आजकाल सातत्याने रस्ता अपघाताच्या बातम्या कानावर पडतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांमध्ये युवावर्गाचं प्रमाण अधिक आहे. एकूण आकडेवारीचा विचार केल्यास मानवी चुकांमुळे होणा-या अपघातांचं प्रमाण लक्षणीय आहे. रस्ता सुरक्षेच्या नियमांबद्दल असलेलं अज्ञान अशा अपघातांना कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं. या पार्श्वभूमीवर सक्षम यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत.
हल्ली वर्तमानपत्र उघडल्यानंतर पहिल्या पानावर अपघाताची एक तरी बातमी असतेच. आपण बातमी वाचतो आणि पान उलटतो. पण अपघात इतरांबाबत होतात तसे आपल्याबाबतही घडू शकतातच हे सोयीस्कररीत्या विसरून गाडी चालवतो. आजकाल वाहन घेऊन घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईपर्यंत घरच्यांच्या जीवात जीव नसतो. असं का होतं? रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण याला कारणीभूत आहे. रस्त्यावरील अपघात आणि त्यामुळे होणा-या मृत्यूचं प्रमाण हे चिंताजनक आहेच. याशिवाय प्रत्येकाला आपल्या अंतर्मनात डोकावून पाहायला लावणारं ही आहे. सुरक्षित प्रवास ही प्रशासन आणि चालक या दोघांचीही जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केवळ एक सप्ताह राबवणं म्हणजे कर्तव्यपूर्ती नव्हे. नियमांचे पालन ही बाब अंगवळणी पडण्यासाठी केलेले प्रयत्न सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहेत. अपघातामुळे होणा-या मृत्यूंसाठी रस्त्यांची बांधणी, बेजबाबदार ड्रायिव्हग ज्या प्रमाणात जबाबदार आहे, त्याच प्रमाणात नियमांविषयी असलेली अनभिज्ञताही आहे. अपघातानंतर मदत मिळण्यास झालेला उशीर हा देखील अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतोय. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे नको म्हणून अनेकजण अपघातग्रस्तांना मदत करण्याचं टाळतात. पण मदतकर्त्यांना कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठी शासनाने विशेष तरतुदीही केल्या आहेत. पण या नियमावलींची माहितीही बहुतेकांना नसते.
यामुळेच केवळ योग्यवेळी मदत न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणं आहेत. या नियमावलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणं गरजेचं आहे. रस्ता सुरक्षा हा विषय केवळ नियमांपुरता मर्यादित न ठेवता, विशिष्ट उपाययोजनांच्या मार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. देशात २०१६ मध्ये रस्ते अपघातांची संख्या घटल्याचं मात्र अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढल्याचं निदर्शनास आलं होतं. २०१७ मध्ये या परिस्थितीत फार सुधारणा झाल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे आजही देशातील रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण रोखण्याचं आव्हान कायम आहे. देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक मरण पावतात, तर जखमींची संख्या पाच लाखांहून अधिक असते. यावरून देशात रस्ते अपघातांचं प्रमाण किती मोठं आहे, याची कल्पना येते. अशा स्थितीत २०१९ पर्यंत देशातील अपघातांचं प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तसं झाल्यास देशातील रस्ते अपघात रोखण्यासंदर्भात तो मोठा दिलासा ठरेल. मात्र, रस्ते अपघातांची संख्या इतक्या प्रमाणात एकदम कमी होणार का, हा प्रश्न आहे. देशात वर्षभरात कुठं ना कुठं अपघातांच्या अनेक घटना समोर येतात. मात्र, सर्वसाधारपणे रस्ते अपघातांचं प्रमाण उन्हाळ्यात तसंच पावसाळ्यात अधिक राहत असल्याचं आढळतं. साहजिक यामागील कारणं लक्षात घ्यायला हवीत. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात निसरडय़ा रस्त्यांवरून वाहन घसरल्यानं तसंच जोरदार पावसामुळे समोरचं काही दिसत नसल्यानं वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होतात. तर उन्हाळ्यात लग्नसराई वा पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणा-यांची संख्या मोठी असते. अशा स्थितीत अपघातांची शक्यता वाढते.
गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी लग्नासाठी जाणा-या मंडळींच्या टेम्पोला, ट्रकला अपघात झाल्याच्या काही घटना समोर आल्या. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याही गाडीला नुकताच लोणावळ्याजवळ अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातातून दोघेही बचावले. वाहनातून मोठय़ा अंतराचा प्रवास करताना सुरक्षेचा फारसा विचार केला जात नाही. देशात विविध रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे सर्वाधिक बळी जात असल्याचं आकडेवारी सांगते. त्यापाठोपाठ चार चाकी तसंच हलक्या वाहनचालकांचा समावेश होतो. शिवाय देशातील रस्ते अपघात पादचारी मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही लक्षात घेण्यासारखं आहे. भरधाव वेगानं वाहन चालवणं हे अपघातामागील महत्त्वाचं कारण राहिलं आहे. २०१६ मधील आकडेवारीनुसार वाहनांच्या भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात तब्बल ७३ हजार ८९६ जणांना प्राण गमवावे लागले. अलीकडच्या काळात वाहन चालवताना मोबाईल वापराचं प्रमाण बरंच वाढलं आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरल्यानं झालेल्या अपघातांमध्ये २०१६ या वर्षात दोन हजाराहून अधिक जणांचा बळी गेला. खरं तर वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. शिवाय कोणी वाहन चालवताना मोबाईल वापरत असल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तरीही वाहन चालवताना मोबाईल वापरण्याच्या बेपर्वा वृत्तीला आळा घालणं शक्य झालेलं नाही.
