पख्तुनांच्या इतक्या मोठ्या असंतोषाला कारण म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक व भाषिक अस्मितेची गळचेपी व दहशतवादाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे एन्काऊंटर. हा रोष वाढतच जाणार, यात काही शंका नाही. आपल्याकडे ‘आझादी’ मागणा-यांचा आणि त्यांच्या मागण्यांना न्याय्य मानणा-यांचा एक कंपू आहे. भारतापासून ‘आझादी’ मिळवून पाकिस्तानात जाण्याची स्वप्ने पाहणा-यांनी आणि ती स्वप्ने दाखवून
फितविणा-यांनी पाकिस्तानातली ही स्थिती डोळे उघडून पाहावी.
एरव्हीही नित्यनेमाने अराजकासोबत जगणा-या पाकिस्तानात आता नवे संकट निर्माण झाले आहे. २०१६ साली नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानच्या लढ्याला सहानुभूती दर्शविली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर नंतर त्याचे अनेक परिणामपाहायला मिळाले. आता त्यात अजून एक अध्याय जोडला जाण्याची लक्षणे आहेत. हा अध्याय आहे पख्तुनिस्तानचा. सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये लाखो पख्तुनी नागरिक रस्त्यावर उतरले होते. नकीब महसूद या पख्तुनी युवकाच्या चकमकीत झालेल्या मृत्यूनंतर हा जनक्षोभ उसळला. इस्लामचे नाव घेऊन राज्य करणा-या पाकिस्तानकडे व आपल्या राज्यव्यवस्थेपेक्षा पाकिस्तान व अरब विश्वाकडे आदर्श म्हणून पाहणा-यांनी समजून घ्यावा, असे हे घटनाक्रमआहेत. खैबर पख्तुनख्वा भागातील लोकांवर केल्या जाणा-या अत्याचाराच्या कथा आजही सांगितल्या जातात. पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासन त्या आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पोहोचू देत नाही एवढेच. आपल्याकडे ‘अमन की आशा’ बाळगत आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी होणा-यांनाही ते दिसत नाहीत. स्वत:च्याच नागरिकांबद्दल पाकिस्तानची ही वागणूक कुठल्याही वंशविच्छेदापेक्षा कमी नाही. पख्तुनांना दिल्या जाणा-या दुय्यम वागणुकीला कंटाळून तिथल्या पख्तून लोकांनी ‘आझादी’चे नारे लावायला सुरुवात केली आहे. १३ जानेवारीला नकीबची हत्या करण्यात आली. दाखविलेली घटना ही दहशतवाद्यांच्या विरोधातली आहे, असे दाखविले गेले. मात्र, त्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य आढळले नाही. नकीबचा मृत्यू संशयास्पद आहे.
वस्तुत: आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा दबाव वाढला की, पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाया करण्याचे नाटक सुरू करते. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. दहशतवाद हा एकमेव मुद्दा त्यांनी लावून धरला आहे. या दबावामुळेच पाकिस्तानने कारवाई केली. पाकिस्तानी तालिबान्यांचा उदय याच भागातून झालेला असल्याने इथे सरसकट कारवाई केली जाते आणि पख्तुनांनाही मारले जाते. पख्तुनांना अशा प्रकारे मारण्याचे सत्र तिथे याआधीसुद्धा झाले आहे. मात्र, यावेळी खुद्द पख्तुनी जनताच रस्त्यावर उतरल्याने पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांना काय करावे हे कळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पख्तुनांची संख्या पाकिस्तानात खूप मोठी आहे. पाकिस्तानी लोकसंख्येत दुस-या क्रमांकाचे ते नागरिक आहेत. पाकव्याप्त काश्मीर ते अफगाणिस्तानपर्यंत पख्तुनी लोक विखुरलेले असल्याने आतापर्यंत त्यांच्यात एकसंघता नव्हती. नकीबच्या मृत्यूनंतर मात्र हे लोक एकत्र यायला लागले आहेत. फाळणीच्या शोकांतिकेत ज्या अनेक उपशोकांतिका दडल्या आहेत, त्यात पख्तुनींच्याही व्यथा आहेत.
पख्तुनी लोक स्वत:ला पंजाबी, सिंधी आणि बलुची मुसलमानांपेक्षा वेगळे मानतात. त्याचे एक कारण त्यांची भाषा व सांस्कृतिक मूल्ये निराळी आहेत. पाकिस्तानात त्यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीला स्थान नाही. त्याशिवाय केंद्रीय पाकिस्तानी सत्तेचे धोरण पख्तुनांकडे संशयाने पाहण्याचेच राहिले आहे. फाळणीपूर्वीच्या भारतात पख्तुनी प्रभावित जो काही भूभाग होता, त्यांनी जीना व पाकिस्तानच्या मागणीला शेवटचे एक वर्ष वगळता कधीच मान्यता दिली नव्हती. अब्दुल गफार खान त्यांचे नेते होते. ‘सरहद्द गांधी’ या नावाने ते ओळखले जात. गांधींचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव होता. या प्रांतात त्यांचे सरकारही होते. जीनांना सांभाळण्याच्या नादात कॉंग्रेसने अब्दुल गफार खान यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि त्यांचे सरकारही गेले. सत्तेतून पदच्युत झालेल्या खान यांचे महत्त्वही नंतर कमी होत गेले आणि त्यातून पुढे हा भागही पाकिस्तानात गेला. अब्दुल गफार खान यांनी भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात भागही घेतला होता आणि ब्रिटिशांचा अत्याचारही सहन केला होता. जीनांना नेहमीच त्यांच्याबाबत असुरक्षित भावना वाटत होती आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचे नेतृत्व खच्ची केले गेले. अत्यंत वेदनेने अब्दुल गफार खान पाकिस्तानात गेले. दिल्लीचे प्रसिद्ध ‘खान मार्केट’ त्यांच्या नावाने उभे आहे. जीनांचे नेतृत्व मान्य नसल्याने त्यांनी स्वतंत्र पख्तुनिस्तानचे आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यांचा मुलगा वलीखान देखील हे आंदोलन चालवित राहिला. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी १५ वर्षे इतका मोठा काळ त्याला तुरुंगात ठेवले. विखुरलेले असल्याने त्यांच्या कामाला यश आले नाही. मात्र, आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पाकिस्तानसमोरची सगळ्यात मोठी भीती निराळीच आहे. पाकिस्तानी लष्करातही पख्तुनांची संख्या मोठी आहे. सध्या लोकशाही मार्गाने निवडून गेलेले सरकार, आयएसआय, लष्कर व लहानमोठे दहशतवादी गट अशी कितीतरी सत्तास्थाने निर्माण झाली आहेत. आपापल्या कक्षांमध्ये ही मंडळी समांतर सरकारे चालवित असतात. पख्तुनांनीसुद्धा हे सुरू केले तर तो एक वेगळाच प्रभावी गट असेल. अफगाणिस्तानशी पख्तुनांचे सख्य जुळले, तर तिथेही एक वेगळाच गट निर्माण होऊ शकतो.
प्रभावी पख्तुनांमध्ये मलाला, शाहीद आफ्रिदी, इम्रान खान अशी मंडळीदेखील आहेत. पाकिस्तानसमोर निर्माण झालेले हे पेच असे गुंतागुंतीचे आणि बहुपेडी आहेत. हे सोडवता सोडवता पाकिस्तान सरकारच्या नाकी नऊ येणार आहेत. पख्तुनांच्या इतक्या मोठ्या असंतोषाला कारण म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक व भाषिक अस्मितेची गळचेपी व दहशतवादाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे एन्काऊंटर. हा रोष वाढतच जाणार, यात काही शंका नाही. आपल्याकडे ‘आझादी’ मागणा-यांचा आणि त्यांच्या मागण्यांना न्याय्य मानणा-यांचा एक कंपू आहे. भारतापासून ‘आझादी’ मिळवून पाकिस्तानात जाण्याची स्वप्ने पाहणा-यांनी आणि ती स्वप्ने दाखवून फितविणा-यांनी पाकिस्तानातली ही स्थिती डोळे उघडून पाहावी.
No comments:
Post a Comment