Total Pageviews

Saturday, 10 June 2017

जिहादचे उदात्तीकरण आणि 'उपयुक्त मूर्ख' -TARUN BHARAT-दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी भारतीय मीडियामधले काही पंचमस्तंभी पत्रकार हिरीरीने पुढे होत आहेत. मग भारतीय लष्कराने मारलेला लष्करचा कमांडर, खतरनाक दहशतवादी आणि खुनी बुऱ्हान वणी हा 'गरीब हेडमास्तरचा मुलगा' होतो तर त्याचा उत्तराधिकारी, हल्लीच मारला गेलेला सबझार बट हा प्रेमात अयशस्वी झाल्यामुळे निराश होऊन दहशतवादाकडे कसा वळला ह्याचे गोडवे गेले जातात. काश्मीरमध्ये गरिबी आणि बेकारी आहे म्हणून तिथले तरुण दहशतवादाकडे वळलेत हा युक्तिवाद तर कित्येक वर्षे केला जातोय. देशात इतरही प्रांतात गरिबी आहे, बेकारी आहे, इतर प्रश्न आहेत, तरीही तिथले तरुण कसे हिंसेकडे वळत नाहीत हा प्रश्न मात्र कुणालाही विचारावासा वाटत नाही. एप्रिलमध्ये मेजर लिथुल गोगोई ह्यांनी जीपला बांधून ह्या दगडफेक्याला फिरवलं तो फारुख दार शालीवर सुंदर भरतकाम कसे करतो ह्याचेच कौतुक, पण एकही गोळी न झाडता कामगिरी फत्ते करणाऱ्या मेजर गोगोईचे रास्त कौतुक करणारे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत ह्यांची तुलना मात्र थेट जालियाँवाला बाग मध्ये हजारो निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणाऱ्या क्रूरकर्मा , ब्रिटिश जनरल डायरबरोबर केली जाते ती ही भारतीय पत्रकारांकडून ह्याहून मोठे दुर्दैव ते काय?