अपघातानंतर जखमी व्यक्तीला अनेकदा मोठय़ा आíथक नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातग्रस्तांना मिळणा-या भरपाईची रक्कम दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयाकडून नुकताच घेण्यात आला आहे. साहजिक दुर्घटनेत किरकोळ वा गंभीर जखमी झालेल्या, अपंगत्व आलेल्या तसंच मृत्युमुखी पडणा-यांना दहा टक्के जास्त नुकसान भरपाई मिळू शकणार आहे. या निर्णयानुसार रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. तसंच अपघातात अपंगत्व आलेल्यांसाठी ५० हजार ते पाच लाख रूपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. एवढंच नाही तर नुकसान भरपाईच्या या रकमेत दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ करण्याचंही ठरवण्यात आलं आहे. सध्याच्या वाहन कायद्यांतर्गत अपघातात मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर अपंगत्व आलेल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येतात. आता यामध्ये केलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे. खरं तर यात नुकसान भरपाईच्या रकमेत वाहनधारकांसाठी असलेल्या थर्ड पार्टी प्रीमिअममध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच अपघातग्रस्तांना अधिक नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांवर टाकण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून यापुढे वाहनांच्या इन्शुअरन्स प्रीमियमच्या रकमेत वाढ होऊ शकते. म्हणजेच शेवटी याद्वारे सामान्यांच्याच खिशात हात घातला जाणार आहे. शिवाय सरकारच्या या निर्णयाचं विमा कंपन्यांकडून काटेकोर पालन होणार का, असाही प्रश्न समोर येत आहे. मात्र, अशा स्वरूपाच्या उपाययोजना करतानाच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणा-यांवर तातडीने कारवाईसाठी संबंधित यंत्रणा अधिक सक्षम केली जाण्याची आवश्यकता आहे.
अपघात होण्यामध्ये अनेकदा मर्यादेपेक्षा अधिक वेग असणं हेही एक प्रमुख कारण आहे. देशात मोठमोठय़ा रस्त्यांच्या बांधणीवर विशेष भर दिला जात आहे. नवनव्या महामार्गाच्या उभारणीची घोषणा केली जात आहे. एकंदर विविध मार्गावर प्रशस्त रस्त्यांची सुविधा उपलब्ध होत आहे. मात्र, अशा रस्त्यांवरून वाहन चालवताना अनेकांना वेगाच्या मर्यादेचं भान राहत नाही. किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. यातूनच अपघाताची शक्यता वाढते. या संदर्भात परदेशातील परिस्थिती लक्षात घेतली तर तिकडे वाहनांची वेगमर्यादा साधारणपणे १०० किलोमीटर प्रति तास इतकी असते. ती ओलांडल्याचं आढळल्यास संबंधित वाहनधारकाला कडक शिक्षा केली जाते. या शिक्षेच्या भीतीपोटी वाहन चालवताना वेगाच्या मर्यादेवर आवर्जून लक्ष दिलं जातं.
रस्ता सुरक्षेचे नियम सर्वसमान्यांसाठी बनवलेले असतात, ही भावना लोकांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. शिवाय या नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाही त्याच प्रमाणात सक्षम असणं गरजेचं आहे. तरच वाहतुकीच्या नियमांची चोख अंमलबजावणी आणि वाढत्या अपघातांना आळा घातला जाईल. आणखी एक बाब म्हणजे आपल्या देशात अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने खासगी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहतूक व्यवस्था पुरेशी सुरक्षित असेलच याची खात्री देता येत नाही. यातून अपघातांना निमंत्रण मिळतं आणि त्यात निष्पापांना जीव गमवावा लागतो. ‘अति घाई संकटात नेई’ अशी म्हण आहे आणि विविध राष्ट्रीय महामार्गावर ही म्हण मोठय़ा अक्षरात लिहिलेले फलक आढळतात. परंतु एक तर त्याकडे पाहिलं जात नाही किंवा वाचून दुर्लक्ष केलं जातं. ठरलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी समोरील वाहनांना ओव्हरटेक करून जाण्याची अनेकांना घाई असते. मात्र, अशा प्रयत्नात मोठय़ा अपघाताची शक्यता बळावते. याशिवाय चालकांना पुरेशी विश्रांती न मिळणं हेही रस्ते अपघातामागील एक कारण आहे. या सा-या बाबी लक्षात घेऊन प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहतूक नियमांच्या काटेकोर पालनावर भर देणं तसंच सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करणं या उपाययोजना गरजेच्या ठरणार आहेत
No comments:
Post a Comment