ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठार मारण्यात आल्याचे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. अमेरिकेतील वृत्त वाहिन्यांनी लादेन ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ओबामा यांच्याकडून व्हाईट हाऊस येथे लादेन ठार झाल्याची अधिकृत घोषणा केली. ओबामा यांनी लादेनला अफगणिस्तान-पाकिस्तान सीमेवर एबटाबाद या गावात अमेरिकी सैन्याच्या कारवाईत ठार करण्यात आल्याचे सांगितले.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लादेन सुत्रधार होता. लादेनच्या शोधात अमेरिकेच्या सैन्याने अफगणिस्तानमध्ये मोहिम राबवली होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषद घेत ओबामांनी लादेनच्या मृत्युची अधिकृत घोषणा केली.
ओबामा म्हणाले, ''गेल्या एक आठवड्यापासून लादेनविरुद्ध मोहिन तीव्र करण्यात आली होती. रविवारी अखेर लादेनला ठार मारण्यात यश आले. लादेन अफगणिस्तान-पाकिस्तान सीमेवर एका कंपाऊंडमध्ये लपल्याची माहिती ऑगस्ट २०१० मध्ये मिळाली होती. अमेरिकेच्या "सीआयए" सैन्यातील जवानांनी लादेनला ठार मारले.
दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची लढाई अशीच सुरु राहणार असून, अल कायदाविरुद्धच्या लढाईतील हा सर्वात मोठा विजय आहे. आमची लढाई इस्लामविरुद्ध नसून, दहशतवाद्यांविरुद्ध आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याची अमेरिकी सैन्याला मदत झाल्याने मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला अखेर न्याय मिळाला.''
ओबामा यांनी लादेनला ठार मारल्याची घोषणा केली तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर अनेक अमेरिकी नागरिकांची गर्दी जमली होती. ९/११ हल्ल्याला काही महिन्यातच दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात सुमारे ३ हजार जण मारले गेले होते. यानंतर अमेरिकेने अफगणिस्तान आणि इराकमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध मोहिम सुरु केली होती. अल कायदा संघटनेवर १९९८ साली आफ्रिकेतील अमेरिकी दुतावासावर बॉम्ब हल्ले करण्याचा आरोप होता.
No comments:
Post a Comment