07-Jun-2017 शेफाली वैद्य WhatsApp 298 इंग्रजीमध्ये 'युजफूल इडियट' म्हणजे 'उपयुक्त मूर्ख' नावाची एक संज्ञा आहे. असं म्हणतात की ह्या संज्ञेचा प्रयोग सर्वप्रथम लेनिनने केला. रशियामधल्या रक्तलांछित डाव्या क्रांतीचे आंधळे समर्थन करणाऱ्या पश्चिमेतल्या काही लेखकांना उद्देशून लेनिनने हे उद्गार काढले होते असं म्हणतात. ज्या ज्या वेळी जगात आपल्या तत्वज्ञानाचा हिंसक मार्गाने प्रसार करणाऱ्या चळवळी प्रबळ होतात त्या त्या वेळी त्या हिंसेचे 'मानवतावादी दृष्टिकोनातून' लंगडे समर्थन करण्यासाठी काही लोक पुढे सरसावतात. त्या लोकांसाठी 'उपयुक्त मूर्ख' ही संज्ञा वापरली जाते. हे उपयुक्त मूर्ख सहसा डाव्या विचारांशी बांधिलकी असणारे, वरकरणी स्वतःला 'उदारमतवादी' म्हणवणारे पण प्रत्यक्षात स्वतःच्या नेभळटपणाला तत्वांचा मुलामा देणारे स्वार्थी लोक असतात. इस्लामी दहशतवाद ही आज जगापुढे आ वासून उभी असलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. जगात कुठेही इस्लामी दहशतवादाच्या घटना घडल्या की त्या घटनांचे मानवतावादी दृष्टिकोनातून समर्थन करणारी उपयुक्त मूर्खांची प्रचंड फौज सध्या जगभरातल्या पारंपरिक प्रसार माध्यमांमधून काम करते आहे. ह्या फौजेचे काम एकच आहे, जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की तो हल्ला करणाऱ्या नराधमांचे छुपे उदात्तीकरण करणे आणि जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांच्या नजरेतून पूर्णपणे न्याय्य कसा होता हे लोकांना पटवून देणे. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण हे एकमेव काम असणारा एक खूप मोठा गट मीडिया आणि एकेडेमिया मधून सध्या जगभरात सक्रिय आहे आणि इस्लामी जिहादी आपल्या प्रोपागंडासाठी ह्या गटातल्या लोकांचा सोयीस्करपणे वापर करून घेत आहेत. मग मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्याला कारण राममंदिराचा मुद्दा, अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जे दहशतवादी हल्ले झाले त्याला अमेरिकेचे मध्यपूर्वेतले परराष्ट्रीय धोरण जबाबदार होते. फ्रांसमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले त्याला दहशतवाद्यांची गरिबी आणि फ्रान्सच्या समाजातली आर्थिक असमानता जबाबदार होती असा अपप्रचार जाणून बुजून मीडियामधून केला जातो. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काही प्रसिद्ध लेखकही ह्या उपयुक्त मूर्खांच्या मोर्चात सामील आहेत. अगदी होसे सारामागो आणि दारीयो फो सारख्या नोबेल पारितोषिकप्राप्त लेखकांचाही ह्यात समावेश आहे. इस्लामी दहशतवाद आता असंघटित स्वरूपात जगापुढे येतोय. वेगवेगळ्या देशात 'लोन वुल्फ' म्हणजे एकेकटे दहशतवादी ट्रक, सुरे, सहज उपलब्ध होणारी स्फोटके वगैरे नित्य वापरातल्या गोष्टी शस्त्रासारख्या वापरून सॉफ्ट टार्गेटस म्हणजे सहज लक्ष्य करता येण्यासारख्या सामान्य लोकांवर हल्ले करत आहेत. अर्थात ह्या सगळ्या हल्ल्यांमागची विचारधारा एकच आहे, ती म्हणजे कडवा इस्लामी कट्टरतावाद. पण ह्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणारे लोक इस्लामी कट्टरतावादाबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यांचा भर असतो दहशतवाद्यांची 'मानवी बाजू' दाखवण्याकडे. मग १९९३ मधल्या मुंबई बॉम्बहल्ल्यांबद्दल फाशी गेलेला याकूब मेमन 'मृदूभाषी आणि खूप पुस्तके वाचणारा' कसा होता अश्या मथळ्याचे लेख प्रसिद्ध होतात. