महाराष्ट्रातील शेतकरी ज्या पावसाची चातकासारखी
वाट पाहात होते, तो मान्सून येत्या 29 मे रोजी दक्षिण किनारपट्टीवर दाखल होत असल्याची सुखदवार्ता
नुकतीच भारतीय हवामान खात्याने दिली. सोबतच स्कायमेटने हाच दिवस 28 मे असा सांगितला. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लगबगीने
लागला आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याची राज्यात निर्माण झालेली कमतरता आणि 15-15 दिवसात एकदा पाणी ही स्थिती कायम संपुष्टात यावी यासाठी
गावखेड्यातील सामान्य जनतेसाठीही हा आनंददायक निर्णय म्हणावा लागेल. राज्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवारची कामे वेगाने
पुढे सरकत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ही योजना राज्यात राबविली जात आहे. राज्यातील
25 हजार दुष्काळग्रस्त खेडी पाणीयुक्त करण्यासाठी
शासनाने 25 हजार कोटींची आतापर्यंत तरतूद केली आहे. आणखी
निधीसाठी केंद्राकडून मदत मागितली जात आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे
नाम फौंडेशन आणि आमिर खानचे पाणी फौंडेशन या दोन्ही संघटना जलसंधारणाची मोहीमही
पूर्णत्वास नेण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे या योजनेत
नागरिकांचा मोठा सहभाग.
एकदा एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळले की, मग नागरिकही शासनाची योजना आपली योजना समजून त्यात हातभार कसा
लावतात, याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त
शिवारची कमाल म्हणजे, रत्नागिरीमध्ये ज्या हॅण्डपंपला तीन वर्षांपासून
पाणी नव्हते त्या हॅण्डपंपातून,
पाण्याची पातळी
वाढल्यामुळे पाणी आल्याची घटनाही घडली आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी सांगलीला भेट
दिली असता, अन्य कार्यक्रमातून वेळ काढून जत येथील आवंढी गावात
पाणी संधारणाच्या कामात श्रमदान केले. सारे आवंढी गाव जलसंधारणाच्या कामासाठी मैदानात उतरल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी
गावकर्यांचे कौतुक केले. गावकर्यांतही उत्साह संचारला. शासनाकडून मिळणार्या
अनुदानाचा योग्य विनियोग नागरिक आणि स्वयंसेवी संस्था करीत आहेत आणि प्रशासनही
त्यांना जेसीबीपासून अन्य संसाधनांची पूर्तता करीत आहे, हे चित्रही सुखावह आहे. आज जलयुक्त शिवारमुळे अनेक शेतकर्यांनी
दुबार पिके घेतल्याची उदाहरणेही आपण पाहिली आहेत. आज नागरिकांपुढे आव्हान आहे ते
पावसाळ्याच्या आधी आपापल्या गावखेड्यातील शिवारांचे काम पूर्ण करण्याचे.
मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना यासाठी की, या शिवारांमुळे शेतीसाठी, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा आणि पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची
खाली गेलेली पातळी वर आणणे, हे चार प्रमुख उद्देश या योजनेचे भाग आहेत.
आज अनेक गावखेड्यात जलयुक्त शिवारांमुळे
पाण्याची पातळी वर आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडीसारखे काही तालुके कायम दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.
म्हणून याकडे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. सांगलीतच मुख्यमंत्र्यांनी
सांगितले की, आतापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त
झाली असून यंदाच्या वर्षी सहा हजार गावांना दुष्काळमुक्त करण्याची योजना आहे.
