजन करणारा खलनायक म्हणूनच घेतले जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जिनांच्या छायाचित्रावर प्रतिक्रिया देत, “ज्या व्यक्तीने देशाचे विभाजन केले, त्याची प्रशंसा कशी काय केली जाऊ शकते?” असा सवाल विचारला. भारतात जिनांचा गौरव मुळीच सहन केला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले. त्यांचे हे उद्‍गार राष्ट्रवादी विचाराला अनुसरूनच. दुसरीकडे जिनांचे छायाचित्र ज्या विद्यापीठात लावले गेले ते ठिकाण आणि त्याचे कार्यक्षेत्र भारतातच आहे. तिथली व्यवस्था, रचना आणि नियम, सर्वच भारतीय राज्य घटनेंतर्गतच येते. असे असतानाही विद्यापीठात जिनांचे छायाचित्र लावले जात असेल तर ते नक्कीच घटनाविरोधी कृत्य ठरले पाहिजे. शिवाय मोहम्मद अली जिना हे कधीही भारताचे राष्ट्रपुरुष नव्हते, त्यामुळे विद्यापीठासारख्या सार्वजनिक ठिकाणी त्यांचे छायाचित्र लावण्याचा प्रकार हा देशविरोधी कारवाई म्हणूनच समजला पाहिजे. गेल्या काही काळापासून देशातल्या विद्यापीठे, शिक्षणसंस्थांतील वातावरण बिघडत असून शैक्षणिक कार्याव्यतिरिक्तचे उद्योग अधिकच फोफावल्याचे चित्र दिसते. दिल्लीच्या जेएनयुपासून पश्‍चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ आणि आता अलीगढ मुस्लीम विद्यापीठ, या सर्वच ठिकाणी कोणत्या ना कोणत्या घटनेवरून वाद उफाळल्याचे आपण पाहिले. बहुतेकवेळा हे प्रसंग देशविरोधी घटना, घोषणांचे समर्थन करणारे आणि राष्ट्रवादी विचारांचा पराकोटीचा द्वेष करणारेच होते. सोबतच या सर्व ठिकाणी राजकीय पातळीवरही हस्तक्षेप केला गेला, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तुणतुणे वाजवत आम्ही देशविरोधी वागलो तरी तो आमचा हक्कच असल्याचेही या लोकांनी सांगितले. अलीगढ विद्यापीठातही तोच प्रकार होत आहे. पण आता राज्य सरकारनेच हा प्रकार तातडीने प्रसंगी पोलिसी कारवाईच्या बळावर थांबविण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment