Total Pageviews

Monday, 28 May 2018

शिक्षणाचा ऑनलाईन पर्याय महा एमटीबी 26-May-2018


गुगलचा शोध हा देखील गुटेनबर्गच्या छपाई यंत्राइतकाच क्रांतिकारक मानला पाहिजे. ऑनलाईन अभ्यासक्रमांनी या ज्ञानशाखा बहरणार आणि त्याला कुठलीही बंधने नसतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
 
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आणि ते प्यायल्यावर माणूस गुरगुरायला लागतो,” अशा आशयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विधान आहे. वरवर पाहाता ते कोड्यात टाकणारे असले तरीही यात बराच मोठा अर्थ दडलेला आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशात आज ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत, त्यामागे आपल्या शिक्षणपद्धतीचा मोठा हात आहे. आपली शिक्षणपद्धती, जी काही वेळा टीकेचाही विषय बनते, हे मान्य जरी केले तरीही आपल्या शिक्षणपद्धतीचे रोजगार उपलब्ध करून देण्यातले योगदान नाकारता येणार नाही. शिक्षणव्यवस्था कालसापेक्ष राहिली की, उद्योग आणि त्यांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमांमध्येही सुधारणा करता येतात. १९९१ साली भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे आपण अनुभवले. माहिती-तंत्रज्ञान व सेवा उद्योगांचा मोठा ओघ आपल्याकडे यायला लागला. नारायण मूर्ती, नंदन निलंकेणी यांसारखे उद्योजक यातूनच पुढे आले व तरुणाईचे ‘आयकॉन’ बनले. व्यावसायिकांची व सेवा देणार्‍यांची मागणीही झपाट्याने वाढली. यातून जे साध्य झाले त्याची अद्याप आपल्याला मोजदाद आलेली नाही. घरटी उत्पन्नाचे आकडे मात्र यातून नक्कीच वाढले. या परिवर्तनातून पुढे शिक्षणाच्या चाकोरीही मोडल्या. बीए, बीकॉम, बीएस्सी यासारख्या कोर्सच्या पलीकडे जाऊन नवनव्या अभ्यासक्रमांच्या नांदी येऊ लागल्या. यातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या व त्याचबरोबर काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाचे केंद्रीकरण ही त्यातली एक मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात पुण्यासारख्या ठिकाणी या सगळ्याच शैक्षणिक घडामोडींचे केंद्र निर्माण झाले. त्यावेळी ‘शिक्षणाचे माहेरघर’ असा अत्यंत अभिमानाने त्याचा उल्लेखही केला गेला. अत्यंत दुर्गम भागातून, हलाखीच्या स्थितीतून पुण्यापर्यंत पोहोचून शिक्षण कसे पूर्ण केले, असे अनेक उतारेही आपल्याला वाचायला मिळाले आहेत. या सगळ्याला वेगळे वळण देणारी एक घटना घडली आहे. ‘युजीसी’च्या माध्यमातून आता ऑनलाईन शिक्षणालाही सुरुवात होणार आहे. यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नव्या घटनाक्रमांना सुरुवात होईल. शिक्षणाच्या आस्थापनांवर होणारा खर्च यातून वाचेलच, पण त्याचबरोबर ज्यांना ज्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे, त्यांना हवे तसे शिक्षण हव्या त्या ठिकाणाहून घेता येईल. आता त्यासाठी प्रवास करून दूरगावी जाण्याची गरज नाही.
 
शिक्षणव्यवस्थाही खूप मोठी दुकानदारी झाल्याची टीका सर्वच स्तरातून होत असते. त्याचा परिणाम असा की, शिक्षणाच्या एकंदरीत निर्मितीमूल्यावर त्याचा परिणाम होतो. आजही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या पावत्या आपण पाहिल्या तर अनावश्यक वाटाव्या, अशा कितीतरी घटकांचा अंतर्भाव त्यात केला असल्याचे आपल्याला दिसून येईल. शिक्षणासाठीच्या विविध उपक्रमांवर व संशोधनावर खर्च झालाच पाहिजे. मात्र, गणवेश, इमारत निधी यासारख्या बाबींचे अवाजवी शुल्कही आकारलेले दिसते. शैक्षणिक साहित्य, त्याची छपाई, त्याची वाहतूक व वितरण या सगळ्यांचा खर्चही पर्यायाने विद्यार्थ्यांवर पडतो. ऑनलाईन शिक्षणप्रणालीत छापील पुस्तके, वह्या यांसारख्या माध्यमांची मुळीच गरज नाही. त्यामुळे हा प्रश्‍नच मिटला.
 
वस्तुत: आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची रचना यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. मात्र, त्याला ‘युजीसी’ची मान्यता नव्हती. आता जमाना हा मागणी व त्या अनुषंगाने केला जाणारा पुरवठा असा असल्याने व्यावसायिक गरज म्हणून अनेकांनी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये सहभागही घेतला व ते पूर्णही केले. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर उद्योगाभिमुख शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती पुढे आलीच, पण त्याचबरोबर आपल्याकडचा त्यातला अभावदेखील प्रकर्षाने पुढे आला. अनेक ज्ञान शाखा व त्यांच्या उपशाखांचा विचार आपल्याकडे अभ्यासक्रमात झालेला नाही. पशुवैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले तर पशुपालनाच्या प्राण्यांव्यतिरिक्त अन्य प्राण्यांचा विचार केलेल्या उपशाखाच आपल्याकडे नाहीत. जगभरात पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे विविध आयाम समोर येत असताना पशुवैद्यकीयशास्त्र त्यापासून दूर राहू शकत नाही. अनेक पाश्‍चिमात्य विद्यापीठांतून यासाठी अभ्यासक्रम राबविले जात असताना विपुल प्रमाणात जैवविविधता लाभलेल्या आपल्या देशात या संदर्भातले कुठलेही अभ्यासक्रम नाहीत. ही सगळीच ज्ञानशाखा पशुपालन विभागाच्या सरकारी खात्याकडे असल्याने त्यात कुठल्याही प्रकारच्या नव्या बदलांची अपेक्षा ठेवणेच चूक असल्यासारखी स्थिती आहे. असे कितीतरी अभ्यासक्रम या ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे समोर येणार आहेत. छपाईच्या यंत्राचा शोध हा ज्ञानशाखांच्या प्रसारातला महत्त्वाचा टप्पा होता. ‘युरोपियन रेनेसान्स’मध्ये जे घडले, त्यामागे पुस्तकांचे योगदान मोठे होते. गुगलचा शोध हा देखील गुटेनबर्गच्या छपाई यंत्राइतकाच क्रांतिकारक मानला पाहिजे. ऑनलाईन अभ्यासक्रमांनी या ज्ञानशाखा बहरणार आणि त्याला कुठलीही बंधने नसतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
 

No comments:

Post a Comment