संपूर्ण राज्यातील एकही खेडे जलयुक्त शिवारपासून वंचित राहणार नाही, याचा निर्धार शासनाने केला आहे. गेल्या 50 वर्षांत जे काम झाले नाही, ते काम अवघ्या चार
वर्षांत लोकसहभागातून पूर्णत्वास जाणे ही मोठीच उपलब्धी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी
प्रकर्षाने नमूद केले. कोणतीही जनहिताची योजना राबविताना, जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. प्रारंभी या योजनेकडे अनेक
शेतकर्यांनी पाठ फिरविली. पण,
लगतच्या शेतातील जलयुक्त
शिवारात भरपूर पाणी असल्याचे पाहून मग अन्य शेतकरीही या योजनेकडे वळले. आता एवढे
अर्ज यायला लागलेत की, योजनेचा कालावधीच अनिश्चित काळासाठी वाढवून
देण्यात आला आहे. राज्यातील 36 लाख शेतकर्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांच्या
कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या प्रत्येकाने आपापल्या शेतात जलयुक्त शिवार
किंवा जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. दहा हजार विहिरी स्वच्छ
करण्याची योजनाही जलसंधारणाच्या कामात समाविष्ट आहे. जुने मालगुजारी तलाव, मोठ्या नाल्यांवर बंधारे, जेथे नसतील तेथे नव्याने
बांधणी ही कामेही प्रगतिपथावर आहेत. तिकडे धडाकेबाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांनी एक अफलातून कल्पना पुढे आणली आहे. आता ज्या नद्या अथवा नाल्यांवर नवे पूल
बांधले जातील, त्यासोबतच पाणी अडविण्यासाठी पुलाला लागूनच
बंधारे बांधून पाणी साठवणूक ही कल्पक योजना आहे.
महाराष्ट्राला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस
यांच्या रूपाने दोन खंदे वीर मिळाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच
राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळविण्यात यश आले. एकीकडे
अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे आणि त्याला जलयुक्त शिवारांची जोड यामुळे
महाराष्ट्र येत्या दोन-तीन वर्षांत दुष्काळमुक्त होण्यास मोठाच हातभार लागणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास,
270 गावांतील 550 खेड्यात जलयुक्त शिवारांची कामे पूर्ण झाली
असून यंदाच्या वर्षी 241 गावांची निवड करण्यात आली. ही सर्व कामे
प्रगतिपथावर आहेत. शिवारात भरपूर पाणी जमा झाल्याने आताच 1 लाख 92 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. 96 हजार टीएमसी पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. गावातील पाणी गावातच
अडविल्यामुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. 300 प्रकल्पांतील गाळही काढण्यात आल्यामुळे तेथे 511 टीएमसी एवढा वाढीव पाणीसाठा निर्माण झाला आहे. संपूर्ण नगर जिल्हा
जलसंधारणाच्या कामांना लागला आहे. हे एकट्या नगर जिल्ह्याचे चित्र आहे. परभणी
जिल्ह्यातही पाण्याची पातळी वाढली आहे. केंद्रपुरस्कृत अमृत योजनेंतर्गत नगर
शहरासाठी पाणीपुरवठा योजनाही मंजूर झाली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हेच चित्र
निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. महाराष्ट्राच्या या योजनेचे फलित
पाहून राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतही ही
योजना राबविली जात आहे. काही शेतकर्यांनी तर एका एका एकरात जलयुक्त शिवार
घेतल्यामुळे चोहोबाजूच्या जमिनी सुजलाम् सुफलाम् झाल्या आहेत. शिवाराच्या
परिसरात सावली देणारे वृक्ष लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्यांनी या
यशाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे आणि आपल्या शेतातही जलयुक्त शिवार घेतले पाहिजे.
मान्सूनची चाहूल लागली आहे. तेव्हा पावसाच्या अंदाजाकडे सातत्याने लक्ष देऊन
शेतकर्यांनी नियोजन केले पाहिजे. त्यासाठी डीडी किसानचे अॅप आहेत. त्याचा वापर
केला पाहिजे. मोठ्या बंधार्यांची वाट न पाहता आपल्या शेताच्या फायद्याचे काय याचा
विवेक बाळगून पुढची पावले टाकली पाहिजेत. केवळ शासनाने प्रत्येक गोष्ट माफ केली
पाहिजे या मानसिकतेतून आता बाहेर आले पाहिजे. तरच शेतकर्यांचे ‘अच्छे दिन’ आले, असे म्हणता येईल.
No comments:
Post a Comment