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या भयानक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब, ज्याने अत्यंत थंड रक्ताने निरपराध, निःशस्त्र भारतीयांवर गोळ्या चालवल्या होत्या, तो लहानपणी कसा गोंडस होता. त्याला हिंदी सिनेमे बघायला कसे आवडायचे. त्याच्या बालपणीच्या आत्यंतिक गरिबीमुळे त्याला 'बडा आदमी' कसं बनायचं होतं आणि त्यामुळे तो सहजपणे दहशतवाद्यांच्या गळाला कसा लागला ह्याच्या काळीज पिळवटणाऱ्या कहाण्या भारतीय वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात. सध्या काश्मीरच्या खोऱ्यात इस्लामी कट्टरतावाद हातपाय पसरतोय. हिजबुल मुजाहिदीन आणि लष्करे तोयबाचे दहशतवादी इस्लामी खिलाफतसाठी लढत आहेत. तथाकथित काश्मिरीयतशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही ह्याचे अनेक पुरावे हाती लागूनसुद्धा त्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी भारतीय मीडियामधले काही पंचमस्तंभी पत्रकार हिरीरीने पुढे होत आहेत. मग भारतीय लष्कराने मारलेला लष्करचा कमांडर, खतरनाक दहशतवादी आणि खुनी बुऱ्हान वणी हा 'गरीब हेडमास्तरचा मुलगा' होतो तर त्याचा उत्तराधिकारी, हल्लीच मारला गेलेला सबझार बट हा प्रेमात अयशस्वी झाल्यामुळे निराश होऊन दहशतवादाकडे कसा वळला ह्याचे गोडवे गेले जातात. काश्मीरमध्ये गरिबी आणि बेकारी आहे म्हणून तिथले तरुण दहशतवादाकडे वळलेत हा युक्तिवाद तर कित्येक वर्षे केला जातोय. देशात इतरही प्रांतात गरिबी आहे, बेकारी आहे, इतर प्रश्न आहेत, तरीही तिथले तरुण कसे हिंसेकडे वळत नाहीत हा प्रश्न मात्र कुणालाही विचारावासा वाटत नाही. एप्रिलमध्ये मेजर लिथुल गोगोई ह्यांनी जीपला बांधून ह्या दगडफेक्याला फिरवलं तो फारुख दार शालीवर सुंदर भरतकाम कसे करतो ह्याचेच कौतुक, पण एकही गोळी न झाडता कामगिरी फत्ते करणाऱ्या मेजर गोगोईचे रास्त कौतुक करणारे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत ह्यांची तुलना मात्र थेट जालियाँवाला बाग मध्ये हजारो निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणाऱ्या क्रूरकर्मा , ब्रिटिश जनरल डायरबरोबर केली जाते ती ही भारतीय पत्रकारांकडून ह्याहून मोठे दुर्दैव ते काय? गेल्या आठवड्यात लंडनमध्ये दहशतवादी हल्ले झाले. गेल्या तीन महिन्यातला हा तिसरा मोठा इस्लामी दहशतवादी हल्ला. इस्लामी दहशतवाद लंडनसारख्या ठिकाणी का फोफावतोय ह्याची कारणे शोधण्याचे सोडून तिथल्या मीडियामधले काही लोक हा हल्ला करणारा दहशतवादी तो १२ वर्षांचा असताना त्याचे वडील गेल्यामुळे सैरभैर होऊन दहशतवादाकडे कसा वळला ह्याच्या रसभरीत कहाण्या लिहीत आहेत. जगात दरवर्षी लाखो मुलांचे वडील अकाली मरण पावतात. बहुसंख्य मुले ते दुःख पचवतात करत, जबाबदार बनतात आणि आपले आयुष्य घडवतात. प्रेमभंगही जगात अनेकांचे होतात, नैराश्यही खूप लोकांना येतं पण म्हणून काही ते दहशतवादाकडे वळत नाहीत. इस्लामी दहशतवाद हा धार्मिक कट्टरतेतून आलेला आहे आणि त्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून जर मीडिया दहशतवाद्यांचे उदात्तीकरण आणि मानवीकरण करत राहिला तर काही दिवसांनी मला खूप डास चावले म्हणून मी दहशतवादाकडे वळलो असाही एखाद्या दहशतवाद्याचा भावनेने पिळवटलेला कबुलीजबाब आपल्याला मीडियामध्ये वाचायला मिळू शकेल. दहशतवाद्यांचे हे उदात्तीकरण ही एक जाणून बुजून खेळलेली खेळी आहे. ह्यामधून तीन गोष्टी साध्य होतात, एक म्हणजे दहशतवादाचे जे मूळ आहे, ते म्हणजे इस्लामी कट्टरतावाद त्याच्यावर पांघरूण घातले जाते. दहशतवादी हल्ल्यात जी निरपराध माणसे मारली जातात, जी कुटुंबे त्यांचा दोष नसताना कायमची उध्वस्त होतात त्यांच्या कहाण्या आपोआपच विस्मरणात जातात आणि मृतांच्या संख्येचा आकडा एवढ्यापुरतीच त्यांची ओळख जनमानसात उरते. पण दहशतवादी कृत्ये करणारे जे नराधम असतात ज्यांनी एका विचारप्रणालीच्या आधारे अत्यंत थंड डोक्याने ही कृत्ये केलेली असतात, त्यांचे मात्र मानवीकरण होते. त्यांच्य कृत्यांना भावनांचा मुलामा देऊन त्यांची तीव्र क्रूरता जाणीवपूर्वक लोकांच्या नजरेआड केली जाते. हे महान कार्य 'उपयुक्त मूर्ख' स्वखुशीने करतात. कधी भीतीपोटी, कधी अज्ञानापोटी तर कधी आंधळ्या स्वार्थापायी उपयुक्त मूर्ख दुष्टांची तळी उचलत राहतात पण त्यांची उपयुक्तता संपली की सगळ्यात पहिला बळी त्यांचाच जाणार असतो हे सनातन सत्य मात्र त्यांना कधीही उमगत नाही

No comments:

Post a Comment